वोज, कार्ल : (१५ जुलै १९२८ – ३० डिसेंबर २०१२).

अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि जैवभौतिकशास्त्रज्ञ. त्यांनी आर्किया (Archaea) या एक-पेशीय प्रोकॅरिओटीक (prokaryotic) जीवांच्या तिसऱ्या सृष्टीचा (Domain of life) शोध लावला. त्यांनी १६एस रिबोसोमल आरएनए (16S Ribosomal RNA) या नव्याने निर्माण केलेल्या तंत्राच्या साहाय्याने जाति आनुवंशिकतेचे वर्गीकरण (phylogenetic taxanomy) करून सूक्ष्मजीवशास्त्रात क्रांती केली. त्यांनीच आरएनए तंत्राचे गृहीतक मांडले. आर्किया, जीनोमिक्स, आण्विक उत्क्रांती या विषयांत त्यांना विशेष कौशल्य होते.

वोज यांचा जन्म सिरॅक्यूज, न्यूयॉर्क येथे झाला. त्यांनी मॅसॅचूसेट्स येथील ॲम्‍हर्स्ट कॉलेज मधून गणित आणि भौतिकी या विषयांत पदवी संपादन केली (१९५०). त्यानंतर त्यांनी येल विद्यापीठात जैवभौतिकी या विषयाचा अभ्यास सुरू केला आणि पीएच.डी पदवी मिळविली (१९५३). विषाणूंवर उष्णता आणि आयन प्रारणाचा (Ionization Radiation) परिणाम हा त्यांचा शोधनिबंधाचा विषय होता. त्यानंतर त्यांनी येल विद्यापीठात (१९५३-६०), द जनरल इलेक्ट्रिक रिसर्च लॅबोरेटरी (१९६०-६३) आणि पॅरीस मधील पाश्चर इन्स्टिट्यूट (१९६२) मध्ये संशोधक म्हणून काम केले. अरबॅना-शॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात त्यांनी स्टॅन्ली ओ. इकेनाबेरी अध्यासनाचे प्राध्यापक पद (Stanley O. Ikenberry Chair) भूषविले.

वोज यांनी रिबोसोम आरएनएचे पृथ्थकरण आर्किया जीवांचा तिसरा प्रकार ओळखण्याकरिता वापरले. आर्किया सृष्टीतील जीवांची जनुकीय घडण नेहेमीच्या जीवाणूंपेक्षा वेगळी असते. वोज हे त्रिशाखीय उत्क्रांती-वृक्षाचे निर्माते होते. आडवे जनुक हस्तांतरण (Horizontal Gene Transfer) याचे प्राथमिक उत्क्रांतीतील (evolution) महत्त्व यासंबंधी वोज यांचे काम बघून कोलोरॅडो विद्यापीठाच्या प्राध्यापक नॉर्मन आर पेस यांनी असे म्हटले आहे, की अगदी डार्विन धरून आतापर्यंतच्या कोणत्याही जीवशास्त्रज्ञापेक्षा वोज यांनी विज्ञानाला अधिक दिले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जस्टीस सोनेनबर्गसुद्धा वोज यांचे काम वॉटसन आणि क्रिक किंवा डार्विनच्या तोडीचे समजतात. त्यांच्या मते १९७७ चा वोज यांचा प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस हा शोधनिबंध सूक्ष्मजीवशास्त्रात सगळ्यात अधिक प्रभावशाली होता.

१९७७ च्या अगोदर बहुतांश जीवशास्त्रज्ञ मते, पृथ्वीवरील सर्व जीवांना दोन प्रमुख सृष्टीमध्येच विभागता येत होते. पहिला यूकॅरिओट (eukaryote) – ज्यामध्ये प्राणी, वनस्पती, कवक आणि काही एक पेशी सूक्ष्मजीव आणि दुसरा प्रोकॅरिओट ( prokaryotes) – ज्यामध्ये जीवाणूंचा आणि इतर सूक्ष्मदर्शीय जीवांचा समावेश होतो. अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ राल्फ एसृ वॉल्फ यांसोबत काम करून वोज यांनी असे निदर्शनास आणले की, प्रोकॅरिओटमध्ये जीवसृष्टीच्या दोन वेगळ्या गटांचा समावेश आहे आणि त्यांना दोन श्रेणींमध्ये विभागले पाहिजे. खरे जीवाणू (यूबॅक्टेरिया; eubacteria) आणि नव्याने शोधलेला आर्किबॅक्टेरिया, नंतर त्याला आर्किया असे नाव देण्यात आले. आर्किया हे जलचर आणि भूचर सूक्ष्मजंतू असतात. ते जैवरासायनिक आणि आनुवंशिकीयदृष्ट्या खऱ्या जीवाणूंपासून भिन्न असतात. या गटातील बहुतांश सूक्ष्मजंतूंनी जेथे अतिशय गरम किंवा उच्च प्रमाणात क्षारता आढळते अशा अत्युच्च वातावरणात जगण्यासाठी स्वत:ला घडविले आहे. बहुतांश सूक्ष्मजंतू ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात ॲनरोबिक पद्धतीने जगतात. ही परिस्थिती पृथ्वी ‍निर्मितीच्या वातावरणाशी समरूप आहे, त्यामुळे आर्किया हे पेशी निर्मितीची अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत माहिती देतात.

वोज यांनी इलिनॉय विद्यापीठातील आणि मेरिलँड रॉकव्हिल येथील इन्स्टिट्यूट फॉर ‍जीनोमिक रिसर्च येथील त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत १९६६ साली प्रथमत: आर्कियाच्या संपूर्ण जीनोमबाबत माहिती प्रकाशित केली. आर्किया हे जीवाणूंपेक्षा यूकॅरिओटिक जीवांशी बहुतांश प्रमाणात साधर्म्य दाखवितात, असे स्पष्ट केले.

वोज यांनी ‘द जेनेटिक कोड ऑफ द मॉलेक्युलर बेसिस फोर जेनेटिक एक्सप्रेशन (The genetic code of the molecular basis for genetic expression)’ हे पुस्तक लिहिले (१९६७). त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यात मॅक-आर्थर फेलोशिप (१९८४), राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे (National Academy of Science) सभासद (१९८८), सूक्ष्मजीवशास्त्रातील सर्वोच्च सन्मानित असलेले डच रॉयल ॲकॅडमी ऑफ सायन्सचे लेव्हेनहूक पदक (१९९२), यू. एस. नॅशनल मेडल ऑफ सायन्स (२०००), रॉयल स्वीडिश विज्ञान परिषदेकडून क्राफर्ड पारितोषिक, रॉयल स्वीडिश विज्ञान परिषदेचे परदेशी सभासदत्त्व इत्यादी आहेत. अनेक सूक्ष्मजंतूंना त्यांचे नाव देऊन गौरविण्यात आले आहे.जसे – पायरोकॉकस वोजे, (Pyrococcus woesei), मेथॅनोब्रिव्हीबॅक्टर वोजे (Methanobrevibacter woesei), कॉनेक्सि बॅक्टर वोजे (Conexibacter woesei)

वोज यांचे अर्बॅना, इलिनॉय येथे निधन झाले.

संदर्भ:

समीक्षक – रंजन गर्गे

#सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, #जैवभौतिकशास्त्रज्ञ, #आरकिया, #१६ एस (16S) रिबोसोम आरएनए (Ribosomal RNA), #फायलो जेनेटिक

प्रतिक्रिया व्यक्त करा