एक बिनविषारी साप. दिवडाचा समावेश सरीसृप वर्गाच्या कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी या उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव झिनोक्रोपीस पिस्केटर आहे. त्याला पाणदिवड किंवा विरोळा असेही म्हणतात. तो पूर्व अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, चीन, थायलंड, भारत इत्यादि देशांत आढळतो. भारतात तो भातशेती, तलाव, डबके, नद्या, नाले, ओढे, विहिरी अशा पाणथळ जागी किंवा त्यांच्या जवळपास आढळतो.

दिवड (झिनोक्रोपीस पिस्केटर)

पूर्ण वाढलेल्या दिवडाची लांबी १.७–२ मी. असते. या सापाचा रंग करडा, तपकिरी, पिवळा किंवा हिरवट तपकिरी असतो. शरीरावर ५–६ रांगांमध्ये अनियमित काळे चौकोनी ठिपके असतात. या ठिपक्यांच्या भोवती लाल किंवा गुलाबी कडा असतात. पोटाकडील भाग पिवळा किंवा पांढरा असतो. डोके त्रिकोणाकृती असून डोळे मोठे असतात. डोळ्यांतील बाहुल्या गोलाकार असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक बारीक रेघ निघून वरच्या जबड्याच्या शेवटापर्यंत गेलेली असते. नाकपुड्या निमुळत्या व वर वळलेल्या असतात. शेपटी लांब असून शरीराच्या लांबीच्या एक-तृतीयांश असते.

दिवड अतिशय चपळ असतो. तो पाण्यात पोहतो. बेडूक आणि मासे यांवर तो आपली उपजीविका करतो. उन्हाळ्यात तो उष्णकालीन सुप्तावस्थेत आणि थंडीत शीतकालीन सुप्तावस्थेत जातो. त्याला डिवचल्यास तो जोरात हल्ला करतो आणि नागासारखे डोके व मान चपटी करून चावण्याचा प्रयत्न करतो. हल्ल्याच्या वेळी तो उग्र वास सोडतो. याचा जबडा मोठा असल्याने चाव्याची जखम मोठी असते.

दिवड अंडज असून मादी एका वेळेस २०–४० अंडी घालते. उंदरांची बिळे, वाळवीची वारुळे, विहिरीच्या भिंतीतील भोके, तलावाकाठचे खळगे यांत ती अंडी घालते आणि तीच अंड्यांचे रक्षण करते व उबविते. अंड्यांतून ६०–७० दिवसांनंतर पिले बाहेर पडतात. कातडी वस्तू तयार करण्यासाठी दिवड मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.