पुदिना ही लॅमिएसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव मेंथा अर्व्हेन्सिस आहे. तुळस व सब्जा या वनस्पतीदेखील याच कुलात समाविष्ट आहेत. जगात सर्वत्र मेंथा प्रजातीच्या १३–१८ जाती असून भारतात मेंथा अर्व्हेन्सिस याव्यतिरिक्त आणखी ५ जाती आढळतात. पुदिना ही मूळची यूरोप, पश्चिम व मध्य आशिया येथील असून ती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिका यांच्या लगतच्या समशीतोष्ण प्रदेशांत आढळते. ती सुगंधित असून वेगवेगळ्या बाबतींत उपयुक्त असल्याने बागेत आणि शेतात तिची लागवड केली जाते.
पुदिन्याचे झुडूप सु. ६० सेंमी.पर्यंत उभे वाढते. जमिनीलगत किंवा जमिनीखाली फुटलेल्या फांद्यांनी ते पसरते. खोड जांभळे व स्तंभ चौकोनी असून पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती किंवा लंबगोल असतात. पानांचा रंग गडद हिरवा असून त्यांच्या कडा दंतुर असतात. तळाची पाने काहीशी केसाळ किंवा केशहीन असतात. फुले जांभळी व पानांच्या बगलेत फुलोऱ्यामध्ये येतात. फळे लहान, कठीण व गुळगुळीत असतात. फळांमध्ये १–४ बिया असतात. जमिनीलगत फुटलेल्या फांद्यांचे तुकडे वापरून पुदिन्याचे शाकीय पुनरुत्पादन करता येते.
पुदिन्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. ती उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक असून पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटांतील व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी आहे. तिची पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात. पानांतून बाष्पनशील मिंट तेल काढून ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. पानांपासून मिळवलेल्या तेलात ७०% मेंथॉल असते. चहा, सरबते, जेली, कँडी, सूप आणि आइसक्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात. काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात. गांधील माश्या, मुंग्या व झुरळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात.