महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मी. असून पूर्वेकडील बाजूस ३४० मी. आणि पश्चिमेकडे ८७० मी. खोल दरी आहे. शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांस १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली.

अफजल बुरूज आणि माची, प्रतापगड.

मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. अफझल बुरूज हा वैशिष्ट्यपूर्ण असून तो निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे.

छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, प्रतापगड.

मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे पार करून जावे लागते. दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात. दोन दरवाजे पार केल्यावर शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापिलेले तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी (कार. १८१८-३९) तेथे लाकडी मंडप बांधला. हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व मंदिरातील दागिन्यांची चोरी झाली. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासही काही उपद्रव झाला.

गडावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तोफा या मंदिरात आणून ठेवल्या आहेत. तिसरा दरवाजा पार केल्यावर केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचता येते. या दरवाजावर देखील शरभाच्या प्रतिमा आहेत. गडाच्या वायव्येला तटबंदीमध्ये बांधलेला रेडका बुरूज दिसतो. गडाच्या उत्तरेकडील तटबंदीमध्ये आणि केदारेश्वर मंदिरामागील तटबंदीमध्ये चोर दरवाजे आहेत.

महादरवाजा, प्रतापगड.

प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व अफझलखान-छ.शिवाजी महाराज भेट व त्या प्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (१६५९). छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्या वेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने येथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफझल बुरुजाच्या आग्नेयीस अफझलखानाची कबर आहे. गेली काही वर्षे येथे प्रवेश बंद केला आहे.

कुंभरोशी या महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ साली मोटार रस्ता करण्यात आला होता, तेथे एक धर्मशाळा होती.

 

 

 

संदर्भ :

  • ताडफळे, म. वि. प्रतापगड परिचय, मिरज, १९३९.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : सचिन जोशी