साल वृक्ष (शोरिया रोबस्टा) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(साल ट्री). एक पाणझडी वृक्ष. हा वृक्ष डिप्टेरोकार्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव शोरिया रोबस्टा आहे. तो मूळचा भारतीय उपखंडातील असून हिमालयाच्या दक्षिणेला नेपाळ, भारत, बांगला देश व म्यानमार या देशांमध्ये या वृक्षाचा आढळ आहे. शोरिया प्रजातीत सु. १९६ जाती असून त्यांपैकी चार जाती भारतात आढळतात. भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, त्रिपुरा, पंजाब तसेच ईशान्य भारतापासून कन्याकुमारीपर्यंत हा वृक्ष समुद्रसपाटीपासून १००–१,५०० मी. पर्यंत आढळून येतो.

साल वृक्ष अनुकूल परिस्थितीत ४५ मी.पर्यंत वाढतो. अशा पूर्ण वाढलेल्या खोडाचा घेर १.५–२ मी. असू शकतो. या वृक्षाची वाढ खूप हळू असते. सामान्य परिस्थितीत हा वृक्ष १८–३० मी. उंच वाढतो. वृक्षाचा डेरा गोल व पसरट असतो. खोडावरची साल लाल तपकिरी किंवा करडी आणि गुळगुळीत किंवा भेगाळ असते. ताजे खोड गुळगुळीत असते आणि त्यावर उभ्या, खोल भेगा असतात. फांद्या जमिनीपासून १८–२४ मी. उंचीवर येतात. फांद्यावर पानांची गर्दी होते. पाने साधी, चकचकीत, एकाआड एक, अंडाकृती किंवा लंबगोल १०–२५ सेंमी. लांब आणि ५–१५ सेंमी. रुंद असतात. कोवळी पाने लालसर असतात, मात्र ती लवकर हिरवी दिसू लागतात. आर्द्र परिसरात वृक्ष सदाहरित असतो, परंतु उष्ण वातावरणात पाने गळून पडतात आणि मार्च-एप्रिल महिन्यांत पुन्हा येतात. फुले स्तबक प्रकारच्या फुलोऱ्यात येत असून ती लहान, नियमित, द्विलिंगी व पिवळट असतात. निदलपुंज नळीसारखा असून तो पुष्पाधाराला चिकटलेला असतो. फळे शुष्क, लंबगोल, एकबीजी, लालसर ते फिकट पिवळसर हिरवी असून प्रत्येकावर ३ किंवा अधिक पंख असतात. हे पंख निदलपुंजापासून तयार झालेले असतात. बी अंडाकृती असून त्यात दोन विषम आकाराच्या दलिका असतात. बीजांमध्ये भ्रूणपोष नसतो.

साल वृक्षाचे लाकूड अत्यंत कठीण, मजबूत आणि टिकाऊ असते. घरबांधणी, पूलबांधणी, खांब, नावा व नावेचे वल्हे, शेतीची अवजारे, सजावटीचे सामान यांसाठी ते वापरतात. खोडाच्या सालीत टॅनीन जास्त असते म्हणून कातडी कमविण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. खोडापासून एक प्रकारची राळ ‘ओलिओरेझीन’ मिळवतात. बुटाचे पॉलिश, कार्बन पेपर, रंगलेप, धूप इ.मध्ये ते वापरतात. टसर रेशमाचे कीटक साल वृक्षावर वाढवतात. उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांत पानांचा उपयोग विड्या वळण्यासाठी करतात. फुलांपासून मिळालेला मकरंद अतिसारात देतात. पळसाप्रमाणेच या वृक्षाच्या पानांपासून द्रोण, पत्रावळ्या इ. तयार करतात. बियांमध्ये १४-१५ % मेद असतात; बियांपासून तेल काढतात. ते साबणासाठी व दिव्यासाठी वापरतात. बियांतील तेल काढून घेतल्यावर उरलेली पेंड पशुपक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात. या पेंडीत प्रथिने आणि कर्बोदके यांचे प्रमाण जास्त असते.