समतापी प्राण्यांवर आढळणारा संधिपाद संघातील परजीवी कीटक. माणसाच्या डोक्यात आढळणारी ऊ ही पेडिक्यूलिडी कुलातील कीटक असून तिचे शास्त्रीय नाव पेडिक्यूलस ह्यूमॅनस कॅपिटीस असे आहे. कीटक वर्गात उवांचा समावेश होत असला तरी त्यांना पंख नसतात.

या कीटकाची लांबी १.५-३.५  मिमी., आकार चपटा व रंग मळकट पांढरा असतो. डोके लहान असून त्यावर संयुक्त नेत्र, शृंगिका आणि मुखांगे असतात. उदर नऊ  खंडांचे बनलेले असते. पायाच्या तीन जोड्या असून प्रत्येक पायास शेवटी आकड्यासारख्या नख्या असल्याने डोक्याच्या त्वचेला ऊ घट्ट पकडून ठेवते. सुईसारख्या मुखांगांनी ऊ आश्रयीचे (ज्यावर ती जगते त्याचे) रक्त शोषते. मुखांगाचे टोचणे क्लेषकारक व तापदायक असते. उवांची अंडी लांबट पांढरी असून डोक्यावरील केसांना, चिकटून घातली जातात. याच अंड्यांना लिखा म्हणतात. ७-८ दिवसांनी लहान उवा बाहेर पडतात ; १५-१९ दिवसांत त्या वाढतात व त्यानंतर १-३ दिवसांत प्रजननास योग्य होतात. यांची पैदास फार झपाट्याने होते.

माणसाच्या अंगावर आणि जांघेत वेगळ्या प्रजातीच्या उवा आढळतात. या उवा थिरीडी कुलातील असून त्यांचे शास्त्रीय नाव थिरस प्यूबिस असे आहे. या उवांद्वारे टायफस ज्वराचा प्रसार होतो. जीवाणू आणि विषाणू या दोन्हींचे काही गुणधर्म असणारे रिकेटसिया सूक्ष्मजीव उवांमध्ये असतात. केवळ चावल्यामुळे नाही तर कातडीस चिरटलेल्या उवा अगर त्यांची विष्ठा लागूनही ज्वराचा प्रसार होतो. गर्दी, अस्वच्छता, कपडे, पांघरुणे, कंगवे यांद्वारे उवांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी स्वच्छता, कीटकनाशक द्रव्यांचा वापर इ. प्रतिबंधक उपाय योजतात.

माणसांप्रमाणे शेळ्या, घोडे, कुत्रे, डुकरे, उंदीर, खारी, हत्ती यांवर, तसेच सील, वॉलरस इ. सागरी सस्तन प्राण्यांवरही उवा आढळतात. काही प्रकारच्या उवा पक्षी आणि मासे यांवरही आढळतात. सस्तन प्राण्यांवरील उवा सायफन्क्युलेटा (अ‍ॅनोप्ल्यूरा) गणात आणि पक्ष्यांवरील उवा मॅलोफॅगा गणात मोडतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा