ल्यूइन, कुर्ट : (९ सप्टेंबर १८९० – १२ फेब्रुवारी १९४७). अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ. जन्म प्रशियातील मॉगील्नॉ (हे सध्या पोलंडमध्ये आहे) येथे. फ्रायबर्ग आणि म्यूनिक विद्यापीठांतून अध्ययन केल्यानंतर बर्लिन विद्यापीठातून त्याने पीएच्.डी. मिळवली (१९१६). १९२१ पासून त्याने बर्लिन विद्यापीठात अध्यापन केले. तथापि १९३३ मध्ये हिटलरच्या राजवटीत त्याने अमेरिकेत स्थलांतर केले व तेथेच तो स्थायिक झाला. कॉर्नेल विद्यापीठात पहिली दोन वर्षे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्याला आयोवा विद्यापीठातील बालकल्याण संशोधन केंद्रात (चाइल्ड वेल्फेअर रिसर्च स्टेशन) आमंत्रित करण्यात आले. तेथे त्याच्या सोबत संशोधकाचा एक छोटा गटही त्याने नेला होता. १९४४ साली तो आणि त्याचा हा गट ‘मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ ह्या संस्थेत आला. तेथे ल्यूइनने समूह गतिविज्ञान संशोधनकेंद्राची (रिसर्च सेंटर फॉर ग्रूप डायनॅमिक्स) स्थापना केली. त्याच संस्थेत तो अखेरपर्यंत कार्यरत होता.
मानवी अभिप्रेरणा, साहचर्ययुक्त बंध (असोसिएटिव्ह बाँड्स), उद्दिष्ट, अपेक्षा, प्रतिष्ठापन (सब्स्टिट्यूशन), परितृप्ती (सेशिएशन) हे ल्यूइनच्या संशोधनाचे विषय होत.
व्यक्तीच्या मनोव्यापारांची व वर्तनाची उपपत्ती लावण्यासाठी मानसशास्त्रातील व्यूह सिद्धांत अपुरा वाटल्यामुळे त्याने स्वतःचा क्षेत्र सिद्धान्त विकसित केला. त्यासाठी पदार्थविज्ञानाचा तसेच गणितातील संकल्पनांचा मुक्तपणे आणि नवीन प्रकारे उपयोग केला. विवक्षित क्षणी होणारा व्यक्तीचा जो वर्तनव्यवहार असतो, त्याचे नियमन करणाऱ्या, परस्परसापेक्ष वस्तुघटकांच्या संघाताला त्याने वार्तनिक क्षेत्र (बिहेविअरल फील्ड) किंवा व्यक्तीचा जीवनावकाश (लाइफ स्पेस) अशी संज्ञा दिली. व्यक्तीच्या वर्तनव्यवहाराचे नियंत्रण व्यक्तीच्या तात्कालिक जीवनावकाशात प्रबळ असणाऱ्या बलांमुळे होते. व्यक्तीचे सर्व वर्तन हेतुप्रणीत असते. वर्तन म्हणजे व्यक्तीच्या वार्तनिक क्षेत्रातील वा जीवनावकाशातील मानसशास्त्रीय प्रचालन होय, हा त्याचा प्रमुख सिद्धांत होता. जेव्हा व्यक्तीला एखादी शारीरिक-मानसिक गरज भासते, तेव्हा तिच्यात प्रेरणा उत्पन्न होऊन मानसिक तणाव निर्माण होतो. उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नात व्यक्तीला अपयश आले, तर व्यक्ती हतोत्साह होते व मानसिक तणाव वाढतो. कोणत्याही क्षणी व्यक्तीच्या प्रेरणांच्या बलांचा, त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीवर प्रभाव पाडणारी, तिच्या जीवनावकाशातील जी बले असतात, त्यांचा नकाशा काढता येतो. ह्या नकाशात व्यक्तीच्या प्रेरणा किंवा गरजा शक्तिरेषांनी (व्हेक्टर्स) दर्शविता येतात आणि तिच्यावर प्रभाव पाडणाऱ्या जीवनावकाशिक बलांचे दर्शन बाणांनी घडविता येते. असा जीवनावकाशाचा नकाशा काढण्यासाठी ल्यूइनने क्षेत्रीय मानसशास्त्र किंवा एक प्रकारची मापनातीत भूमिती (टपॉलॉजी अथवा नॉनमेट्रिक जॉमेट्री) व मार्गसंबंध विज्ञान (हॉडॉलॉजी) ह्यांचा उपयोग केला. ह्या मौलिक व पायाभूत संकल्पनांच्या उपयोजनाने त्याला समाजिक तसेच वैवाहिक विग्रह व त्यांचे निराकरण, युद्धोत्तर, पुनर्रचना इ. प्रयोगशाळाबाह्य समस्यांचेही संशोधन करता आले.
मानसशास्त्रामध्ये ॲरिस्टॉटेलिअन वस्तुलक्षी उपपत्तीऐवजी गॅलिलिअन कार्यलक्षी उपपत्तींवर दिलेला भर, सामाजिक शास्त्रांच्या मर्यादांबाहेर जाऊन सैद्धान्तिक संरचनांऐवजी समस्येच्या वर्णनावर व विश्लेषणावर भर आणि त्यासाठी मानसशस्त्रीय व गणितीय संकल्पनांचा पद्धतशीर उपयोग हे ल्यूइनने मानसशास्त्रास प्रदान केलेले सैद्धांतिक व महत्त्वपूर्ण योगदान म्हणावे लागेल. त्याच्या क्षेत्र सिद्धांताच्या संकल्पनांमुळे सामाजिक व समूहवर्तनाच्या संशोधनाला अधिक चालना मिळाली.
सभोवतालच्या मानवी समाजात अस्तित्वात असलेल्या विविध समस्यांचीही त्याला जाणीव होती व त्या सोडविण्यासाठी त्याने सतत संशोधन केले. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात ल्यूइन व त्याच्या सहकाऱ्यांनी नेतृत्व व समूहरचनेच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचे केलेले संशोधन अतिशय उपयुक्त ठरले. समाजाच्या व व्यक्तीच्या स्वास्थ्याला बाधक ठरणाऱ्या सामाजिक विषमतेचे आणि विग्रहाचे निरसन कसे करता येईल, ह्यासंबंधी त्याने सातत्याने संशोधन चालविले.
ल्यूइनचे लेखन जर्मन, तसेच इंग्रजी भाषेत आहे. ए डायनॅमिक थिअरी ऑफ पर्सनॅलिटी (१९३५), रिझॉल्व्हिंग सोशल कॉन्फ्लिक्ट्स (१९४८) आणि फील्ड थिअरी इन सोशल सायन्स (१९५१) हे त्याचे इंग्रजी भाषेतील ग्रंथ उल्लेखनीय आहेत.
प्रिन्सिपल्स ऑफ टपॉलॉजिकल सायकॉलॉजी (१९३६) आणि द कन्सेप्च्यूअल रेप्रिझेंटेशन अँड द मेझरमेंट ऑफ सायकॉलॉजिकल फोर्सीस (१९३८) हे त्याचे अन्य निर्देशनीय ग्रंथ होत. रिग्रेशन : ॲन एक्स्पेरिमेंट विथ यंग चिल्ड्रन (१९४१) हा ग्रंथ त्याने अन्य सहलेखकांबरोबर लिहिला. ह्यांशिवाय वेळोवेळी नियतकालिकांमध्ये व अन्यत्र त्याने लिहिलेल्या लेखांचे दोन संकलित-संपादित ग्रंथ (पेपर्स ऑफ ल्यूइन १९३५-४६ आणि पेपर्स ऑफ कुर्ट ल्यूइन १९३९-४७) प्रकाशित झाले आहेत (१९५०; १९५३).
मॅसॅचूसेट्स राज्यातील न्यूटनव्हिल येथे ल्यूईनचे निधन झाले.
व्यूह मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्र क्षेत्रीय मानसशास्त्र.
संदर्भ :
- Leeper, R. W. Lewin’s Topological and Vector Psychology, Eugene, 1943.
- 2. Marrow , A. J. The Practical Theorist : The Life and Work of Kurt Lewin, New York, 1969.
#व्यूह मानसशास्त्र#सामाजिक मानसशास्त्र#क्षेत्रीय मानसशास्त्र