परिसंस्थासमृद्ध वस्ती किंवा पर्यावरणपूरक वस्ती. नैसर्गिक पर्यावरणाला बाधा न आणता आरोग्यदायी मानवी विकास आणि भविष्यातील यशस्वी जीवनास पोषक कार्ये करणाऱ्या लोकसमूहाची वस्ती. सामाजिक, आर्थिक तसेच पारिस्थितिकी दृष्टीने शाश्वतक्षम जीवनाच्या ध्येयाने प्रेरित समाज म्हणजे परिग्राम होय.
पाश्चिमात्य राष्ट्रांतील स्वयंसेवी संस्थांनी परिग्राम ही संकल्पना मांडली आहे. १९६० आणि १९७० च्या दशकांत सहजीवन आणि परिग्राम यांवर लक्ष केंद्रित केले गेले. १९९१ साली परिग्राम आणि शाश्वत समाज यांवर रॉबर्ट गिलमन व डायना गिलमन यांनी अभ्यासपूर्वक विचार मांडला आणि तेव्हापासून परिग्राम संकल्पना प्रत्यक्षात उतरली. सध्या जगातील सहा खंडांतील ७० देशांत परिग्रामे वसली आहेत.
परिग्रामाची लोकसंख्या सामान्यपणे ५०–१५० पर्यंत असते. काही परिग्रामे ही लहानलहान लोकसमुदाय गटांची असतात. ती परस्परांशी सामाजिक घटकांनी जोडलेली असतात. पारिस्थितिकी, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या दृष्टीने जोडलेले समाज हे संघटित परिग्रामाचे सदस्य असतात.
पर्यावरणात झालेले बदल, पारिस्थितिकीची अवनती व जागतिक हवामान बदल यांचा गांभीर्याने विचार करणारे लोकसमूह एकत्रित येत आहेत. चंगळवादी जीवनप्रणाली आणि जैवइंधनाचा वापर यांपासून दूर राहणारा हा लोकसमुदाय आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन घेणे व त्याचा वापर करणे यावर परिग्रामातील लोकांचा भर असतो. ऊर्जा वापरात घट, स्थानिक शाश्वत व्यापारनिर्मिती, शेतीचे विकेंद्रीकरण आणि पर्यावरणाची जाणीव ही परिग्रामाची वैशिष्ट्ये आहेत. परिग्रामातील रहिवासी पर्यावरणाचा आदर राखतात, सेंद्रिय शेती करतात, आपल्या परिसरातील साहित्याचा घरबांधणीसाठी वापर करतात, तसेच जैवविविधता, जल, मृदा व हवा यांचे संरक्षण करतात. भूमीची निगा राखणे हे त्यांचे ध्येय असते. या समाजातील आर्थिक स्वरूप इतर वस्त्यांपेक्षा भिन्न असते. पैसा समाजातच रहावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. पैशांचे चलन सदस्यांमध्ये होत असते. परिग्रामातील लोक एकात्मिक सामाजिक पर्यावरणासाठी प्रयत्नशील असतात.
परिग्रामाची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : परिग्राम हा शासनपुरस्कृत प्रकल्प नसून परिग्राम ही सामान्य लोकांच्या पुढाकारांची निर्मिती असते. परिग्रामातील रहिवासी सामाजिक जीवनप्रणालीस महत्त्व देतात. येथील रहिवासी शासन, सामुदायिक संस्था किंवा जल, अन्न, निवास, ऊर्जा आणि इतर मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठीच्या यंत्रणांवर अवलंबून राहत नाहीत. परिग्रामातील रहिवाशांना सामाजिक मूल्यांची जाण असते. ते परिग्राम स्थानाबाबत संशोधन करतात तसेच इतरांना परिग्राम स्थान दर्शवितात.
परिग्राम संकल्पनेचे महत्त्व जगातील इतर देशांप्रमाणे भारतातील लोकांच्याही लक्षात आले आहे. कर्नाटक, पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत व चंडीगढ या संघराज्य क्षेत्रात परिग्राम संकल्पनेतून प्रकल्पांची उभारणी होत आहे. महाराष्ट्र राज्यात परिग्राम ही संकल्पना वेगळ्या स्वरूपात स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सु. १४,००० खेडी पर्यावरण संतुलित समृद्धग्राम योजने – अंतर्गत निवडली गेली असून त्यांच्यामार्फत पर्यावरण पूरकग्राम विकासाला चालना देण्यात येत आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पुढील वैशिष्टये आहेत : गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे गाव परिसरात लावणे व जगवणे, गाव हगणदारीमुक्त करणे, प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणणे, सौर पथदिवे लावणे, घन कचरा गोळा करून खतनिर्मिती करणे आणि सांडपाण्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करणे. प्रत्येक गाव पर्यावरणसमृद्ध व्हावे, यासाठी सामाजिक सहभाग असणे महत्त्वाचे आहे.