
अबोली हे अॅकँथेसी कुलातील बहुवर्षायू झुडूप असून ते क्रॉसँड्रा इन्फंडिबुलिफॉर्मिस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. याचे मूळ स्थान श्रीलंका असून भारतात व मलेशियात याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही भाग तसेच किनारी प्रदेशात या झुडुपाची लागवड केली जाते.
अबोलीचे झुडूप सुमारे ६० सेंमी. उंच असते. त्याची पाने साधी, समोरासमोर व कडा तरंगांप्रमाणे असतात. फुलोरा गव्हाच्या लोंबीसारखा असून त्यावर लांबट, हिरव्या व केसाळ सहपत्रांच्या बगलेत सुंदर, नाजूक, फिकट पिवळसर किंवा नारिंगी (अबोली) फुले येतात. शुष्क फळामध्ये चार बिया असतात. शुष्क फळांवर जेव्हा पाण्याचा शिडकावा होतो तेव्हा फट् फट् असा आवाज करून ती फळे तडकतात आणि आतील बिया इतस्ततः विखुरल्या जातात. फटाक्याप्रमाणे आवाज करून बीजप्रसारण करण्याच्या या गुणधर्मामुळेच या वनस्पतीला इंग्रजीत फायर क्रॅकर फ्लॉवर असे नाव मिळाले आहे.
अबोलीच्या झुडुपाला एकामागून एक असे सारखे बहार वर्षभर येत असतात. परंतु, ऑक्टोबर-जानेवारी दरम्यान जास्तीत जास्त फुले येतात. हार, गजरे, वेण्या यांसाठी अबोलीच्या फुलांचा खास वापर केला जातो.
आयुर्वेदानुसार अबोली ही वनस्पती कडू, उष्ण, सौंदर्यवर्धक असते. तिची मुळ्या दुधात शिजवून श्वेतप्रदरावर (पांढरी धुपणी) ते औषध म्हणून पिण्यास देतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.