इन्फ्ल्यूएंझा हा ऑर्थोमिक्झो व्हिरिडी कुलातील आर. एन. ए. जातीच्या विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. सामान्यपणे ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या रोगाची लागण पक्ष्यांना आणि माणसांना होते. अ, ब आणि क असे तीन प्रकार असलेल्या विषाणूंमुळे हा रोग होतो. साधारणत: इन्फ्ल्यूएंझा ‘अ’ विषाणूंची बाधा सर्वांत जास्त असते. तसेच ‘अ’ विषाणू सर्वांत मारक, तर ‘ब’ व ‘क’ प्रकारचे विषाणू सौम्य असतात. माणसाला ‘ब’ आणि ‘क’ विषाणूंची लागण प्रामुख्याने होते. १९३३ साली डब्ल्यू, स्मिथ एफ्. डब्ल्यू. अँड्रूज आणि पॅट्रिक लडलॉ यांनी ‘अ’ विषाणू वेगळा केला. हे विषाणू ८० ते १२० नॅनोमीटर (१०-९ मी.) व्यासाचे असतात. विषाणुसंपर्क झाल्यापासून ते लक्षणे दिसेपर्यंत एक-दोन दिवस लागतात. विषाणुसंसर्ग झाल्यास ६ तासांनंतर ते रक्तात शिरतात व २४ तासांत परिणाम करतात. विषाणूंनी श्वसनयंत्रणेत प्रवेश केल्यानंतर श्वासनलिकेत स्तंभाकार रोमकपेशींमध्ये दाह होतो. हा दाह नियंत्रणात न आल्यास वायुकोशापर्यंत पोहोचतो व फुफ्फुसशोथ (न्यूमोनिया) होतो.

इन्फ्ल्यूएंझाचा विषाणू

पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या या रोगाचे वर्णन १६१० मध्ये प्रथम केले गेले. इन्फ्ल्यूएंझा हे नाव ‘सर्दीचा प्रभाव’ या अर्थी असलेल्या इटालियन शब्दावरून १७४३ मध्ये जॉन हक्सहॅम यांनी प्रचारात आणले. या रोगाची सुरुवात रशियात झाली व नंतर तो जगभर पसरला. याची साथ लाटालाटांनी येत असे. पहिली साथ १८८९-९० च्या हिवाळ्यात आली. नंतर १९१८-१९ ची लाट सर्वांत तीव्र होती. त्यावेळी भारतात सव्वा कोटी लोक मृत्यू पावले. ही साथ एकाच वेळी जगभर पसरली व प्रामुख्याने तरुण पिढी त्यात मृत्युमुखी पडली. या रोगाच्या जगद्‍व्यापी साथी ‘अ’ प्रकारच्या विषाणूंच्या दरवेळी नव्याने उद्भवलेल्या उपप्रकारामुळे घडून आलेल्या आहेत. रुग्णाच्या खोकण्यामुळे व शिंकण्यामुळे निर्माण होणार्‍या वातविलेपामुळे हे विषाणू सर्वत्र पसरतात. हा रोग ज्या प्राण्यांना होतो त्या प्राण्यांच्या नावाने ओळखला जातो. उदा., पक्ष्यांचा रोग ‘बर्ड फ्ल्यू’, डुकरांचा स्वाइन फ्ल्यू तर घोड्यांना रोग ‘हॉर्स फ्ल्यू’ या नावांनी ओळखले जातात.

थंडी वाजून ताप येणे, डोके व अंग अतिशय दुखणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. काही वेळा डोकेदुखीमुळे प्रकाश सहन होत नाही. या रोगामुळे लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुसशोथ, हृदयाच्या स्नायूंचा शोथ (मायोकार्डायटिस) किंवा मस्तिष्कावरणशोथ (मेनिनजायटिस) होऊ शकतो. तापामुळे शरीराचे तापमान ३८० ते ४१० सेल्सिअस पर्यंत वाढते.

लक्षणांवरुन या रोगाचे निदान केले जाते. प्रथमावस्थेत रुग्णाला प्रतिशोध औषधे, तापनाशक, वेदनाशामक अथवा फुफ्फुसशोथ झाल्यास प्रतिजैविके दिली जातात. साथीच्या वेळेस प्रतिबंधक लस टोचून घेणे आवश्यक असते. आहारात मसाल्याचे पदार्थ व अतिशीत पदार्थ वर्ज्य असून प्रथिनयुक्त आहार घ्यावा असा सल्ला दिला जातो. तोंडावर रुमाल बांधल्यास स्त्राव आजूबाजूला पसरत नाही. या रोगावरील हा एक प्रतिबंधक उपाय आहे.

इनफ्ल्यूएंझा ‘अ’ विषाणूमध्ये आर.एन.ए. चे आठ खंड असतात. हिमोग्लटिनिन प्रतिपिंड आणि न्यूरामिनिडेझ विकराच्या प्रकारांनुसार इन्फ्लुएंझा विषाणूंचे उपप्रकार पडतात. उदा. मानवी इन्फ्ल्यूएंझा एच्३ एन्२ आणि एच्१ एन्१, बर्ड फ्ल्यू एच्५ एन्१ तर स्वाइन फ्ल्यू एच्३ एन्१ या प्रकारचे आहेत. १९१८ साली आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूची साथ एच्१ एच्१ प्रकारच्या विषाणूंमुळे आलेली होती. या साथीत जगभरातील सु. १ कोटी लोक मृत्यूमुखी पडले. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या फ्ल्यूच्या संसर्गामुळे लोक मृत्युमुखी पडतात.

बर्ड फ्ल्यू एच्५ एन्१ हा पक्ष्यांमधील विषाणू मानवामध्ये संक्रमित झाल्याची काही उदाहरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीप्रमाणे २०१० पर्यंत बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने आजपर्यंत २९९ व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. बर्ड फ्ल्यू वरील वैद्यकीय उपचार सामान्य विषाणूप्रमाणे आहेत.

स्वाइन फ्ल्यूचा विषाणू बर्ड फ्ल्यू, मानवी फ्ल्यू आणि डुकरांमधील फ्ल्यू यांच्या आरएनए च्या संयोगाने झालेला आहे. स्वाइन फ्ल्यूचा संसर्ग झाल्यास वेळीच टॅमिफ्ल्यू च्या गोळ्या दिल्यास तो बरा होतो. मेक्सिकोमध्ये २००९ मध्ये आलेल्या स्वाइन फ्ल्यू आता जगभर थोड्या फार प्रमाणात पसरला आहे. बर्ड फ्ल्यूच्या प्रमाणात स्वाइन फ्ल्यू अधिक मारक आहे.