एखाद्या व्यक्तीची त्याच्या जनुकीय साहित्याच्या (डीएनए) विश्लेषणाद्वारा ओळख करून घेण्याच्या तंत्राला ‘डीएनए अंगुलीमुद्रण’ म्हणतात. मानवी पेशीत गुणसूत्राच्या स्वरूपात डीएनएचे रेणू सुव्यवस्थित गुंडाळलेले असतात. एखाद्या व्यक्तीचे डीएनए अंगुलीमुद्रण करणे आणि त्याचे पूर्ण जीनोम शोधणे, या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. सर्व व्यक्तींमध्ये डीएनए मधील बेसजोड्यांचा अनुक्रम सारखा असतो. मात्र डीएनएचा काही भाग हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून (एकयुग्मनजी जुळी सोडून) भिन्न आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. प्रगत जीवरासायनिकी आणि जैवभौतिकी तंत्रे वापरून ही भिन्नता शोधता येते. जगातील दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच कोणत्याही दोन व्यक्तींच्या डीएनएची छायाचित्रे वेगळी असतात. म्हणून या तंत्राला डीएनए अंगुलीमुद्रण म्हणतात. मात्र या तंत्रात हाताच्या बोटांच्या ठशांची तुलना केली जात नाही.

सामान्यपणे एखाद्या गुन्ह्यात किंवा न्यायालयीन खटल्यात गुन्हेगाराची ओळख पटण्यासाठी तसेच जैविक नाते सिद्ध करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. या तंत्रात न्यायवैज्ञानिक (फॉरेन्सिक सायंटिस्ट) संबंधित व्यक्तीच्या पेशींपासून डीएनएचे रेणू मिळवितात. या चाचणीसाठी शरीरद्रव्यातील कोणतीही पेशी किंवा हाडे, रक्त, केस किंवा दात इत्यादी ऊती वापरता येतात.

गुन्ह्याच्या दाखल्यात, प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेले डीएनए आणि संशयित गुन्हेगाराचे डीएनए यांची तुलना करतात. या तुलनेच्या आधारे प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या डीएनए स्रोतानुसार एखादी संशयित व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही, हे ठरवितात. अनेक देशांमध्ये गुन्हेगारांची जनुकीय माहिती एका मध्यवर्ती ठिकाणी संग्रहित करून ठेवलेली असते. त्यामुळे प्रत्यक्ष गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या डीएनएची तुलना संगणकाद्वारे केल्यास गुन्ह्यांचा तपास कमी वेळात करता येतो.

डीएनए अंगुलीमुद्रण तंत्राचा वापर पालकत्वाचा वाद सोडविण्यासाठी केला जातो. मुलांचे डीएनए आणि पालकांचे डीएनए यामध्ये काही विशिष्ट भाग सारखा असतो . मुलांमध्ये अर्धे डीएनए मातेकडून तर अर्धे पित्याकडून आलेले असतात. त्यामुळे दोन व्यक्तींचा मूल आणि मातापिता असा संबंध शोधता येतो

१९८४ साली अ‍ॅलेक जेफ्री या ब्रिटिश वैज्ञानिकाने हे तंत्र शोधले आणि १९८७ सालापासून या तंत्राचा वापर करण्यास सुरुवात झाली. यात अपकेंद्री पद्धतीने डीएनएचे कमी घनतेचे आणि जास्त घनतेचे असे दोन भाग वेगळे करतात. डीएनए अंगुलीमुद्रण करताना कमी घनतेच्या भागाचे विश्लेषण केले जाते. डीएनएवरील बेसक्रम व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन स्वरूपात असतो. डीएनएच्या अव्यक्त अशा भागापासून प्रथिननिर्मिती होत नाही. सामान्यपणे अव्यक्त डीएनएचे प्रमाण व्यक्त डीएनएच्या प्रमाणाहून अधिक असते. डीएनएचा कमी घनतेचा भाग अव्यक्त असतो. डीएनएच्या या भागाला सॅटेलाइट डीएनए म्हणतात.

डीएनए अंगुलीमुद्रण तंत्राचे टप्पे

डीएनए अंगुलीमुद्रण तंत्राचे पुढीलप्रमाणे टप्पे आहेत : (१) प्रथम पेशीतील डीएनए वेगळा करतात. (२) वेगळ्या केलेल्या डीएनएचे निर्बंधकारी विकर (रेस्ट्रिक्शन एंझाइम) वापरून तुकडे केले जातात. ही विकरे विशिष्ट बेसक्रम ओळखतात आणि तो विशिष्ट ठिकाणी तोडतात. झालेले तुकडे वेगवेगळ्या लांबीचे असतात आणि त्यात काही ज्यांच्यामध्ये विशिष्ट बेसक्रम पुन:पुन्हा येतात असे खंड येतात. या खंडामध्ये पुन:पुन्हा येणाऱ्या बेसक्रमांची संख्या वेगवेगळी असू शकते. त्यांना व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट (व्हीएनटीआर) अशी इंग्रजीत संज्ञा आहे. (३) जेल विद्युत् कणसंचलन (इलेक्ट्रोफोरेसीस) पद्धतीने हे खंड त्यांच्या लांबीनुसार अलग केले जातात. (४) या खंडांना अल्कली माध्यमात ठेवले जाते. त्यामुळे त्यांच्यातील डीएनएच्या दोन साखळ्या (स्ट्रँडस्) एकमेकांपासून वेगळ्या होतात. (५) यानंतर सदर्नब्लॉट तंत्र वापरून या खंडांचे पट्टचित्र घेतले जाते. या तंत्रात किरणोत्सारी पद्धतीने अंकित (टॅग) केलेल्या एषणीचा (प्रोब) वापर केला जातो. ही एषणी म्हणजे एकच साखळी (स्ट्रँड) असलेला ज्ञात बेसक्रम असलेला डीएनएच असतो. हा बेसक्रम नमुना डीएनएमध्ये अपेक्षित असणाऱ्या बेसक्रमाशी पूरक असतो. वैज्ञानिकांनी अशा वेगवेगळ्या एषणी विकसित केल्या आहेत. (६) सदर्नब्लॉट तंत्राद्वारे मिळालेले व्हीएनटीआर खंडाचे पट्टचित्र प्रत्येक व्यक्तीचे अनन्य खूण असते आणि त्यावरून संबंधित व्यक्तीची ओळख पटते. भारतात सेंटर फॉर सेल अँड मोलेक्युलर बायोलॉजी (हैद्राबाद) या संस्थेने या तंत्रासाठी लागणाऱ्या एषणी विकसित केलेल्या आहेत.