सजीवांच्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. या सृष्टीमध्ये दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मदर्शी व एकपेशीय सजीवांचा समावेश केला जातो. १८६८मध्ये एर्न्स्ट हेकेल या जीववैज्ञानिकाने या सृष्टीचे प्रोटिस्टा असे नामकरण केले. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांना सामान्यपणे प्रोटिस्ट म्हणतात. प्रोटिस्ट प्रामुख्याने आर्द्र स्थितीत आढळत असून त्यांच्या पेशीभोवती पेशीपटल, पेशीभित्तिका, तनुत्वचा, शकल व प्रावरक यांसारखी आवरणे असतात. पेशीद्रव्यात एक किंवा अनेक केंद्रके असून केंद्रकांमध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्रे असतात. याशिवाय पेशीद्रव्यात रायबोसोम, आंतरद्रव्यजालिका, तंतुकणिका, गॉल्जी यंत्रणा, अन्नरिक्तिका, संकोची रिक्तिका इ. पेशीअंगके असतात. काही प्रोटिस्ट स्वयंपोषी (हरितलवके असलेली) असतात, तर काही परपोषी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन अलैंगिक तसेच लैंगिक पद्धतीने होते. काही प्रोटिस्टांमध्ये वनस्पतिसृष्टीचे तर काहींमध्ये प्राणिसृष्टीचे गुणधर्म दिसून येतात. त्यांचे वर्गीकरण प्रोटोझोआ (आदिजीव), मिक्झोमायकोफायटा (श्लेष्मकवक), हेटेरोकीटोफायटा (डायाटम) आणि पायरोफायटा (घूर्णकशाभिक) अशा चार संघांमध्ये केले जाते.
संघ – प्रोटोझोआ : या संघातील सजीवांचे म्हणजे आदिजीवांचे पेशीपटल मेदप्रथिनांचे असते. आदिजीवांच्या सु. ३०,००० जाती आहेत. त्यांच्या हालचालीसाठी असलेल्या किंवा नसलेल्या पेशीअंगकानुसार त्यांचे वर्गीकरण चार वर्गांत केले जाते.
ऱ्हायझोपोडा : या वर्गातील सजीव हालचालीसाठी छद्मपाद निर्माण करतात आणि त्यांद्वारे हालचाल करतात. उदा., अमीबा, अर्सेल्ला.
सिलिएटा : यातील सजीवांना हालचालीसाठी पक्ष्माभिका असतात. उदा., पॅरामिशियम, व्हर्टिसेला.
फ्लॅजेलेटा : यातील सजीवांना हालचालीसाठी एक किंवा त्यापेक्षा अधिक कशाभिका असतात. उदा., यूग्लीना, नॉक्टिल्युका, सिरॅशियम, निद्रारोग कारक ट्रिपॅनोसोमा.
स्पोरोझोआ : यातील सजीवांना हालचालीसाठी पेशीअंगके नसतात. उदा., हिवतापाचा परजीवी.
संघ – मिक्झोमायकोफायटा : या संघात श्लेष्मकवकांचा (स्लाइम मोल्ड) समावेश करण्यात येतो. श्लेष्मकवक दिसायला कवकांसारखे असले, तरी ते एकपेशीय असल्यामुळे त्यांचा समावेश फंजाय सृष्टीत केला जात नाही. श्लेष्मकवकांना पेशीपटल आणि पेशीभित्तिका असतात. ते मृतोपजीवी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन अलैंगिक पद्धतीचे असून ते बीजाणूंद्वारे होते. त्यांना हालचालीसाठी अंगके नसतात. त्यांनी स्रवलेल्या श्लेष्माच्या साहाय्याने ते हालचाल करतात. श्लेष्मकवकांच्या सु. ९०० जाती आहेत. उदा., मिक्झोगॅस्ट्रिया, अक्रॅसीस, मिक्झामीबा, लॅबीरिन्थुला, एकायनास्टिलियम.
संघ – हेटेरोकीटोफायटा : या संघात एकपेशीय शैवालांचा (डायाटम) समावेश करण्यात येतो. शैवालांची पेशी सिलिकायुक्त असते. ती पारदर्शक डबीसारख्या दोन शकले असलेल्या वेष्टनात बंदिस्त असते; वरच्या शकलास एपिथिका तर खालच्या शकलास हायपोथिका म्हणतात. एपिथिका ही हायपोथिकेपेक्षा आकाराने मोठी असते. या पेशीसहित वेष्टनाला फ्रुस्टूयल म्हणतात. ते आकर्षक आणि नक्षीदार दिसते. ते सिलिकायुक्त असल्यामुळे त्यांचे जीवाश्म निसर्गात टिकून राहतात. म्हणून ती पुराजीवविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात. शकलांचा आकार आणि संरचना यावरून त्यांचे दोन गट करतात; चक्रिक डायाटम आणि अचक्रिक डायाटम. चक्रिक डायाटम अरीयसममित असतात, तर अचक्रिक डायाटम हे द्विपार्श्वसममित असतात. बहुतांशी डायाटम स्वयंपोषी असून ते प्रकाशसंश्लेषणाद्वारे स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांच्यात हरितद्रव्याबरोबर सोनेरी रंगाचे फायकोझँथीन रंगद्रव्य असते. त्याद्वारे सौरऊर्जा अधिक प्रमाणात शोषली जाऊन प्रकाशसंश्लेषण वेगाने घडून येते. काही डायाटम परपोषी असतात. अलैंगिक पुनरुत्पादनाने त्यांच्या पेशी एकमेकांना जोडल्या जाऊन साखळी किंवा वसाहती तयार होतात. अन्नसाखळीतील ते महत्त्वाचे उत्पादक सजीव आहेत. डायाटम यांच्या सु. १,००,००० जाती आहेत. उदा., पिन्युलॅरिया, नॅव्हीक्यूलॅरा आणि ॲस्टेरीओनेला.
संघ – पायरोफायटा : या संघातील सजीवांना दोन कशाभिका असल्यामुळे त्यांना द्विकशाभिक (डायनोफ्लॅजेलेट) म्हणतात. त्यांची हालचाल मळसूत्राप्रमाणे (स्क्रूप्रमाणे) होत असल्यामुळे त्यांना घूर्णकशाभिक असेही म्हणतात. त्यांद्वारे ते जलाशयाच्या वेगवेगळ्या थरांत वर-खाली हालचाल करतात. पोषण, भक्ष्य किंवा त्रासदायक अतिनील किरणांपासून संरक्षण होण्यासाठी ते अशी हालचाल करतात. काही पेशींभोवती प्रावरक (थिका) असते तर काही प्रावरकविरहित असतात. यांच्या काही जाती स्वयंपोषी असतात, तर काही परपोषी असतात. त्यांची वाढ वेगाने होते. परिस्थिती अनुकूल असल्यास हे सजीव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतात की, संपूर्ण जलाशय त्यांनी व्यापला जातो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग बदलून ते लालसर दिसते. याला लाल भरती म्हणतात. समुद्रातील लाल भरती तेथील जलचरांना धोकादायक ठरू शकते. त्यांच्या सु. २,२०० जाती नोंदल्या आहेत. उदा., गोनीओलॅक्स, जिम्नोडिनियम, क्लोरोमोनॅड, क्रिप्टोमोनॅड.