पांढरी सावर हा पानझडी वृक्ष माल्व्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिबा पेंटाण्ड्रा आहे. तो मूळचा मध्य अमेरिकेतील आणि पश्‍चिम आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. भारताच्या दक्षिण भागात त्याची लागवड केली जाते. शाल्मली या नावानेही पांढरी सावर ओळखला जातो.

पांढरी सावर (सिबा पेंटाण्ड्रा) : (१) वृक्ष, (२) पाने, (३) फुले, (४) फळे.

पांढरी सावर वृक्ष ६०–७० मी.पर्यंत उंच वाढतो. खोडाचा घेर सु. ३ मी. एवढा असतो. खोड कोवळे असताना काटेरी असते. नंतर काटे गळून पडतात व खोड मऊ बनते. फांद्या हिरव्या असून त्या आडव्या पसरतात. पाने संयुक्त व हस्ताकृती असून पानाला ५–९ पर्णिका असतात. पर्णिकांची लांबी ५–१२ सेंमी. असते. पानांना उपपर्णे असतात; परंतु ती लवकर गळतात. पर्णिका भाल्यासारखी व चकचकीत असतात. फुले पांढरी व भुरकट रंगांची असून नवीन शाखांच्या टोकाला ती गुच्छाने येतात. फुलात पुंकेसरांचे पाच जुडगे असतात आणि ते तळाशी जुळलेले असतात. फुलातील पुंकेसर बाहेरून सहज दिसतात. फळ तोंडल्याच्या आकाराचे परंतु लांबट असते. बिया काळ्या व चकचकीत असून त्यांभोवती मऊ कापसासारखे तंतू असतात. हे तंतू लिग्निन आणि सेल्युलोज यांचे बनलेले असतात. तंतू हलके असून ते पाणी शोषून घेत नाहीत, मात्र चटकन पेट घेतात.

पांढरी सावर हिच्या खोडाच्या सालीचा काढा मूत्रल असून त्यापासून रक्तशर्करा कमी होते. बियांपासून तेल काढतात. हे तेल कापसाच्या बियांपासून म्हणजेच सरकीपासून मिळणाऱ्या तेलासारखे असते. या तेलापासून साबण तयार करतात. जैवइंधन म्हणून हे तेल वापरता येईल, असे वैज्ञानिकांचे मत आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या तंतूंपासून धागे विणता येत नाहीत. म्हणून त्यांचा वापर गाद्या, उश्या, खेळणी तसेच जाकिटे भरण्यासाठी करतात. लाकडापासून लहान लहान वस्तू तयार करतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा