(११ ऑक्टोबर १९२३ — १६ ऑक्टोबर १९८३).
भारतीय अमेरिकन गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांचे पूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा. त्यांनी गणितातील बीजगणित, भूमिती आणि गट सिद्धांत या क्षेत्रांत मूलभूत कार्य केले.
हरीश-चंद्र यांचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कानपूर येथेच झाले. महाविद्यालयीन जीवनात पॉल डिरॅक (Paul Dirac) यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ क्वाँटम मेकॅनिक्स (Principles of Quantum Mechanics) या पुस्तकाने प्रभावित झाल्याने ते सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे आकृष्ट झाले. अलाहाबाद विद्यापीठातून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर (१९४३) त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science) येथे होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू केले. पुढे डिरॅक यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे केंब्रिज विद्यापीठात त्यांना पीएच. डी. पदवी संपादन करण्याची संधी मिळाली. ‘इनफिनाइट इर्रिड्यूसिबल रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉरेन्ट्स ग्रूप’ (Infinite Irreducible Representations of the Lorentz Group) या शीर्षकाचा प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी पदवी संपादन केली (१९४७). केंब्रिजमधील वास्तव्यात जॉन लिट्लवुड (John Littlewood) (S–हायपरलींक) आणि फिलिप हॉल (Philip Hall) यांची व्याख्याने ऐकून त्यांना गणितात अधिक रुची निर्माण झाली. गणितज्ज्ञ हेर्मान वाइल (Hermann Weyl) आणि क्लौडेचे शेव्हाली (Claude Chevalley) यांचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. त्यामुळे नंतर पॉल डिरॅक यांच्यासह प्रिन्स्टन येथे प्रयाण केल्यावर तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात ते गणिताकडे वळले. भौतिकशास्त्रातील अखेरचा शोधनिबंध १९४८ साली प्रसिद्ध करणाऱ्या हरीश-चंद्र यांनी गणितातील पहिला शोधनिबंध १९४९ साली प्रसिद्ध केला आणि त्यांचे पुढील उल्लेखनीय संशोधन बीजगणितात झाले. सन १९५०-६३या काळात कोलंबिया विद्यापीठात व्याख्याता ते प्राध्यापक अशा पदांवर अध्यापन करीत असतानाच त्यांनी आपले बहुमोल संशोधन केले. या काळात त्यांचा हेर्मान वाइल यांच्याशी सतत संपर्क असे. पुढे प्रिन्स्टन विद्यापीठात इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडीजमध्ये कार्यरत असताना आपल्या नवीन संशोधनासंबंधी ते नियमित व्याख्याने देत. त्यांच्या या व्याख्यानांना आवर्जून हजेरी लावणाऱ्या अभ्यासकांनी त्यांच्या संकल्पनांना गणित विषयक संशोधनाच्या क्षेत्रात अधिक पुढे नेले. तेथेच १९६८मध्ये त्यांची नियुक्ती आय बी एम-फॉर नॉयमान प्राध्यापक (IBM-von Neumann) या पदावर झाली. सन १९५०—८०पर्यंतच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत हरीश-चंद्र यांनी जवळजवळ एकांड्या शिलेदाराप्रमाणे प्रतिरूपण सिद्धांत (Representation Theory) आणि अर्धसरल ली गटांचे संवादी विश्लेषण (Harmonic Analysis of Semi-simple Lie Groups) या ज्ञानशाखांमध्ये काम केले. आज गणिताच्या मध्यवर्ती क्षेत्रांपैकी मानले जाणारे हे विषय त्या काळात बाल्यावस्थेत होते. सखोल संशोधनामुळे या क्षेत्रातले अधिकारी तज्ज्ञ असे स्थान हरीश-चंद्र यांनी प्राप्त केले. त्यांच्या शोधनिबंधांमधील संकल्पना, सिद्धांत, निष्कर्ष आणि मांडणी पद्धती यांचा मोठा प्रभाव गणितज्ज्ञांच्या पुढील पिढ्यांवर पडला. त्यांचे शिष्य आणि निकटचे सहकारी श्री. वीरावल्ली शेषाद्री व रदराजन यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी एप्रिल १९८४मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक विशेष परिषद आयोजित केली होती. प्रतिष्ठित शोधपत्रिकांमध्ये सन १९४४ ते १९८३ या काळात प्रसिद्ध झालेले त्यांचे शोधनिबंध चार खंडांमध्ये संकलित करून सन १९८४मध्ये प्रकाशित करण्यात आलेआहेत. याशिवाय त्यांनी लिहिलेली Harmonic Analysis on Reductive P-adic Groups आणि Automorphic Forms on Semi simple Lie Groups ही दोन पुस्तके अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत.
हरीश-चंद्र यांच्या नावाने ओळखले जाणारे महत्त्वाचे संशोधन असे आहे :
- हरीश-चंद्र सी फल (Harish- Chandra’s C Function)
- हरीश-चंद्र लक्षण सूत्र (Harish-Chandra’s Character Formula)
- हरीश-चंद्र समरूपता (Harish-Chandra Homomorphism)
- हरीश-चंद्र एकैक समरूपता (Harish-Chandra Isomorphism)
- हरीश-चंद्र प्रतिरूप (Harish-Chandra Module)
- हरीश-चंद्र नियमितता प्रमेय (Harish-Chandra Regularity Theorem)
- हरीश-चंद्र श्वार्ट्झ अवकाश (Harish-Chandra Schwartz Space)
- हरीश-चंद्र रूपांतर (Harish-Chandra Transform)
हरीश-चंद्र यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य होते. महत्त्वपूर्ण संशोधनासाठी, विशेषतः अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या ऑन सम ॲप्लिकेशन ऑफ द युनिव्हर्सल एन्व्हलॉपिंग अलझेब्रा ऑफ अ सेमी-सिंपल ली-अलझेब्रा (On Some Applications of the Universal Enveloping Algebra of a Semi-simple Lie Algebra) या शोधनिबंधासाठी अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे बीजगणितासाठी असलेले फ्रँक नेल्सन कोल पारितोषिक त्यांना मिळाले (१९५४). इंडियन नॅशनल सायन्स अकादमीने श्रीनिवासरामानुजन पदक देऊन तर भारत सरकारने पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरविले. सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि शुद्ध गणित या शाखांमधील संशोधनास वाहिलेल्या अलाहाबाद येथील प्रतिष्ठित संशोधन संस्थेस २००१ मध्ये हरीश-चंद्र अनुसंधान संस्थान असे नाव देण्यात आले. दिल्ली विद्यापीठ (१९७३) आणि येल विद्यापीठ (१९८१) यांनी त्यांना डी. लिट. ही मानद पदवी बहाल केली. बालपणापासून उत्कृष्ट शैक्षणिक प्रगतीकरणाऱ्या हरीश-चंद्र यांना संगीत आणि चित्रकला यांचेही शिक्षण घरी मिळाले होते. त्यामुळे या कलांमध्ये त्यांना विशेष रुची होती. त्यांनी चित्रकलेचा छंद आयुष्यभर जपला आणि काही उत्तम चित्रे चितारली.
हरीश-चंद्र यांचे प्रिन्स्टन येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #सैद्धांतिकभौतिकशास्त्र, #बीजगणित, #प्रतिरूपणसिद्धांत #RepresentationTheory #संवादीविश्लेषण #HarmonicAnalysis,
संदर्भ :
- टिकेकर, व. ग.,हरीश-चंद्र,मराठी विश्वकोश, खंड २० पूर्वार्ध, पृष्ठ क्र. ७४७-७४८.
- Doran, Robert S. and Varadarajan, V. S. (Ed.),The Mathematical Legacy of Harish Chandra, A Celebration of Representation Theory and Harmonic Analysis, Proceedings of Symposia in Pure Mathematics, Volume 68, American Mathematical Society, 2000.
- http://www-history.mcs.st-andrews.ac.uk/Biographies/Harish-Chandra.html
- https://www.encyclopedia.com/people/science-and-technology/mathematics-biographies/harish-chandra
समीक्षक : विवेक पाटकर