शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे वात. वातालाच वायू असेही म्हणतात. वात आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील विविध व्यापार सुरळीत चालण्यास मदत करतो. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास वातामुळे रोग उत्पन्न होतात, म्हणून त्याला दोष म्हणतात. हा दोष डोळ्यांनी दिसणारा नसला तरी त्याच्या गुणांमुळे व कामांमुळे त्याचे अस्तित्व सिद्ध होते. वातदोष  कोरडा, हलका, थंड, खरखरीत, वेगवान, शक्तिवान व खोलवर जाणारा असतो. वात सर्व शरीरव्यापी असला तरी मांडी, अस्थी व त्वचा ही वाताची प्रमुख स्थाने आहेत. डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ या पाच ज्ञानेंद्रियांना आपापल्या जाणण्याच्या विषयांकडे प्रेरित करणे व त्या त्या विषयांचे ग्रहण करवून देणे तसेच मनाला प्रेरणा देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही कामे वातामुळेच होतात. कार्य व कार्यक्षेत्राच्या दृष्टीने वाताचे पुढील पाच प्रकार सांगितले आहेत : प्राण, उदान, व्यान, समान व अपान.

प्राणवायूचे मुख्य कार्यक्षेत्र डोके, कान, जीभ, नाकपुड्या हे आहे. थुंकणे, शिंका येणे, ढेकर येणे, अन्न व श्वास शरीरात घेणे या क्रिया प्राणवायूमुळे होतात. उदान वायूचे मुख्य कार्यक्षेत्र नाभी, छाती व घसा हे असून यामुळे बोलण्याची प्रक्रिया होते. याशिवाय शरीराचा उत्साह, बळ, कांती कायम राखणे व कोणतेही काम करण्यासाठी शरीराला प्रेरित करणे हे उदान वायूचे कार्य होय. समान वायू हा जाठराग्नीच्या जवळ राहून त्याला प्रज्वलित ठेवतो व अन्नपचनात मदत करतो. व्यान वायूचे  मर्यादित असे कार्यक्षेत्र नसून संपूर्ण शरीराची हालचाल करणे, अंगाचा संकोच करणे, पापण्यांची उघडझाप करणे, जांभई देणे इत्यादी  क्रिया व्यानामुळे घडतात. अपानाचे मुख्य कार्यक्षेत्र मूत्राशय, गुद, प्रजननाशी संबंधीत अवयव व मांड्या हे होत. अपानामुळे मल, मूत्र हे शरीराबाहेर फेकले जातात. तसेच पुरुष शरीरातून शुक्र आणि स्त्रीशरीरातून रज व गर्भ यांना बाहेर काढण्याचे कामही अपानामुळे होते.

पहा : कफदोष, दोष (त्रिदोष), दोषधातुमलविज्ञान, पित्तदोष.

संदर्भ :

  • चरक संहिता—चिकित्सास्थान, अध्याय २५ श्लोक ५-११.
  • चरक संहिता—सूत्रस्थान, अध्याय १२ श्लोक ८.
  • सुश्रुत संहिता—निदानस्थान, अध्याय १ श्लोक ७-९.

समीक्षक – जयंत  देवपुजारी