एक कडधान्य. तूर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कजानस कजान आहे. मागील ३५०० वर्षांपासून ती भारतात लागवडीखाली आहे, असा अंदाज आहे. ती मूळची दख्खनच्या पठाराच्या पूर्वेची बाजू ते ओडिशा या भागांतील आहे. तूर हे महत्त्वाचे शिंबावंत पीक आहे. भारतात बहुतेक सर्व राज्यांत हे पीक घेतले जाते. भारतीय उपखंड, पूर्व आफ्रिका आणि मध्य आफ्रिका या तीन प्रदेशांत तुरीचे पीक सर्वाधिक होते. या प्रदेशातील उष्ण तसेच समशीतोष्ण भागांत तुरीची लागवड केली जाते. तिच्यामुळे नायट्रोजन स्थिरीकरण होत असल्यामुळे तेथील मृदा समृद्ध बनते. ती बहुवर्षायू असली तरी पीक वर्षायू म्हणून घेण्यात येते.
तुरीचे झुडूप मध्यम उंचीचे असून १–३ मी.पर्यंत उंच वाढते. मुळांवर नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी असतात. खोड गोल, हिरवे व सरळ असून त्याला फांद्या व उपफांद्या असतात. पाने संयुक्त, पिसांसारखी (पिच्छाकृती), त्रिदली, एकाआड एक व लवदार असतात. फुले पिवळी, तीनच्या गुच्छात पानांच्या बगलेत येतात. शेंग ३–५ सेंमी. लांब, गोलसर चपटी व गाठदार असते. कोवळेपणी शेंगांच्या हिरव्या रंगावर पिंगट, जाड व वाकड्या रेषा असतात. बिया ३–५, गोलसर, पिवळसर, लाल किंवा पांढऱ्या, टणक व गुळगुळीत असतात.
तुरीची डाळ शाकाहारी जेवणातील महत्त्वाचा भाग आहे. तिच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने आणि मिथिओनीन, लायसीन, ट्रिप्टोफेन ही ॲमिनो आम्ले असतात. उकडलेल्या एक कप तुरीपासून २०० कॅलरी ऊष्मांक, ४० ग्रॅ. कर्बोदके, ११ ग्रॅ.प्रथिने आणि ११ ग्रॅ. तंतुमय पदार्थ मिळतात. बियांचे पोटीस सूज कमी होण्यासाठी लावतात. शेतातील जमिनीचा कस वाढावा म्हणून ज्वारी, बाजरी व ऊस या पिकांमध्ये तुरीची लागवड करतात. तिच्या वाळलेल्या काड्यांचा उपयोग घरे शाकारण्यासाठी, कुंपणासाठी, टोपल्या विणण्यासाठी व सरपणासाठी होतो. बंदुकीच्या दारूकरिता कोळसा तयार करण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.
तूर ही एकमेव अशी बीज वनस्पती आहे की तिचा जीनोम (जनुकसंच) भारतात शोधून काढण्यात आला आहे. दिल्ली येथील कृषिसंशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांना या कार्याचे श्रेय दिले जाते.