संगीतशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारी एक ख्यातनाम संस्था. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर गुरुवर्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या शिष्यांनी निरनिराळ्या शहरांत जी गांधर्व महाविद्यालये स्थापना केली, त्यांपैकीच ही एक प्रसिद्ध संस्था. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर करणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. पलुस्करांचे एक प्रमुख शिष्य विनायकबुवा पटवर्धन यांनी या विद्यालयाची स्थापना ८ मे १९३२ रोजी पुणे येथे केली. सुमारे दहा वर्षे या संस्थेमार्फत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. पुढे संस्थेकडून ९ फेब्रुवारी १९४२ रोजी ‘भारतीय संगीत प्रसारक मंडळ’ या विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली. याचे पदाधिकारी म्हणून दत्तो वामन पोतदार (अध्यक्ष), लक्ष्मण भोपटकर (उपाध्यक्ष), विद्याधर दामले (खजिनदार), पुरुषोत्तम पंडित (चिटणीस) यांची आणि कार्यकारी सभासद म्हणून ग. ह. रानडे, सदाशिव मोने, दत्तात्रय वि. पलुस्कर आणि खुद्द विनायकराव यांची निवड झाली. या संस्थेकडून संगीत परीक्षांचा अभ्यासक्रम आखण्यात आला आणि तेव्हापासून भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार गांधर्व महाविद्यालय, पुणे या संस्थेत संगीतविषयक परीक्षांचे आयोजन केले जात आहे.
गांधर्व महाविद्यालयात भारतीय शास्त्रीय संगीतातील हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत, सुगम संगीत इत्यादी गायनप्रकार; हार्मेनियम, तबला इत्यादी वाद्ये; भरतनाट्यम् व कथक इत्यादी नृत्यप्रकार या विषयांतील शिक्षण दिले जाते. यांमध्ये प्रारंभिक ते संगीत विशारद, संगीत अलंकार पर्यंतचे अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने देखील या परीक्षा घेतल्या जातात. भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यार्थी रागदारी संगीत, सुगम संगीत, नृत्य, वादन इ.विषयातील परीक्षा देत असतात. आतापर्यंत सु. दहा हजार विद्यार्थ्यांनी या संस्थेतून संगीत शिक्षण घेतले आहे. गरजूंना अल्पदरामध्ये संगीत शिक्षणाची सोय आहे. तसेच विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रण, ध्वनीसंयोजन व दृक्-श्राव्य माध्यमे यांचेही शिक्षण दिले जाते. ग्रंथालयातील दुर्मीळ व ऐतिहासिक संगीतविषयक ग्रंथांचा संग्रह विद्यार्थ्यांकरिता व अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. विष्णू दि. पलुस्करांचे पुत्र द. वि. पलुस्कर यांनीही या संस्थेत संगीताचे शिक्षण घेतले होते.
संस्थेकडून विविध संगीत महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रमही राबवले जातात. गेली अठरा वर्षे संस्थेकडून वेगवेगळ्या संगीत संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ‘विविद स्मृती संगीत समारोह’ याचे आयोजन करण्यात येते. संस्थेने स्थापन केलेल्या भारतीय संगीत प्रसारक मंडळाकडून संगीत क्षेत्रातील गुणीजनांना विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. त्यामध्ये पं. विष्णु दिगंबर पलुस्कर संगीत शिक्षक गौरव पुरस्कार, पं. विनायकराव पटवर्धन जीवन गौरव पुरस्कार, रामकृष्णबुवा वझे पुरस्कार (नवोदित गायकांसाठी), पं. जी. एल. सामंत संगतकार पुरस्कार, पं. गोविंदराव टेंबे संगतकार पुरस्कार ह्यांचा समावेश आहे. प्रसिद्ध हार्मोनियमवादक प्रमोद मराठे हे सध्या या संस्थेच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत.
संदर्भ :
समीक्षक – सु. र. देशपांडे