पर्वतावरील वृक्षरेषेहून अधिक उंचीच्या प्रदेशात वाढणार्या वनस्पती. उंच पर्वताच्या शिखराकडे वर जाताना आणि ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना वृक्षरेषेपुढील क्षेत्रात वृक्षांची वाढ होऊ शकत नाही. आल्प्स, हिमालय आणि इतर उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये वृक्षरेषेपेक्षा अधिक उंचीवरील भागात आल्पीय वनस्पती आढळतात. वृक्षांचे अस्तित्व संपून झुडपांची उंची कमी झालेली आढळते. अतिउंच डोंगरावर लहान झुडूपवजा वनस्पती असते. त्यानंतर पर्वतीय शाद्वले व कुरणे यांचा पट्टा असतो. हा उंच गवताचा प्रदेश असतो. त्यापुढे अधिक उंचीवर वनस्पती समुदाय अधिक विरळ होत जातो. शेवटी फक्त उघड्या खडकावरची शेवाळी व शैवाक (दगडफुलेच) आढळतात. कारण इतक्या उंचीवर बर्फाचे थर कमी-अधिक प्रमाणात सतत असतात. शाद्वले, शैवले, हरिता, शैवाक इत्यादींचा आल्पीय वनस्पतीत समावेश होतो.
भारतातील हिमालयात आल्पीय वनस्पतींची मर्यादा समुद्रसपाटीपासून सु. ४,८०० मी. पर्यंत आहे. हिमालयातील आल्पीय वनात पाइनची खुरटी व विरळ झुडपे आहेत. याखेरीज बचनाग, उदसलाप, लॉर्कस्पर, भूतकेस इ. वनस्पतींच्या प्रजातीतील काही झुडपे आहेत. हिमालयातील दगडफूल या आल्पीय वनस्पतीचा उपयोग मसाल्याचे पदार्थ तसेच मेहंदी म्हणून केला जातो.