अमोनियाच्या (NH3) एक, दोन किंवा तिन्ही हायड्रोजन अणूंच्या जागी एकसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांची प्रतिष्ठापना करून अमोनियापासून मिळणाऱ्या कार्बनी संयुगांचा एक गट.

आ. १. अमोनिया प्रतिष्ठापन : प्राथमिक, द्बितीयक आणि तृतीयक अमाइने.

अमोनिया प्रतिष्ठापन : अमोनियातील एका अणूचे प्रतिष्ठापन केल्यास प्राथमिक अमाइने, दोन अणूंचे प्रतिष्ठापन केल्यास द्वितीयक अमाइने व तिन्ही अणूंचे प्रतिष्ठापन केल्यास तृतीयक अमाइने मिळतात.

अमोनियातील हायड्रोजनांच्या जागी एकाच प्रकाराच्या मूलकांची प्रतिष्ठापना केल्यास मिळणाऱ्या द्वितीयक व तृतीयक अमाइनांना साधी अमाइने असे म्हणतात. भिन्न प्रकारांचे मूलक असल्यास मिळणाऱ्या अमाइनांना मिश्र अमाइने असे म्हणतात.

आ. २. अमोनिया प्रतिष्ठापन : इमाइने आणि सायनाइडे.

अमोनियाच्या दोन हायड्रोजन अणूंचे प्रतिष्ठापन द्विसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांनी केल्यास मिळणाऱ्या संयुगांना इमाइने असे म्हणतात. ही संयुगे अमाइनांहून वेगळ्या प्रकाराचीअसतात, तसेच तीन हायड्रोजन अणूंचे प्रतिष्ठापन त्रिसंयुजी हायड्रोकार्बन मूलकांनी केल्यास सायनाइडे वा नायट्राइले ह्या प्रकारांची संयुगे मिळतात.

ज्या संयुगांमधील नायट्रोजन अणू हा वलयी संयुगाचाच एक घटक असतो, अशा संयुगांनाही अमाइने म्हटले जाते. परंतु सामान्यतः त्यांचा समावेश विषमवलयी संयुगांमध्ये करतात.

आ. ३. विषमवलयी संयुगांची उदाहरणे.

नामकरण पध्दती : IUPAC पध्दती : या पध्दतीमध्ये -ॲमिनो या नावाने प्रतिष्ठापित घटक पूर्वप्रत्यय (prefix) म्हणून संबोधला जातो आणि अल्किल गटाला पायाभूत घटक संबोधतात. द्वितीयक व तृतीयक संयुगांमध्ये सर्वांत दीर्घ कार्बन साखळीला शेवटी लिहितात आणि त्यावरील प्रतिष्ठापित घटक चढत्या क्रमाने लिहितात.

रासायनिक पध्दती : या पध्दतीमध्ये -अमाइन हा प्रत्यय (suffix) अल्किल गटाला दिला जातो. द्वितीयक व तृतीयक संयुगांमध्ये N- हा पूर्वप्रत्यय प्रतिष्ठापित घटकासमोर दिला जातो.

सामान्य पध्दती : या पध्दतीमध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार (alphabetical order) अल्किल गट  -अमाइन या प्रत्ययासोबत लिहितात.

तक्ता : नामकरण पध्दती
संरचना IUPAC पध्दती रासायनिक पध्दती सामान्य पध्दती

(१ अमाइन)

1-ॲमिनोब्युटेन

ब्युटेनामाइन

n-ब्युटिल अमाइन

 

(१ अमाइन)

2-ॲमिनो-2‍- मिथिलप्रोपेन

2-मिथिल-2-प्रोपेनामाइन

tert-ब्युटिल अमाइन

(२ अमाइन)

1-मिथिलॲमिनोप्रोपेन

N‍-‍ मिथिलप्रोपेनामाइन

मिथिलप्रोपिलअमाइन

(३ अमाइन)

डायमिथिलॲमिनोइथेन

N,N- डायमिथिलइथेनामाइन

एथिलडायमिथिलअमाइन

भौतिक गुणधर्म : अमाइने अल्कधर्मी असून त्यांना विशिष्ट उग्र वास असतो. चार कार्बनी शृंखलेपर्यंत अमाइने जलविद्राव्य असतात, तर उच्च अमाइने जलविद्राव्य नसतात. चार कार्बनी शृंखलेपर्यंत अमाइने द्रव स्वरूपात असतात, तर उच्च अमाइने स्थायू स्वरूपात असतात. अरिल अमाइने रंगहीन असतात परंतु हवेशी संपर्क आल्यास ऑक्सिडीकरणामुळे त्यांना रंग प्राप्त होतो.

रासायनिक विक्रिया : (१) कार्बिलअमाइन  विक्रिया : ही विक्रिया प्राथमिक अमाइने ओळखण्यासाठी वापरली जाते. ॲलिफॅ‍टिक व ॲरोमॅटिक प्राथमिक अमाइने क्लोरोफॉर्म व पोटॅशियम हायड्रॉक्साइडासोबत तापविली असता कार्बिलअमाइन (आयसोसायनेट) तयार होते. याला उग्र वास असतो.  द्वितीयक व तृतीयक अमाइने या  विक्रियेला उदासीन असतात

(२) डायाझोटीकरण (Diazotization) : ॲरोमॅटिक प्राथमिक अमाइनाची नायट्रस अम्लासोबत विक्रिया होऊन डायाझोनियम लवणे तयार होतात. या विक्रियेला डायाझोटीकरण असे म्हणतात.

(३) संयुग्मीकरण विक्रिया (coupling reaction): दोन ॲरोमॅटिक वलयी संयुगे -N=N- बंधाने जोडली गेली असता तिला संयुग्मीकरण विक्रिया असे म्हणतात. उदा., बेंझिनडायॲझोनियम लवणाची फिनॉल वा ॲरोमॅटिक अमाइनांसोबत विक्रिया झाली असता ॲझो संयुगे तयार होतात.

(४) ॲमिनोविच्छेद (Ammonolysis) : जेव्हा अल्किल हॅलाइडाची अमोनियासोबत विक्रिया होते तेव्हा हॅलोजन संघ हा ॲमिनो संघाद्वारे प्रतिष्ठापित (substitution) केला जातो. या विक्रियेमध्ये अमोनियाच्या साहाय्याने कार्बन व हॅलोजन यांमधील बंध तोडला जातो, त्यामुळे यास ॲमिनोविच्छेद असे म्हणतात.

प्रतिष्ठापित अमोनियम लवणाची सोडियम हायड्रॉक्साइडासोबत विक्रिया झाली असता अमाइन तयार होते.

यामध्ये प्राथमिक अमाइन हे प्रमुख उत्पाद तर द्वितीयक, तृतीयक व अमोनियम लवण (quaternary ammonium salts) हे उपउत्पाद असतात.

(५) ॲसिटिलीकरण (Acetylation) : ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक प्राथमिक व द्वितीयक अमाइनांची अम्ल क्लोराइड, अनहायड्राइडे किंवा एस्टरांसोबत विक्रिया झाली असता        –NH2 किंवा –NH संघातील हायड्रोजन अणू ॲसिटिल संघाने प्रतिष्ठापित होतो आणि अमाइड तयार होते.

अमाइनांची विक्रिया बेंझॉइल क्लोराइडासोबत झाली असता याच विक्रियेला बेंझॉयलेशन (benzoylation) असे म्हणतात.

 उपयोग : (१) अम्‍लांशी विक्रिया होऊन लवणे तयार होण्याच्या अमाइनांच्या गुणधर्मामुळे गंजनिरोधक म्हणून सजल विद्रावांमध्ये त्यांचा उपयोग करण्यात येतो. (२) हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डाय-ऑक्साइड ह्यांसारखे वायू इतर वायूंपासून वेगळे करण्यासाठी तसेच विविध प्रकारांची पायसे बनविण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. (३) काही रसायनांच्या निर्मितीत बऱ्याच अमाइनांचा महत्त्वाचा पदार्थ म्हणून उपयोग करतात. (४) रंजक निर्मितीत व रबर रसायनांच्या निर्मितीत ॲरोमॅटिक अमाइनांचा उपयोग करण्यात येतो.

पहा : अमोनिया, अमोनिया लवणे, ॲझो संयुगे, ॲसिटिलीकरण, डायाझोटीकरण.