स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्धपदार्थ. ज्यामुळे शरीराला स्निग्धत्व येते, मऊपणा येतो, शरीरात ओलावा निर्माण होतो त्या प्रक्रियेला ‘स्नेहन’ असे म्हणतात.

आयुर्वेदानुसार शरीरातील दोष आवश्यक प्रमाणापेक्षा वाढले व ते शरीरभर पसरलेले असले, शरीरात खोलवर मुरलेले असले, तर त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी तोंड, गुदा किंवा अन्य सुयोग्य छिद्रापर्यंत नेणे आवश्यक असते. स्नेहनामुळे असे दोष सुटतात, पातळ होतात व त्यांना गती मिळते.

स्नेहनाचा उपयोग स्वतंत्र चिकित्सा म्हणून वाढलेल्या वातासाठी सांगितला आहे. स्नेहनाच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे आभ्यंतर स्नेहन. यात पोटातून स्नेह घेतले जाते. तसेच स्नेह अन्नासोबत किंवा नुसताही घेता येतो. दुसरी पद्धत म्हणजे मालिशद्वारा स्नेह शरीराला लावणे. तसेच गुदावाटे, योनीवाटे स्नेह शरीरात सोडणे, नाकात व कानांत स्नेह टाकणे, स्नेहपदार्थांच्या गुळण्या करणे ह्या प्रकारच्या स्निग्ध पदार्थांच्या उपयोगाला ‘बाह्य स्नेहन’ म्हणतात.

स्नेहनासाठी वापरावयाच्या स्नेहाचे प्रमाण, रोगानुसार व ऋतूनुसार स्नेहपदार्थाची निवड, स्नेहनाची वेळ, कालमर्यादा, स्नेहन कोणाला द्यावे, स्नेहन कोणाला देऊ नये, स्नेहन योग्य झाल्याची लक्षणे या सगळ्यांचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात केले आहे. स्नेहन करणारे पदार्थ हे पातळ, सूक्ष्म म्हणजे खोलवर जाऊन काम करणारे, लवकर पसरणारे, स्निग्ध, बुळबुळीत, मऊ, पचायला जड आणि थंड असतात. हे पदार्थ शरीरावर तात्काळ प्रभाव दाखवत नाही.

स्निग्धपदार्थांचे त्यांच्या उत्पत्तीवरून दोन प्रकार पडतात. (१) वनस्पतींपासून मिळणारे स्थावर स्नेह. उदा., तीळ, पिस्ता, बेहेडा, एरंड, जवस, आक्रोड इत्यादींपासून निघणारे तेल. (२) प्राणिज स्नेह. उदा., मासे, प्राणी, पक्षी यांचे मांस, चरबी, हाडातील मज्जा, प्राण्यांचे दूध व त्यापासून मिळणारे दही, तूप इत्यादी. स्निग्धपदार्थ अनेक प्रकारचे असले तरी तूप, तेल, वसा, आणि मज्जा हे सर्वांत श्रेष्ठ समजले जातात. त्यांतही तूप हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण ते स्वत:चे गुण न सोडता संयोगात येणाऱ्या औषधी  वनस्पतींचे गुण ग्रहण करते.

पहा : पंचकर्म, स्नेह.

संदर्भ :

  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय १३, श्लोक १, चक्रपाणि टीका.
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय २२, श्लोक ११; अध्याय १३, श्लोक ९९.
  • सुश्रुत संहिता — चिकित्सास्थान, अध्याय ३१, श्लोक २,  डल्हण टीका.
  • सुश्रुत संहिता — चिकित्सास्थान, अध्याय ३१, श्लोक २.
  • चरक संहिता — सूत्रस्थान, अध्याय २२, श्लोक १५; अध्याय १३, श्लोक १०, ११, १३.

समीक्षक – जयंत देवपुजारी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.