टेक्नेशियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट ७ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Tc अशी असून अणुक्रमांक ४३ आणि अणुभार ९८ इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २,८,१८,१४,१ असे आहे तर ऑक्सिडीकरण अवस्था ४, ६, ७ अशा आढळतात. टेक्नेशियम धातू सामान्यतः करड्या चूर्ण स्वरूपात मिळतो. या धातूचे षट्कोणाकार स्फटिकांच्या रूपात स्फटिकीकरण होते. हा धातू ११·२° के. तापमानाखाली अतिसंवाहक बनतो. टेक्नेशियमची समस्थानिके ही Tc85 ते Tc118 यांदरम्यानची असून केवळ Tc99 हे समस्थानिक स्थिर आहे.
इतिहास : मेंडेलेव्ह यांनी ज्या वेळी त्यांची पहिली आवर्त सारणी तयार केली, तेव्हा ७ अ गटात मँगॅनिजाच्या खाली दोन जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. मोझली यांनी केलेल्या संशोधनानुसार त्या रिकाम्या जागांची, ४३ व ७५ यांची, निश्चिती पटलेली होती. नोडॅक, टॅक व बेर्ख यांनी प्लॅटिनम व कोलंबाइटाच्या काही खनिजांची क्ष-किरणांनी पहाणी केली, त्यावेळी या मूलद्रव्याचे अस्तित्व आढळून आले. ४३ जागेवरील मूलद्रव्याला त्यांनी मेसुरियम (Ma) असे नाव दिले. त्या आधी त्या अज्ञात मूलद्रव्याला एका-मँगॅनीज असे म्हणत.
नंतर १९३७ साली मॉलिब्डेनमावर ड्यूटेरॉनांचा मारा करून सी. पेऱ्ये व ई. सेग्रे यांनी ४३ या मूलद्रव्याचे अनेक किरणोत्सर्गी समस्थानिक शोधून काढले. त्याच वेळी या नव्या मूलद्रव्याचे काही रासायनिक गुणधर्मही लक्षात आले. ड्यूटेरॉन कणांऐवजी न्यूट्रॉन कणांचा मारा मॉलिब्डेनमावर करून टेक्नेशियम मिळू शकते. युरेनियमाच्या अणुकेंद्राचे भंजन करूनही टेक्नेशियम मिळते. अशा प्रकारे टेक्नेशियम हे मूलद्रव्य कृत्रिम पद्धतीने बनविलेले पहिले मूलद्रव्य होय.
रासायनिक गुणधर्म : टेक्नेशियम अम्लराज (aqua regia) व गंधक अम्ल यांमध्ये विद्राव्य आहे. टेक्नेशियमचे चूर्ण ऑक्सिजनच्या सान्निध्यात पेट घेते.
संयुगे : टेक्नेशियमाची ऑक्साइडे व सल्फाइडे उपलब्ध आहेत. टेक्नेशियमाची संयुगे व त्याचे मिश्रधातू क्षरणरोध करण्यासाठी (गंजण्यास रोध करण्यासाठी) उपयुक्त आहेत, असे आढळून आले आहे.
उपयोग : टेक्नेशियम (९५) या समस्थानिकाचा वापर वनस्पती व प्राणी यांच्या अभ्यासासाठी केला जातो.
टेक्नेशियम (९९) या समस्थानिकाचा अर्धायुकाल २.११ दशलक्ष वर्षे आहे. याद्वारे कमी ऊर्जेचे बीटा किरण उत्सर्जित केले जातात. या समस्थानिकाचा वापर अंश परीक्षण (calibration), उत्प्रेरक (catalyst) व गंजरोधक म्हणून केला जातो.
टेक्नेशियम (९९ एम) या समस्थानिकाचा अर्धायुकाल ६.०१ तास असल्याने याचा वापर मानवी शरीरांतर्गत असलेल्या अवयवांच्या अभ्यासाकरिता रेडिओ मार्गण (radio tracer) मूलद्रव्य म्हणून केला जातो. गॅमा किरण उत्सर्जक असलेले हे समस्थानिक २४ तासांत मानवी शरीरातून जवळजवळ ९४% नष्ट झालेले असते. तसेच ही गॅमा किरणे व सौम्य बीटा किरणे शरीराला अपायकारक नसल्याने या मूलद्रव्याचा वैद्यकामध्ये भरपूर वापर होतो.
संदर्भ : 1. Cotton & Wilkinson, Advanced Inorganic Chemistry, Sixth edition.
2. Jahagirdar, D. V. Chemical Elements in New Age.
समीक्षक : कविता रेगे