सुगरण (प्लाेसियस फिलिपिनस)

(बाया विव्हर). सुरेख घरट्यांकरिता प्रसिद्ध असणारा पक्षी. सुगरण पक्ष्याचा समावेश पॅसेरिफार्मिस गणाच्या प्लोसीइडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव प्लोसियस फिलिपिनस आहे. तो आग्नेय आशिया आणि भारतीय उपखंडात आढळतो. त्यांच्या एकूण पाच उपजाती असून प्लो. फि. फिलिपिनस ही जाती भारत, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ या देशांत सर्वत्र आढळते. त्यांना ‘बाया पक्षी’ असेही म्हणतात. त्यांनी विणलेल्या गुंतागुंतीच्या घरट्यांसाठी हा पक्षी ओळखला जातो.

सुगरण पक्षी आकारमानाने चिमणीएवढा असतो. त्याच्या शरीराची लांबी सु. १५ सेंमी. असते. सुगरण पक्ष्याचे नर-मादी दोघेही चिमणीच्या मादीसारखे दिसतात. नर आणि मादी दोघांचाही रंग पिंगट-तपकिरी असून पंख आणि शेपटी गडद तपकिरी असते; पोटाकडील भाग पांढरा असतो. चोच मजबूत, शंकूसारखी आणि खुरांच्या रंगासारखी असते. भुवया लांब, फिकट पिवळ्या असतात. विणीच्या हंगामात, साधारणपणे मे महिन्याच्या सुमारास नराच्या तोंडाकडील डोक्याच्या दोन्ही बाजू, हनुवटी व गळा काळसर-तपकिरी रंगाचा, तर छाती व डोक्याचा उरलेला भाग चकचकीत पिवळा होतो.

सुगरण पक्षी थव्याने राहतात. कापणी झालेल्या शेतांत तसेच शेतीलगतच्या प्रदेशांत अन्नासाठी ते थव्याने येतात आणि भात तसेच इतर धान्य फस्त करून टाकतात. त्यामुळे ते उपद्रवी समजले जातात. तलावाच्या काठांवरील वेळूच्या बनात, झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत ते रात्री आसरा घेतात. घरट्यासाठी गवत तसेच अन्न मिळविण्यासाठी ते गिनी गवत, भात यांवर अवलंबून असतात. काही वेळा ते लहान कीटक, बेडूक, मॉलस्क खातात. त्यांचा आवाज चिमणीसारखा ‘चिवचिव’ असा असतो. विणीच्या हंगामात त्यांच्या आवाजाची तीव्रता वाढते.

सुगरण पक्ष्याचा विणीचा हंगाम मे–सप्टेंबर असतो. जेथे अन्न, पाणी आणि घरटे बांधण्यासाठी साहित्य मिळेल अशा ठिकाणी ते घरटे बांधतात. सुगरण नर घरटे बांधतो. एखाद्या वसाहतीप्रमाणे त्यांची घरटी असून त्यांच्या वसाहतीत साधारणपणे २०–३० घरटी असतात. एखाद्या मध्यम उंचीच्या वृक्षाच्या मध्यभागी, तर काही वेळा उंच वृक्षांच्या पानांच्या टोकाशी ती लटकताना दिसतात. घरटे पालथ्या चंबुसारखे असून मध्यभागी अंडकोठी असते आणि अंडकोठीला लागून घरट्यात प्रवेश करण्यासाठी कोठीपेक्षा किंचित लांब नलिकेच्या आकाराचे दार असते. घरटे विणण्यासाठी गवत, भात, केळी यांची पाने, ताड-माड यांच्या पानांपासून तोडलेल्या धागेवजा पट्ट्यांचा सुगरण पक्षी वापर करतात. प्रत्येक पट्टी २०–६० सेंमी. लांब असते. एका घरट्यासाठी साधारणपणे ५०० पट्ट्या नर वापरतो. घरटे विणताना पट्ट्या तयार करून गोळा करण्यासाठी, विणण्यासाठी आणि गाठी बांधण्यासाठी तो त्याच्या चोचीचा वापर करतो. घरटे बऱ्याचदा एखाद्या बाभळीच्या झाडाला किंवा ताड-माडासारख्या उंच झाडाला लटकलेले असते. शहरांत एखाद्या मुख्य रस्त्यावरील झाडावर किंवा तारांवर त्यांची घरटी लटकताना दिसतात. भारतात मान्सूनपासून बचाव करण्यासाठी ते झाडाच्या पूर्व दिशेला घरटी बांधतात.

सुगरण पक्षी सुरुवातीला फांदीभोवती पट्ट्या घट्ट विणून लहानसा मजबूत दोर विणून घेतात. या दोरालाच घरटे लटकलेले असते. नंतर दोराच्या मोकळ्या टोकातील पट्टीमध्ये दुसऱ्या पट्ट्या गुंतवून घरट्याचे बूड तयार करतात. बुडाचा आकार घंटेसारखा असतो. बूड पुरेसे रुंद झाल्यावर त्याचे दोन भाग करून त्यांपैकी एक भाग बंद करून त्याला फुगीर आकार देतात. हा बंद भाग म्हणजे ‘अंडकोठी’. मादी येथेच अंडी घालते. दुसरा भाग विणून लांब, नळकांड्यासारखा बनविलेला असतो; तो भाग लोंबता, खालच्या बाजूने उघडा असतो. तेथून सुगरण पक्षी घरट्यात शिरतात.

नर सुगरण पक्ष्याला एक घरटे पूर्ण करायला साधारणपणे १८ दिवस लागतात. त्यांपैकी अंडकोठी आठ दिवसांत तयार होते. अंडकोठी पूर्ण होण्याच्या सुमारास नर आपल्या पंखांची फडफड आणि चिवचिव करून माद्यांना घरटे पाहायला आमंत्रित करतो. माद्या घरट्याची पाहणी करतात आणि घरटे आवडले तर नराची निवड करतात. मादी निश्चित झाली की, नर घरट्याचे दार तयार करून घरटे पूर्ण करतो, तर मादी घरट्याच्या आतला भाग चिखलाने लेपते.

सुगरण नर-मादी दोघेही बहुलिंगाश्रयी असतात. घरटे अर्धे बांधून झाले की, नर माद्यांकडे प्रियाराधना करू लागतो आणि जोडीदार निश्चित झाल्यावर नर घरटे पूर्ण करतो. मादी एकावेळी २–४, पांढरी अंडी घालते आणि १४–१७ दिवस उबवते. काही वेळा नर पिलांना अन्न भरवितो. १७ दिवसांनी पिले उडून जातात. एका मादीची वीण झाल्यानंतर नर दुसऱ्या मादीबरोबर जातो. त्यासाठी तो अर्धवट स्थितीत असलेल्या घरट्यांचा वापर करतो. त्यांच्यात पिलावळ परजीविता असल्यामुळे काही वेळा मादी वेगळ्या, दुसऱ्या घरट्यात जाऊन अंडी घालते. चार-सहा महिन्यांत पिलांची पिसे गळून पडतात. पिले घरट्यांपासून वेगळ्या जागी, किंचित दूर राहतात. मादी पुन्हा विणीसाठी एका वर्षानंतर तयार होते, तर नराला पुन्हा जननक्षम व्हायला दीड वर्षे लागतात. वीण होण्यापूर्वी नर-मादी मैथुनपूर्व कात टाकतात. तसेच विणीनंतर सुगरणाची नर-मादी पुन्हा कात टाकतात. अशा प्रकारे सुगरण पक्षी वर्षातून दोनदा कात टाकतात. सुगरण पक्ष्याचे आयुर्मान १० ते १५ वर्षे असते.

सुगरण पक्ष्याची घरटी काटेरी वृक्षांवर आणि पाण्यावर लटकती असल्याने सुरक्षित असतात. परंतु कधीकधी कावळे त्यांच्या घरट्यांवर हल्ला करतात, तर सरडे, उंदीर त्यांच्या पिलांना खाऊन टाकतात. मुनियासारखे पक्षी त्यांच्या रिकाम्या घरट्यांचा वापर करतात.