अपघातामुळे किंवा काही आजारांत रुग्णाला एकाच स्थितीत राहावे लागते. अशावेळी अधिक काळासाठी रुग्णाची त्वचा ही  घर्षणामुळे व शरीराच्या ठराविक भागावर पडलेल्या दाबामुळे त्याठिकाणी घासली जाते आणि त्वचेची एकसंधता (integrity) नष्ट होऊ लागते त्यावेळेस त्या ठिकाणी जखम होण्यास सुरुवात होते यालाच शय्याव्रण, क्षितिजस्थिती व्रण किंवा दाब व्रण असे म्हणतात.

राष्ट्रीय दाब दुखापत सल्लागार मंडळाने (National Pressure Injury Advisory Panel) शय्याव्रण याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : शय्याव्रण म्हणजे त्वचेवर पडणाऱ्या दाबामुळे त्या ठिकाणची त्वचा आणि / किंवा त्वचेखालील मृदु ऊतक (soft tissue) यांना होणारी जखम होय. ज्या ठिकाणी त्वचा हाडांच्या अगदी सानिध्यात असते अशा ठिकाणी त्वचेला घर्षण होण्याचे प्रमाण अधिक असते. याव्यतिरिक्त उपचारातील काही उपकरणांच्या दाबामुळेही जखम होऊ शकते.

 शय्याव्रण होण्याची प्रक्रिया :

  • शय्याव्रण ही त्वचेवर होणारी जखम अस्थिल तेज:शृंग (bony prominence) आणि त्वचा व त्याखालील ऊतक यांचा रुग्णाच्या गादीवरील कडक पृष्ठभाग व चादर यामधील घर्षणामुळे होतो.
  • घर्षणासोबत त्वचेवर पडणारा शरीराचा भार आणि बिछान्यात असलेला ओलावा किंवा दमटपणा आणि रुग्ण कुपोषित असणे इ. कारणांनी शय्याव्रण होतो.
  • त्वचेवरील घर्षण आणि दाब यामुळे त्वचेखालील लहान रक्त वाहिन्यांवर दाबामुळे त्वचेखालील ऊतकांमधील रक्ताभिसारणावर परिणाम होतो. त्यामुळे तेथील ऊतकांना रक्त पुरवठा कमी होऊन ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. परिणामत: तेथील पेशी मृतवत होतात.
आ. १. शय्याव्रण होण्याच्या पायऱ्या

शय्याव्रण होण्याच्या पायऱ्या :

  • प्रथमत: त्वचेवर लाल किंवा गुलाबी चट्टे दिसू लागतात. या पायरीवर जखम दिसत नाही. सावळ्या रंगाच्या व्यक्तीच्या त्वचेचा बदललेला रंग ओळखणे कठीण जाते. परंतु अशा ठिकाणच्या त्वचेला स्पर्श केला असता ती अधिक मऊ किंवा कठीण, उबदार किंवा अधिक थंड जाणवते. अशावेळी डॉक्टर शय्याव्रण झाला आहे असे निदान करतात.
  • चट्टे पडलेल्या ठिकाणी जखम होण्यास सुरुवात होते. त्याठिकाणी काही प्रमाणात त्वचेचा वरचा थर नष्ट होऊ लागतो आणि त्वचेवर ओरखडे, फोड दिसू लागतात.
  • हळूहळू त्वचेचे सर्व थर नष्ट होऊन जखम ऊतकांपर्यंत जाऊ जाते.
  • जखम त्वचेच्या तिन्ही थरांमध्ये प्रवेश करते, ज्यामुळे स्नायू-कंकाल संस्थेमधील (musculoskeletal system) स्नायू, कंडरा आणि हाडे उघडी पडतात.
आ. २. शरीरावर शय्याव्रण होण्याच्या जागा

शरीरावर शय्याव्रण होण्याच्या जागा :

शय्याव्रण शरीरावर कोठेही होऊ शकतो. उदा., ऑक्सिजन उपचार पद्धती घेत असलेल्या व्यक्तीच्या नाकाच्या, कानाच्या किंवा डोक्याच्या मागील बाजूस दाब पडून फोड येऊ शकतात. तोंडात चुकीच्या पद्धतीने बसविलेले दात, नलिकानिवेशन (intubation) किंवा यांत्रिक वायुवीजन यामुळे देखील दाब व्रण होऊ शकतो. परंतु शय्याव्रण शरीराच्य त्या भागात होण्याची शक्यता सर्वांत जास्त असते जेथे हाडे त्वचेच्या जास्त जवळ असतात. उदा., पायाचा घोटा, टाचा, गुडघ्याच्या आतील व बाहेरील भाग, माकड हाडाजवळील भाग, नितंबरेषा (buttocks) हाताचे कोपर, खांदा, पाठ, डोक्याच्या मागील भाग इत्यादी.

शय्याव्रण होण्याची कारणे :

  • शरीरातील रक्तवाहिन्यांवर पडणारा दाब.
  • अंथरुणाला होणारे अवयवांचे घर्षण.
  • मल-मूत्र, घाम यांच्यामुळे येणारा ओलावा.
  • वयस्कर रुग्णांच्या त्वचेतील लवचिकता कमी होते, त्वचेखालील चरबीचा थर कमी होतो. त्यामुळे कातडीचा वरील थर पातळ होऊन शय्याव्रण होण्याची शक्यता अधिक असते.   

 परिचर्या :

  • शय्याव्रण होत असलेल्या भागावर येणारा दाब कमी कण्यासाठी रुग्णाच्या झोपण्याच्या स्थितीत वरचेवर बदल करावा.
  • व्रण पडत असलेली त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी.
  • आवश्यक त्या पद्धतीने शय्याव्रणामुळे होणारी जखम स्वच्छ करून मलमपट्टी करावी.
  • जखमेत काही जंतू दोष होतो आहे काय याची नोंद घ्यावी.
  • जखम लवकर भरण्यासाठी रुग्णास आवश्यक तो पोषक आहार द्यावा.
  • शय्याव्रणाच्या पायरीनुसार रुग्णाची परिचर्येची योजना आखावी व काळजी घ्यावी. शय्याव्रण किती खोलवर आहे त्यावर अवलंबुन असतो.

 शय्याव्रण शुश्रूषेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • शरीराच्या शय्याव्रण होण्याच्या भागावरील दाब कमी करावा.
  • रुग्णाची स्थिती नियमितपणे बदलणे : दर दोन तासांनी रुग्णाची स्थिती बदलून शरीराचा दाब सर्वत्र सारखाच राहील याची काळजी घ्यावी ज्यामुळे अधिक शय्याव्रण होण्याचे टाळता येऊ शकेल.
  • मऊ पृष्ठ भाग असलेली गादी, उशी यांचा रुग्णासाठी उपयोग करावा. ज्यामुळे त्याच्या शरीराचे वजन आणि दाब सर्वत्र सारख्या प्रमाणात विभागाला जातो.
  • रुग्णाचे हात, पाया यांचा भाग बिछसन्यापासून उंचावर ठेवणे : त्याकरिता हाताचे कोपर, पायाच्या टाचा व हाडांच्या टोकदार भाग याखाली मऊ उशा ठेवाव्यात.
  • शय्याव्रणास सुरुवात होणारी त्वचा सौम्य (mild) साबण व कोमट पाण्याने हळुवारपणे पुसून कोरडी करावी.
  • आर्द्रता किंवा ओलावा प्रतिरोधक मलम : रुग्णाचा मल-मूत्र विसर्जन यांवर संयम नसल्याने बिछान्यात राहाणाऱ्या ओलाव्यावर अवरोध करता येईल .
  • रुग्णाच्या त्वचेचे नियमित परीक्षण करावे : त्वचा लालसर होणे, त्याठिकाणची त्वचा गरम वाटणे किंवा त्वचा फाटणे / ओरखडल्याप्रमाणे होणे इ.

शय्याव्रण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी :

  • जखम सलाईन वापरून स्वच्छ करणे : प्रत्येक वेळी पट्टी बदलताना सामान्य सलाईनने जखम स्वच्छ करावी.
  • शय्याव्रण जखमेवरील मृत पेशी : डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या मृत पेशी जखमेवरून काढाव्यात.
  • आवश्यकतेनुसार वर्णोपचार : शय्याव्रण कोणत्या पायरीवर आहे त्यानुसार उपचाराचा प्रकार ठरविला जातो. उदा., हायड्रोक्लोराइड (hydrochloride), फोम (foam) इत्यादी.
  • जंतू संसर्गाची लक्षणे आणि चिन्हे यासाठी निरीक्षण : शय्याव्रणाचा रंग अधिक लालसर होणे, त्या ठिकाणी सूज येणे, भाग गरम होणे, दुखणे, जखमेतून द्रव/लस येणे इ. रोज निरीक्षण करणे.
  • शय्याव्रणाचे उपचार करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि जंतू विरहीत (sterile dressing) मलम पट्टीचा वापर करावा.
  • पोषक आहार : जेवणात पोषक अन्न पदार्थांचा समावेश करावा. उदा., प्रथिने, जीवनसत्त्व इत्यादी, ज्यामुळे शय्याव्रणाची जखम लवकर बरी होण्यास मदत होईल.

 शय्याव्रण झालेल्या रुग्णाची काळजी आणि परिचारिकेची जबाबदारी :

  • रुग्णाच्या शय्याव्रणांविषयी विभागातील तज्ञांचा सल्ला खालील बाबतीत घ्यावा :
    • मलमपट्टी व त्याचा प्रकार.
    • मलमपट्टीसाठी वापरावयाचे द्रावण.
    • याशिवाय अजून विशेष काळजी घेणे जरुरी असल्यास
    • रुग्णाची हालचाल करण्यासाठी त्याची मानसिक व शारीरिक तयारी  करवून घेणे.
  • जखम अधिक खोलवर जाऊ नये तसेच जंतू संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
  • जखम स्वच्छ आणि कोरडी ठेवावी, आर्द्रता टाळावी.
  • जखमेमुळे रुग्णास वेदना होत असल्यास कमी करण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने औषध द्यावे.
  • रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णसेवेत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करावे.

शय्याव्रण रुग्ण काळजी :

  • पक्षाघात, असंवेदनशीलता आणि वय यामुळे त्वचेखालील पेशींची क्रय-शक्ती कमी होते, त्यामुळे त्या भागातील कातडीच्या संवर्धनात अडथळा येतो आणि रक्त प्रवाह कमी झाल्याने त्या जागेवर शय्याव्रण होतो.
  • शरीराच्या दुखापत झालेल्या भागाजवळील पाय किंवा तो भाग उशी किंवा फोम कुशनने उंच ठेवावा, त्यामुळे त्याजागेवरील दाब कमी करण्यात मदत होईल, जेणेकरून शय्याव्रण बरा होऊ शकेल.
  • घर्षणाचा धोका असलेल्या भागात पावडर लावल्याने घर्षणाची तीव्रता कमी होऊ शकते.
  • विशेष उपचाराचा गरजेनुसार वापर करावा, ज्यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी मदत होते.
  • रुग्णास मानसिक आधार द्यावा .

संदर्भ :

  • Patterson, J. A.; Bennett, R. G. Prevention And Treatment of Pressure Sores, 1995.
  • https://medlineplus.gov/ency/patientinstructions/000740.htm
  • https://my.clevelandclinic.org/health/diseases/17823-bedsores-pressure-injuries

समीक्षक : राजेंद्र लामखेडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.