दैनंदिन आहारातील एक भाजी. नवलकोल ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार कॉलोरॅपा आहे. ती दिसायला कोबीसारखी दिसते. मात्र तिच्यावर कोबीप्रमाणे पाने नसतात. कोबीप्रमाणेच ही भाजी वन्य कोबीपासून (ब्रॅसिका ओलेरॅसिया) कृत्रिम निवडीतून तयार झालेली आहे. ही वर्षायू वनस्पती मूळची यूरोपातील असून आता तिचा प्रसार सर्वत्र झालेला आहे. कोलराबी हे नाव जर्मन भाषेतील असून त्याचा अर्थ कॅबेज-टर्निप म्हणजे सलगम (टर्निप) सारखी चव व आकार असलेला कोबी असा आहे. या वनस्पतीचे खोड सलगमसारखे दिसते म्हणून या प्रकाराला कोलराबी हे नाव दिले गेले आहे. भारतात नवलकोलची लागवड विशेषेकरून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब व आसाम येथे होते.
नवलकोलचे खोड (गड्डा), गोलाकार मांसल असून सफरचंदाच्या आकाराचे असते. पाने साधी, मोठी, लांब देठाची व फिकट पांढरी असून तळाशी रुंद असतात. नवलकोलच्या खोडापासून क जीवनसत्त्व मिळते. ते कच्चे किंवा भाजी म्हणून शिजवून खातात. महाराष्ट्रात हे पीक कोबी आणि फुलकोबी यांच्या पिकांत मिश्रपीक म्हणून घेतात.