दूतघटोत्कच : भासाचे एक अंकी नाटक. उत्सृष्टिकांक हा रूपकप्रकार. काही अभ्यासकांच्या मते हा व्यायोग रूपकप्रकार आहे ; परंतु या रूपकाची लक्षणे उत्सृष्टिकांकाला अधिक लागू पडणारी आहेत. ह्या नाटकातील सर्व पात्रे ही महाभारतातील प्रसिद्ध पात्रे असली तरी कथानक संपूर्णतः कवीच्या कल्पनेतून साकारलेले आहे. घटोत्कचाने दूत म्हणून कौरवांकडे जाणे असा या नाटकातील प्रसंग मूळ महाभारतात नाही.
युद्धाच्या वेळी कौरवांनी आपल्या सैन्याची एक तुकडी वेगळी काढली. त्यामुळे तिच्याबरोबर लढण्यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण गेले. त्यांना इतर पांडवांपासून दूर करण्याची कौरवांची योजना सफल झाली आणि पांडवांशी लढणे सोपे झाले. द्रोणाचार्यांनी खास व्यूहरचना केली. ती भेदण्यासाठी अभिमन्यू हा एकच वीरसमर्थ होता, त्याच्या मागे उरलेले चार पांडव तयार झाले. अभिमन्यूने मोठा पराक्रम करून कौरवांना जेरीस आणले. कौरवांना पराभवाची भीती वाटू लागली. त्यामुळे दुश्शासनाचा मुलगा जयद्रथ ह्याला बोलवण्यात आले .आपल्याला मिळालेल्या वराचा वापर जयद्रथाने केला. अभिमन्यूला रथहीन आणि धनुष्यहीन करून कौरवांनी त्याला घेराव घातला आणि सर्व कौरवांनी मिळून अभिमन्यूवर अमानुष प्रहार केले व शेवटी जयद्रथाने त्याला मारले. संसप्तक योद्ध्यांवर विजय मिळवून आलेल्या अर्जुनाचा राग अनावर झाला व त्याने सूर्यास्त होण्याच्या आत जयद्रथाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केली व ते शक्य न झाल्यास स्वतः अग्निप्रवेश करण्याची प्रतिज्ञा केली.
या पार्श्वभूमीवर दूतघटोत्कच नाटकाची सुरुवात होते. अर्जुनाच्या ह्या प्रतिज्ञेने गांधारी घाबरली आहे. धृतराष्ट्रालाही खात्री आहे की अर्जुनाचे धनुष्य आता कौरवांचा संहार करूनच विश्रांती घेईल. अभिमन्यूच्या वधाला जयद्रथ कारणीभूत आहे हे जेव्हा धृतराष्ट्राला समजते तेव्हा त्याला अतिशय राग येतो व त्याचबरोबर अभिमन्यूबद्दल करुणाही वाटते. यानंतर दुर्योधन, दुश्शासन, शकुनी वगैरे मंडळी धृतराष्ट्राकडे येतात. त्यांच्या नमस्कारालाही धृतराष्ट्र उत्तर देत नाही. त्याच्या मौनाबद्दल विचारल्यावर तो त्यांना त्यांच्या चुकीची मोठी शिक्षा मिळणार असल्याबद्दल सांगतो. तसेच अभिमन्यूला मारणे हा पराक्रम नसून तो दुबळेपणा आहे, असेही तो सांगतो. यावर दुर्योधन म्हणतो की, ज्याने पितामह भीष्मांचा वध केला त्याच्या बाबतीत हे योग्यच आहे. यावर धृतराष्ट्र त्यांना धोक्याची सूचना देतो की, अर्जुन त्याच्या मुलाच्या वधाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्र अर्जुनाच्या अमोघ बाणांचे वर्णन करत असतानाच भूकंप आणि उल्कापात होतो. हा भूकंप आणि उल्कापात अर्जुनाच्या प्रतिज्ञेमुळेच झाल्याचे समजते. अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण न झाल्यास अर्जुन अग्निप्रवेश करणार असल्याचे समजल्यावर दुर्योधन प्रतिज्ञा पूर्ण होण्यास अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न करतो.
तेव्हा श्रीकृष्णाचा संदेश घेऊन घटोत्कच दूत म्हणून येतो. स्वतःची ओळख करून देतो, धृतराष्ट्राला नमस्कार करतो आणि अभिमन्यूच्या वधामुळे संतप्त झालेल्या कृष्णाचा संदेश सांगतो. यावर दुर्योधन म्हणतो की, कृष्ण हा काही राजा नाही त्यामुळे त्याच्या संदेशाकडे लक्ष देण्याची गरज नाही. यावर घटोत्कच श्रीकृष्णाचे राजराजेश्वरत्व सांगतो, त्याच्या मोठेपणाचे वर्णन करतो. कौरव कृष्णाची राक्षस म्हणून हेटाळणी करतात तेव्हा कौरवांपेक्षा पांडवांची वागणूक कशी माणुसकीला धरून आणि दयाळूपणाची आहे हे घटोत्कच सिद्ध करतो. त्यावर दुर्योधन त्याला गप्प राहायला सांगून कृष्णाच्या संदेशाचे उत्तर आम्ही युद्धभूमीवर तीक्ष्ण बाणांनी देऊ असे सांगतो. शेवटी घटोत्कच त्यांना सन्मार्गावर जाण्याचा उपदेश करतो.
घटोत्कचाच्या प्रवेशापासून वीर हा रस असला तरी करूण रस नाटकाचे अंतर्गत सूत्र बांधून ठेवतो. धृतराष्ट्र, गांधारी व दुश्शासन यांच्या संवादात करूण रस प्रमुख आहे. कृष्णाच्या सर्वशक्तिमान रूपाचे दर्शन दाखवण्यासाठीच भासाने हे नाटक रचले असावे. या नाटकाचा शेवट अकस्मातपणे झाल्यासारखा वाटतो. या नाटकाला भरतवाक्य नाही.
संदर्भ :
• देवधर सी. आर.,भासनाटकचक्रम्, पुणे ओरिएन्टल बुक एजन्सी, १९३७.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर