एंडर्स, जॉन फ्रँक्लिन : (१० फेब्रुवारी १८९७ – ८ सप्टेंबर १९८५).
अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. पोलिओ (Polio; बालपक्षाघात) विषाणूंची वाढ चेतापेशीशिवाय इतर ऊतींमध्ये यशस्वीपणे करण्याच्या शोधासाठी १९५४ सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाचा नोबेल पारितोषिक त्यांना टॉमस हकल वेलर आणि फ्रेड्रिक चॅपमन रॉबिन्स यांच्या समवेत विभागून देण्यात आला.
एंडर्स यांचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्याच्या वेस्ट हार्टफर्ड येथे झाला. त्यांचे वडील खासगी बँकेचे सर्वोच्च अधिकारी असल्याने कौटुम्बिक स्थिती उत्तम होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेस्ट हार्टफर्ड, कनेक्टिकट (West Hartford, Connecticut) राज्यामध्ये आणि माध्यमिक शिक्षण न्यू हँपशर राज्यातील काँकर्ड येथे झाले. नंतर काही काळ ते वैमानिक प्रशिक्षक व लेफ्टनंट म्हणून युनायटेड स्टेट्स आर्मी एअर कॉर्प्समध्ये सामील झाले (१९१८). पुढे त्यांनी येल महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी मिळवली (१९१९). हार्व्हर्ड विद्यापीठातून इंग्रजी विषयात त्यांनी एम.ए. केले (१९२२). वैद्यकीय महाविद्यालयातील मित्रांमुळे आपल्याला जीवशास्त्राची आवड आहे, हे लक्षात आल्यानंतर इंग्रजी विषय सोडून ते जीवाणूशास्त्राकडे वळले. ह्यूज वॉर्ड या शिक्षक मित्राने त्यांची हार्व्हर्ड विद्यापीठातील जीवाणूशास्त्र व प्रतिक्षमताशास्त्र प्रमुख हान्स झिन्सर (Hans Zinsser) ह्यांच्याशी परिचय करून दिला. झिन्सर तेव्हा विषमज्वराच्या जीवाणूविरोधी लस निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. या कामात गोडी वाटू लागली म्हणून वयाच्या तिसाव्या वर्षी इंग्रजी विषयातील पीएच.डी. अर्धवट सोडून एंडर्स यांनी जीवाणूशास्त्र आणि प्रतिक्षमताशास्त्राचा अभ्यास करून संबंधित विषयातील पीएच.डी. मिळवली (१९३०). त्यानंतर त्यांनी तेथेच काही दिवस काम केले. बॉस्टन येथील बालरुग्णालयात संसर्गजन्य रोगांच्या संशोधनासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले, १९४६ साली तेथेच त्यांनी प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांची हार्व्हर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१९५६), तसेच त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सभासद निवडण्यात आले (१९५३).
जीवाणूंचे संक्रमण सामर्थ्य आणि पोशिंद्या जीवांची असे संक्रमण रोखण्याची क्षमता हा एंडर्स यांचा संशोधनाचा विषय होता. न्युमोकॉकस जीवाणूंपेशींच्या पेशी पटलावरूनबाहेर डोकावणाऱ्या बहुवारिक शर्करा (polysaccharides) रेणूंमुळे न्युमोकॉकस विरुद्ध प्रतिकार करणे पोशिंद्या पेशींना अशक्य होते असे त्यांनी सहकार्यांच्या सहाय्याने सिद्ध केले. सस्तन प्राण्यांच्या शरीरात वाढणाऱ्या विषाणूंचाही त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यासमवेत अभ्यास केला. गालगुंडाच्या विषाणूंच्या अभ्यासात त्यांना आढळले की, काही प्रकारांचे गालगुंडाचे सौम्य विषाणू माणसाच्या शरीरात संक्रमित केल्यानंतर त्यांची संख्या वाढली तरी गालगुंडाची लक्षणे दिसत नाहीत. अशा व्यक्तींना गालगुंडाच्या जहाल विषाणूंपासून प्रतिक्षमता मिळते. या प्रयोगांमुळे एंडर्स यांना बॉस्टन येथे बालकांच्या संसर्गजन्य रोगांसंबंधी संशोधन करणारी प्रयोगशाळा स्थापन करण्यास आमंत्रित करण्यात आले. या संस्थेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी शरीरात संक्रमित होणाऱ्या विषाणूंवर भरीव काम झाले .
एंडर्स आणि त्यांचे सहकारी कांजिण्यांच्या विषाणूंची मानवी भ्रूणत्वचा पेशी आणि स्नायुपेशींमध्ये वाढविता येतील का हे पाहत असतांना उत्सुकतेपोटी ऊतीसंवर्धित पेशींमध्ये पोलिओचे विषाणू अंत:क्षेपित केले. वीस दिवसांनतर त्यांना दिसले की पोलिओचे विषाणू चेतापेशीशिवाय इतर ऊतीत वाढल्याचे निदर्शनास आले. याआधी चेतापेशीव्यतिरिक्त इतर ऊतींमध्ये पोलिओ विषाणू वाढवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले होते.
एंडर्स यांनी गोवराचे विषाणू रोग्याच्या शरीराबाहेर काढून अभ्यासले. त्यांची वाढ केली. ह्या कामाचा परिपाक म्हणजे गोवरावरची लस तयार करण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळे जगभरातील लाखो मुलांना होणारा गोवर, त्यातून निर्माण होणारा फुप्फ्फुसशोथ (Pneumonia) आणि कावीळ यांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झाले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी कर्करोग संशोधनाकडे लक्ष दिले. दोन भिन्न जातीच्या पेशींचे पटल नाहीसे करून दोन पेशींचे संयुक्तीकरण करणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवले. भिन्न जातीच्या सजीवांच्या पेशींपासून संयुक्त पेशी विषाणूंना सहज प्रवेश देतात. कर्करोगाच्या अभ्यासाला हे फायदेशीर ठरले.
एंडर्स यांना नोबेल पारितोषिकासोबतच अनेक मानसन्मान आणि पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : अमेरिकन आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे फेलो (१९४६), रॉबर्ट कॉख पारितोषिक (१९६२), अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशनचे सायन्स अचिव्हमेंट पदक (१९६३), रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्यत्व (१९६७).
एंडर्स यांचे वॉटरफर्ड, कनेक्टिकट येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1954/
- http://science.sciencemag.org/content/109/2822/85.long
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1954/enders-facts.html
- http://www.aai.org/About/History/Past-Presidents-and-Officers/JohnFEnders
- https://www.britannica.com/biography/John-Franklin-Enders
समीक्षक – मोहन मद्वाण्णा