प्राकृत जैन साहित्यातील कथात्मक स्वरूपाचा महत्त्वाचा ग्रंथ. भद्रेश्वरसूरी यांनी सुमारे ११ व्या शतकात याची रचना केली. ते प्रसिद्ध जैन आचार्य अभयदेवसूरी यांचे गुरु होते.कहावलीची रचना प्राकृत गद्यात असून काही ठिकाणी पद्याचा वापर केलेला दिसून येतो. ग्रंथाची भाषा चूर्णीच्या जवळची असून जुन्या गुजराथी भाषेत आणि यात साम्य दिसून येते. श्वेताम्बर जैन आगम ग्रंथावरील टीकेला चूर्णी असे म्हणतात. यात प्राकृत आणि संस्कृत या दोन्ही भाषांचा वापर केलेला असतो. आलंकारिक तसेच अवजड भाषा टाळून अत्यंत सरळ अशा प्राकृत भाषेत लिहिलेला हा ग्रंथ मुख्यत: संकलन स्वरूपाचा असून, यामध्ये अध्यायांची विभागणी केलेली नाही. यामध्ये एकामध्ये एक गुंफलेल्या पद्धतीने कथा येतात. कहावली म्हणजे कथांची आवली, ओळ. याची स्वत:ची अशी विशिष्ट शैली असून एक कथा संपली की, पुढची कथा आधीच्या कथेशी जोडून घेतलेली आहे.
ही कथानके निरनिराळ्या प्रकारची आहेत. चोवीस तीर्थंकर, बारा चक्रवर्ती, नऊ वासुदेव, नऊ प्रतिवासुदेव, नऊ बलदेव अशा ६३ महापुरुषांची (शलाकापुरुष), तसेच नारद इ. अनेक प्रसिद्ध महापुरुष, राजा, श्रावक इत्यादींची चरित्रे यामध्ये येतात. तीर्थंकरांचे आणि वासुदेव यांच्या पूर्वीचे तसेच पुढील जन्म (भव) यांचीही वर्णने येथे आहेत. कालकाचार्यांपासून हरिभद्रसूरीपर्यंतच्या प्रमुख आचार्यांच्या जीवनचरित्रांचे वर्णन यात आहे. भारतीय विद्वान पद्मभूषण दलसुख मालवणीय यांच्या मते भद्रेश्वरांना त्यांच्यापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या लोकांची चरित्रे यात अंतर्भूत करावयाची होती, परंतु ते काम पूर्ण झाले नाही. नंतरच्या काळात हेमचंद्राने लिहिलेल्या त्रिषष्ठीशलाकापुरुषमहाचरित (१२ वे शतक) ही रचना या ग्रंथावर आधारित आहे. यातील थेरावलीचरियं मधील मजकुराचा उपयोग हेमचन्द्राने स्थविरावलीचरिताच्या परिशिष्टपर्वात केला आहे. या ग्रंथातील रामायण कथा विमलसूरींच्या पउमचरियं वर (३-४ थे शतक) आधारित आहे. मात्र यातील काही प्रसंग निराळे आहेत. उदा. सीतेला गर्भावस्थेत स्वप्न पडते, त्यात तिला दोन पराक्रमी पुत्र होणार आहेत असे दिसते.तसेच सीतेकडून रावणाचे वर्णन ऐकून त्याचे चित्र काढले जाते, असे अनेक प्रसंग वेगळे आहेत. प्राकृत कथासाहित्यामधील भद्रेश्वरांचे हे महत्त्वाचे काम पुढील प्रबंधसाहित्यासाठी आदर्श ठरले. प्रबंधसाहित्यात ऐतिहासिक अथवा अर्ध-ऐतिहासिक कथानक असून पूर्वी होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची चरित्रे येतात. गुजरात आणि माळवा प्रांतांतील जैन साहित्यात प्रबंध साहित्य प्रसिद्ध आहे. श्री हेमचंद्राचार्य ज्ञानमंदिर, पाटण, गुजरात येथे कहावलीचे ताडपत्रावरील अतिशय जीर्ण असे हस्तलिखित आहे. या हस्तलिखिताची नवीन प्रत अहमदाबादच्या एल.डी. इन्स्टिट्यूट ऑफ इंडॉलॉजी येथे आहे.
संदर्भ :
- कीर्तिविजय,मुनिकल्याण (संपा.), कहावलि, श्रीविजयनेमिसूरिश्वरजी स्वाध्याय मंदिर, अहमदाबाद,२०१२.
- चौधरी, गुलाबचंद, जैन साहित्य का बृहद् इतिहास -भाग ६, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९७३,
समीक्षक – कमलकुमार जैन
पहिला माहितीपूर्ण लेख.