सर्व सजीवांची शास्त्रीय नावे दर्शविण्यासाठी दोन नावांच्या जोडीचा वापर करतात. या पद्धतीला द्विनाम नामकरण पद्धती म्हणतात. सजीवांची नावे सर्वसाधारणपणे लॅटिन भाषेतून घेतली आहेत. छापताना ती तिरक्या अक्षरात (इटालिक फाँटमध्ये) छापतात. तसेच हाताने लिहिताना ती ठळक अक्षरात लिहून अधोरेखित करतात.
सजीवांच्या शास्त्रीय नावातील पहिल्या शब्दाला प्रजातीचे नाम व दुसऱ्याला जातीचे नाम म्हणतात. प्रजाती नामाचे पहिले अक्षर इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर असते, तर जाती नामातील पहिले अक्षर लहान इंग्रजी लिपीतील असते. उदा., मनुष्य प्राण्याचे शास्त्रीय नाव होमो सेपिएन्स असे असून ते Homo sapiens असे लिहितात. जास्वंदीच्या झाडाचे नाव Hibiscus rosa-sinensis (हिबिस्कस रोझा सायनेन्सिस); ऑरेंज टिप असे स्थानिक नाव असलेल्या फुलपाखराचे शास्त्रीय नाव Anthochris sara (अँतोकॅरिस सारा); पट्टेरी वाघाचे शास्त्रीय नाव Panthera tigris (पँथेरा टायग्रीस) आणि केवळ सूक्ष्मदर्शकाने पाहता येणाऱ्याआणि माणसाच्या लहान आतड्यात आढळणाऱ्या जीवाणूचे शास्त्रीय Escherichia coli (एश्चेरिकिया कोलाय) हे आहे.
स्थानिक परिचित नावांऐवजी (उदा., गुलाब) शास्त्रीय नावे अवघड असली तरी ती वापरणे गरजेचे असते. जसे, जास्वंद हे नाव मराठी भाषेपुरतेच मर्यादित आहे. गुजराती भाषेत त्याला जसुंद, कन्नड भाषेत दसवला आणि हिंदी भाषेत जासुम म्हणतात. इंग्रजी,फ्रेंच, जर्मन इत्यादी परदेशी भाषांतही जास्वंदाला वेगवेगळी नावे आहेत. त्यामुळे स्थानिक नाव जगभर उपयुक्त ठरत नाही. पुढील कारणांमुळे स्थानिक नावाला मर्यादा पडतात :
(१) केवळ गुणधर्म सारखे असल्याने अनेक सजीवांना एक स्थानिक नाव दिलेले असते. उदा., शंखपुष्पी हे नाव पाच भिन्न वनस्पतींना दिलेले आढळून येते; इंग्रजीत पॅन्झी या स्थानिक नावाच्या किमान ५० वनस्पती आढळून येतात. दोन वनस्पतींना ब्राह्मी हे एकच स्थानिक नाव दिलेले आढळते. मात्र, खऱ्या ब्राह्मीसाठी हायड्रोकॉटिल एशिॲटिकम हे शास्त्रीय नाव जगभर वापरले जाते.
(२) स्थानिक नावे एकाच भाषेकरिता किंवा एकाच प्रदेशाकरिता मर्यादित असतात. महाराष्ट्रातील स्थानिक नाव तमिळनाडूत वा केरळमध्ये माहीत असेलच, असे नाही. तसेच भारतीय भाषेतील स्थानिक नाव फ्रेंच वा रशियन भाषिकांना माहीत नसते.
(३) स्थानिक नावावर कोणताही सरकारी किंवा बिनसरकारी संस्थेचा अंकुश नसतो. त्यामुळे ही नावे तारतम्याशिवाय व अयोग्य संदर्भात वापरली जातात.
अशा प्रकारे स्थानिक नावांमुळे सामान्य माणसांच्या व वैज्ञानिकांच्या मनातही संदेह निर्माण होतो. हा गोंधळ टाळण्यासाठी शास्त्रीय नावांची सुरुवात झाली आणि एका सजीवाला जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात एकच नाव असावे, हा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी तेव्हा यूरोपातील लॅटिन भाषा निवडण्यात आली. शास्त्रीय नावांमध्ये एकसूत्रीपणा यावा म्हणून आंतरराष्ट्रीय नामावली संहिता करण्याकरिता नियमावली तयार केली गेली. प्रत्येक गटासाठी म्हणजे वनस्पतींसाठी किंवा प्राण्यांसाठी अथवा जीवाणूंसाठी वेगवेगळ्या नामावली संहिता अंमलात आल्या. स्वीडिश निसर्गवैज्ञानिक कार्ल लिनीअस याने द्विनाम नामकरण पद्धती आपल्या स्पीसीज प्लँटॅरम (१७५३) या पुस्तकात वनस्पतीसाठी वापरली आणि ती नंतर सर्वमान्य झाली. जातीमध्ये उपजाती असल्यास शास्त्रीय नावात तिसरे उपजातीचे नाव अंतर्भूत करतात. उदा., भारतातील वाघ ही वाघांची एक उपजाती असून तिचे शास्त्रीय नाव Panthera tigris tigris असे लिहितात. भारतात आढळणाऱ्या गाढवांच्या उपजातीला Equus hemionus onager असे शास्त्रीय नाव आहे.
नामकरण पद्धतीमध्ये सुसूत्रीकरण करण्यासाठी नियमांची जरूरी भासू लागल्यामुळे एकोणिसाव्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय समित्यांची स्थापना झाली. या समित्यांनी प्राण्यांचे नामकरण आयसीझेडएन, जीवाणूंचे नामकरण आयसीएनबी, शैवाल, कवक आणि वनस्पतींचे नामकरण आयसीएन, विषाणूंचे नामकरण आयसीटीव्ही इत्यादींच्या संहिता तयार केल्या आहेत.
शास्त्रीय नाव देताना आंतरराष्ट्रीय नामावली संहितेमधील नियम वापरतात. नाव ठरविताना बऱ्या च वेळा सजीवाचे गुणधर्म, उपयोग, मूळ ठिकाण किंवा मूळ भाषेतील स्थानिक नाव विचारात घेतात. बऱ्याचवेळा वैज्ञानिकाच्या नावाचा अंतर्भाव शास्त्रीय नावात करतात. उदा., बौहिनिया ॲक्युमिनाटा (सफेद कचनार) आणि बौहिनिया रॅसिमोजा (आपटा) या वनस्पतींच्या नावातील प्रजातीचे नाव झां बौहिन आणि गास्पार बौहिन या वनस्पतिशास्त्रज्ञांच्या स्मरणार्थ दिले गेले आहे. ॲक्युमिनाटा हे जातीचे नाव वनस्पतीच्या टोकदार पानांच्या आकारावरून आले आहे. व्हिक्टोरिया लिली या वनस्पतीच्या व्हिक्टोरिया अमेरिकाना या शास्त्रीय नावातील प्रजातीचे नाव राणी व्हिक्टोरिया यांच्या स्मरणार्थ तर जातीचे नाव त्या वनस्पतीचा मूळ देश (अमेरिका) दाखविते. शास्त्रीय नावात येणाऱ्या अल्बा (सफेद), पेंटाफिला (पाच पर्णिकायुक्त), इंडिका (भारतातील किंवा भारतीय उपखंडातील), अँटिडिसेंटिरिका (आमांशरोधक) अशा संज्ञा सदर वनस्पतींची वैशिष्ट्ये दर्शविणारी आहेत. अशा रीतीने क्लिष्ट वा अवघड वाटणाऱ्या शास्त्रीय नावाचा अर्थ वा व्युत्पत्ती समजून घेतल्यास ती सुलभ व अन्वर्थक असल्याचे लक्षात येते.