लाल मुंग्या (फार्मायका इंडिका)

सर्वांना परिचित असलेला उपद्रवी संधिपाद कीटक. मुंगी हा कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणाच्या फॉर्मिसिडी कुलातील प्राणी आहे. या गणात मधमाश्या, गांधील माश्या, भुंगे इ. कीटकांचा समावेश होतो. जगात सर्वत्र मुंग्या आढळतात. मात्र उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत त्यांचे प्रमाण जास्त दिसून येते. मुंग्यांच्या सु. १०,००० जातींची नोंद झालेली असून भारतात सु. १,००० जाती आढळून येतात. मुंगीचा रंग तांबडा, काळा, तपकिरी किंवा विटकरी असतो. तिच्या शरीराची लांबी १–४० मिमी. असते. काळ्या मुंगीचे शास्त्रीय नाव मोनोमोरियम इंडिकम आहे. लाल मुंगीचे शास्त्रीय नाव फॉर्मायका इंडिका आहे. सामान्यपणे ज्याला मुंगळा म्हणतात ती एक प्रकारची मोठी मुंगी असते. तिचे शास्त्रीय नाव कॅंपोनोटस काँप्रेसस आहे.

मुंगळे (कॅंपोनोटस काँप्रेसस)

मुंगीच्या शरीराची बाह्यरचना इतर कीटकांसारखी असते. शरीर गुळगुळीत असून त्याचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात. डोके गोल अथवा लांबट असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंना स्पृशा आणि दोन संयुक्त डोळे व डोक्याच्या वरच्या भागावर तीन साधे डोळे असतात. टिफ्लोपोन जातीच्या मुंग्यांना डोळे नसतात. मुखांगातील जंभ (जबडे) दातेरी, तीक्ष्ण व मजबूत असतात. वक्षाचे तीन खंड असून पायांच्या तीन जोड्या असतात. प्रजननक्षम प्रौढ मुंग्यांना पंख असतात. वक्ष आणि उदर यांमध्ये कंबर असते. कंबर दोन खंडांनी बनलेली असून अरुंद असते. उदर सहा खंडांचे बनलेले असते आणि त्यात कंबरेचे दोन्ही खंड समाविष्ट असतात. उदराच्या शेवटच्या खंडावर गुदद्वार असते. बहुतांशी मुंग्यांमध्ये उदराच्या शेवटी नांगी असते आणि त्यालगत फॉर्मिक आम्लाच्या ग्रंथींची एक जोडी असते. एखाद्या व्यक्तीला जेव्हा मुंगी जंभांनी अथवा जबड्यांनी जखम करते तेव्हा ती जखमेवर फॉर्मिक आम्ल सोडते. हे आम्ल दाहक असते. म्हणूनच मुंगीने चावा घेतल्यास अथवा मुंगी हाताने चिरडल्यास फॉर्मिक आम्लामुळे शरीराचा दाह होतो. या दाहक आम्लामुळे आकारमानाने लहान असलेल्या मुंग्या बलाढ्य शत्रूलाही जुमानीत नाहीत. सर्व मुंग्यांमध्ये ग्रंथीची जोडी असते. काही मुंग्यांमध्ये नांगी नसते. वर्षातील ठराविक वेळीच त्यांच्यात प्रजनन घडून येते.

मुंग्यांच्या वसाहतीला वारूळ म्हणतात. एका वारुळात सु. पाच लाखांपर्यंत मुंग्या असू शकतात. मुंग्या या मधमाश्या, वाळवी इ. कीटकांप्रमाणे सुसामाजिक (युसोशल) आहेत (पहा: मधमाशी; सुसामाजिकता). त्यांच्यामध्ये मधमाश्या आणि वाळवी यांच्याप्रमाणेच कामाचे विभाजन झालेले असते आणि कामाच्या विभाजनामुळे मुंग्यांमध्येही बहुरूपता (पॉलिमॉर्फिझम) दिसून येते. मुंग्यांमध्ये कामकरी  मुंग्या, राणी मुंग्या आणि नर मुंग्या असे तीन प्रकार असतात. या प्रकारांना इंग्रजीत कास्ट (जात) हीच संज्ञा आहे.

कामकरी मुंग्या : मुखांगात साखरेचा कण घेऊन रांगेत जाणाऱ्या मुंग्या म्हणजे कामकरी मुंग्या. मुंग्यांच्या तिन्ही प्रकारांपैकी कामकरी मुंग्या आकारमानाने सर्वांत लहान असतात. वारुळातील त्यांची संख्या सर्वांत जास्त म्हणजे काही हजारांपासून लाखांपर्यंत असते. अन्य प्रकारांच्या मुंग्यांपेक्षा कामकरी मुंगीचे डोके आणि डोळे लहान असतात. तिला पंख नसतात. त्या सर्व माद्या असून त्यांच्यात प्रजनन संस्था विकसित झाली नसल्यामुळे त्या वांझ असतात. त्या अंडी घालू शकत नाहीत. एका वारुळात विविध आकारमानांच्या कामकरी मुंग्या असतात. वारूळ बांधणे, त्याची स्वच्छता करणे, अन्न गोळा करणे, पिलांना अन्न भरवणे आणि पिलांचे संगोपन करणे अशी कामे त्या करतात. काही कामकरी मुंग्या आकारमानाने मोठ्या असतात. त्यांना शिपाई मुंग्या म्हणतात. त्यांचे डोके मोठे असून जबडे मजबूत व तीक्ष्ण असतात. त्या वारूळाचे संरक्षण करतात.

राणी मुंग्या : या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात. त्यांची संख्या वारूळात एक अथवा दोन किंवा तीन असते. त्यांना पंख असतात. या माद्या असून त्यांच्यात प्रजनन संस्था पूर्ण विकसित झालेली असते. त्यांचे उदर लांब असते. अंडी घालणे व नवीन वारूळ स्थापन करणे इत्यादी कामे राणी मुंगी करते.

नर मुंग्या : या मुंग्या आकारमानाने कामकरी मुंग्यांपेक्षा मोठ्या आणि राणी मुंग्यांपेक्षा लहान असतात. वारुळात त्यांची संख्या शेकड्यांपासून हजारापर्यंत असते. त्यांचे पंख नाजूक असतात. प्रजनन संस्था पूर्ण विकसित असलेल्या नर मुंग्या राणी मुंगीशी मीलन करतात.

मुंग्यांचे जीवनचक्र पूर्ण जीवनचक्र असून त्यात पूर्ण रूपांतरण असते. सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या आरंभी वारुळातून अनेक नर मुंग्या आणि काही मादी मुंग्या यांचे थवे हवेत उड्डाण ‍करतात. याला मीलन उड्डाण म्हणतात. हवेत मुंग्यांच्या नर मुंग्यांचे आणि राणी मुंगीचे मीलन होते. मीलनानंतर मुंग्या जमिनीवर उतरतात. नर मुंग्या मरून जातात, तर राणी मुंग्यांचे पंख गळून पडतात. राणी मुंगी बहुधा मूळ वारूळात परत येते, तर काही वेळा ती मूळच्या वारूळापासून दूर जाऊन जमिनीत लहानसे बीळ करून नवीन वारूळ तयार करते. मुंगीच्या जीवनचक्रात अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढावस्था असे चार टप्पे असतात. राणी मुंग्यांनी अंडी घातल्यानंतर वातावरणातील तापमानानुसार १५–४५ दिवसांत अंड्यांतून पांढऱ्या रंगाचे डिंभ बाहेर येतात. या डिंभांना पाय नसतात. कामकरी मुंग्या त्यांना अन्न भरवितात. डिंभावस्था १–४ महिने असते. नंतर कोशावस्था १–४ महिने असून ४ महिन्यांनंतर मुंग्या बाहेर येतात व काही दिवसांनी प्रौढ होतात. कामकरी मुंग्या काही डिंभांना पौष्टिक अन्न (ज्याला राजान्न म्हणतात) खायला देतात व त्यांची जास्त काळजी घेतात. या डिंभांपैकी काहींचे प्रजननक्षम अशी राणी मुंगी किंवा नर मुंगी यांमध्ये रूपांतर होते.

पाण्याची जागा वगळता मुंग्या सर्वत्र वसाहती करून राहतात. त्या घरांत, बागांत आणि परिसरात वावरतात. कित्येक मुंग्या आपली घरे दगडाखाली, वाळलेल्या पालापाचोळ्यात, लाकडाच्या ओंडक्यात, झाडांवरील पानांत तसेच जमिनीत व जमिनीवर बांधतात. सर्वसाधारणपणे जमिनीत बांधलेल्या घरांना वारूळे म्हणतात. वारूळात अनेक लहान व मध्यम आकारांच्या पोकळ्या असतात. बोगद्यासारख्या वाटांनी या पोकळ्या एकमेकींना जोडलेल्या असतात.‍ कित्येक वारूळे ५०–६० वर्षे टिकतात.

मुंग्या एकमेकांशी गंधद्रव्यांच्या (फेरोमोन) साहाय्याने संपर्क साधतात. अन्न शोधण्यासाठी त्या अन्नगंधाचा वापर करतात, स्वत:च्या वारूळातील मुंग्यांना ओळखण्यासाठी त्या स्पर्शगंध स्रवतात आणि प्रजननासाठी कामगंध हवेत सोडून परस्परांना आकर्षित करतात.

भुंगेरे, माश्या व नाकतोडे हे मुंग्यांचे शत्रू आहेत. मुंग्या घरातील साखर, गूळ, गोड पदार्थ, धान्य, गुदामातील धान्य, शेतात पेरलेले बी व कोवळी रोपे यांचा नाश करतात. त्यांचा चावा वेदनाक्षम असतो. म्हणून माणूस त्यांना उपद्रवी मानत आला आहे. मुंग्यांचा उपद्रव टाळावयाचा असेल तर वारूळे काढून टाकणे गरजेचे असते. वारूळे काढणे हे एक अवघड काम असून त्यासाठी लिंडेन, डिल्ड्रीन, क्लोरडान व ॲलेथ्रिन अशी कीटकनाशके वापरतात. ही कीटकनाशके पावडर आणि फवारा या स्वरूपांत उपलब्ध असतात. घरातील मुंग्यांना मारण्यासाठी कीटकनाशकाच्या पावडरीचे खडू वापरले जातात.

काही मुंग्या कायमस्वरूपी वारूळ करीत नाहीत. त्यांना ‘भटक्या’, ‘लष्करी’, ‘तेल’, व ‘चाचड’ मुंग्या म्हणतात. त्या मांसाहारी व हल्लेखोर असतात. काही मुंग्या शत्रूवर कधीही हल्ला करीत नाहीत. शत्रू वाटेत आला तर आपल्या शरीराचा गोळा करून त्या शांत पडून राहतात. शेतातील बी गोळा करून त्याचा साठा करून ठेवणाऱ्या मुंग्यांना शेतकरी-मुंग्या म्हणतात. अशा शेतकरी-मुंग्या वारूळात बुरशीच्या बागा तयार करतात व ती बुरशी अन्न म्हणून खातात. काही मुंग्या इतर लहान मुंग्यांना आपली कामे करण्यास भाग पाडतात. त्यांना गुलाम बनविणाऱ्या मुंग्या म्हणतात. काही मुंग्यांचे जठर खूप मोठे असते. त्यात मध साठविला जात असल्यामुळे त्यांना मधाची पात्रे म्हणतात.

पृथ्वीवरील प्राण्यांच्या जैववस्तुमानाच्या तुलनेत मुंग्यांचे जैववस्तुमान १५–२५% असावे असा अंदाज आहे. हेच जैववस्तुमान मानवाच्या जैववस्तुमानाशी तुल्यबल आहे. मुंग्या पर्यावरणातील सजीवांच्या अपशिष्टांचे विघटन वेगाने घडवून आणतात आणि पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करीत असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा