बारतोंडी हा सदाहरित वृक्ष रुबिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मोरिंडा सिट्रिफोलिया आहे. कदंब व कॉफी हे वृक्षदेखील याच कुलातील आहेत. मोरिंडा प्रजातीतील आठ जाती भारतात आढळतात. बारतोंडी हा वृक्ष मूळचा दक्षिण-पूर्व आशिया ते ऑस्ट्रेलिया या भागातील असून तो जगातील सर्व उष्ण प्रदेशांत आढळून येतो. भारतात बिहार, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू इ. राज्यांतील वनांत तो आढळतो. बाजारात बारतोंडीची फळे नोनी या नावाने प्रसिद्ध आहेत.

बारतोंडी (मोरिंडा सिट्रिफोलिया): १) वृक्ष, (२) फुलोरा व त्यातील फुले, (३) संयुक्त फळ

बारतोंडी वृक्ष काहीसा वेडावाकडा असून ९ मी.पर्यंत उंच वाढतो. साधारणपणे १८ महिन्यांत त्याची वाढ पूर्ण होते. खोडावरील साल खडबडीत, भेगाळलेली व बदामी रंगाची असते. पाने साधी, मोठी, समोरासमोर, गडद हिरवी व चकचकीत असतात. फुलोरा गोलसर स्तबकासारखा असून फुले लहान, पांढरी व सुवासिक असतात. ती वर पसरट व सुट्या पाकळ्यांची आणि खाली नळीसारखी असतात. या वृक्षाला वर्षभर फुले आणि फळे येतात. फळ संयुक्त असून त्यात फुलोऱ्यातील सर्व फुलांपासून बनलेल्या फळांचा समूह असतो. फळ सुरुवातीला हिरवे असते. काही काळाने ते पिवळे होऊन पिकल्यावर पांढरे होते. फळात अनेक बिया असतात.

बारतोंडीची मुळे, पाने व फळे औषधी आहेत. मूळ विरेचक असून गाऊट विकारात सांध्यांमध्ये यूरिक आम्ल साठून वेदना होतात अशा व‍िकारात मुळाचा किंवा पानांचा रस बाहेरून लावतात. तसेच मुळांचा उपयोग विंचूदंशावर वेदनाशामक म्हणून होतो. फांद्यांपासून लाल रंग मिळतो. त्याचा उपयोग कापड व लोकर रंगविण्यासाठी, तसेच हातपाय रंगविण्यासाठी करतात. खोडाचे लाकूड मजबूत असल्यामुळे त्याचा वापर बंदुकीचे दस्ते, हत्यारांच्या मुठी, कंगवे, फण्या आणि बैलगाडी व नांगराचे जू करण्यासाठी करतात. फळांत कर्बोदके, जीवनसत्त्व आणि निॲसीन (म्हणजे ब३ जीवनसत्त्व), आयर्न (लोह) व पोटॅशियम असते. बियांपासून मिळालेल्या तेलात लिनोलीइक आम्ल असते. हे तेल त्वचेचा दाह कमी करण्यासाठी आणि ती ओलसर राहण्यासाठी त्वचेला चोळतात. बिया भाजून खातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा