बियांमध्ये एक बीजपत्र असणार्या सपुष्प वनस्तींना एकदलिकित वनस्पती म्हणतात. या वनस्पतींच्या ५०,०००-६०,००० जाती असून त्यांपैकी सर्वांत जास्त म्हणजे सु. २०,००० ऑर्किडच्या (आमराच्या) जाती आहेत. या वनस्पतींची मुळे तंतुमय व आंगतुक असून खोड लहान व शाखा-उपशाखा नसलेले असते. काही वनस्पतींचे खोड, सरळ व उंच वाढते. पानांचा शिराविन्यास समांतर प्रकारचा असतो. फुलांचे भाग तीनच्या पटीत ३,६ किंवा ९ असतात.
एकदलिकित वनस्पतींचा प्रसार प्रामुख्याने वार्याद्वारे घडून येतो. या वनस्पती मुख्यत: खुज्या असल्या, तरी नारळ, ताड व माड यांसारखे उंच वृक्षही आढळतात. फुले लहान व साध्या तृणपूर्ण फुलोर्यात असतात. ऑर्किडची (आमराची) फुले वैचित्र्यपूर्ण असतात.
एकदलिकित वनस्पतींच्या गटामधील पोएसी कुलातील तृण वनस्पती या आर्थिक दृष्टया महत्त्वाच्या आहेत. उदा., गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे नारळ, केळी, ऊस, बांबू इत्यादी.
काही तज्ञांच्या मते एकदलिकित वनस्पती सर्वांत अधिक उत्क्रांत झालेल्या आहेत.