रघु वीरा  : (३० डिसेंबर १९०२- १४ मे १९६३) भारतातील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक, कोशकार, संशोधक तसेच कुशल राजकारणपटु आणि संसदसदस्य. मुख्य ओळख म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीतील चवथ्या म्हणजेच विराटपर्वाचे ते संपादक होते. जन्म रावळपिंडी इथे झाला. पंजाब विद्यापीठातून एम.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी लंडन इथून विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. १९४८ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. १९५२ आणि १९५७ साली ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. जम्मू आणि कश्मीरच्या प्रश्नावरून त्यांचे काँग्रेस पक्षाशी मतभेद झाले. या मतभेदानंतर १९६२ साली त्यांनी जनसंघात प्रवेश केला.

भाषावैज्ञानिक म्हणून त्यांचे हिंदी, संस्कृत, पर्शियन, अरेबिक, इंग्लिश, उर्दू, बांग्ला, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व होते. भारतीय नेतृत्वाला इंग्रजी भाषेच्या प्रभावापासून परावृत्त करून भारतीय भाषांकडे वळवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. युरोपातील प्रवासामुळे त्यांची तेथील प्राच्यविद्येच्या अभ्यासकांशी चांगली वैचारिक देवाणघेवाण होती. भाषाविषयातील त्यांच्या कामाची सुरुवात त्यांनी लाहोरमधील सनातन धर्म महाविद्यालयातील संस्कृत विभागातून केली. संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून अतिशय उत्तम काम केल्यामुळे त्यांना संपूर्ण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती; परंतु त्यासाठी त्यांना राजकीय वर्तुळापासून दूर राहाण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे त्यांनी ही संधी नाकारली. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांच्या काही कामांचा उल्लेख हा मूलभूत योगदान म्हणून करावा लागतो.  इंग्लिश-भारतीय शब्दकोश, आंग्ल भारतीय प्रशासन शब्दकोश, अर्थशास्त्र शब्दकोश अशा अनेक कोशांची निर्मिती त्यांनी केली. इंग्लिश हिंदी शब्दकोशाच्या प्रस्तावनेत त्यांनी ह्या शब्दकोशाच्या निर्मितीमागची स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.भारत हा अजूनही मध्ययुगातून बाहेर पडतो आहे. हिंदी आणि तिच्या अन्य भगिनीभाषांना आधुनिक युगातील संकल्पनांच्या अभिव्यक्तीसाठी सक्षम बनवण्याकरता इंग्रजीमधील जवळपास सर्व शब्दांसाठी प्रतिशब्दांची निर्मिती करणे हे एक मोठे कार्य आहे. म्हणून त्यांनी जवळपास ६०० ज्ञानशाखांमधील शब्दांचे संकलन केले आहे. जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, बुद्धिबळ, वाणिज्य, अर्थशास्त्र अशा वैविध्यपूर्ण विषयातील शब्दांचा संग्रह या शब्दकोशात केलेला आहे. उदाहरणादाखल काही शब्द सांगायचे तर Abacus = बरगा, गिनतारा, Battery = संचायक, Calculus = चलराशिकलन इत्यादी. संस्कृत भाषेला आधारभूत ठेवून त्यांनी संसदीय कामकाजाशी संबंधित जवळपास दीडशे पारिभाषिक शब्दांची हिंदी भाषेत निर्मिती केली. राजकीय शब्दांबरोबरच काही शास्त्रीय, तांत्रिक, कायद्याच्या क्षेत्राशी पण संबंधित पारिभाषिक शब्दांची निर्मिती त्यांनी केली. ह्या कार्यात त्यांना अनेक विद्वानांनी सहकार्य केले. कित्येक संस्कृत ग्रंथांचे त्यांनी स्वतः केलेले संपादन ही पण एक अभ्यासक म्हणून त्यांची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.

हस्तलिखितांच्या क्षेत्रात हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित हस्तलिखितांचे संकलन त्यांनी केले. मंगोलिया, चीन, इंडोनेशिया आणि साऊथ ईस्ट एशियात पसरलेल्या हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील विचारांचे संकलन या निमित्ताने त्यांनी केले. त्यांचे सुपुत्र लोकेशचन्द्र शर्मा यांनी त्यांच्या चीन येथील अभ्यासदौऱ्याचे वर्णन करून ठेवले आहे. या त्यांच्या अभ्यासदौऱ्यातच त्यांनी अनेक हस्तलिखितांचे आणि अन्य प्राचीन सांस्कृतिक अवशेषांचे संकलन केले. त्यांच्या या कार्याची पंडित नेहरू यांनी विशेष दखल घेतली होती.

भारतीय संस्कृतीच्या अध्ययनासाठी त्यांनी लाहोर जवळील इछरा इथे १९३२ साली सरस्वती विहार या संशोधनकेन्द्राची स्थापना केली. मंगोलिया, चीन, इंडोनेशिया आणि साऊथ ईस्ट एशियात पसरलेल्या हिंदू संस्कृती, साहित्य, धर्म यांच्या संदर्भात या केन्द्राने मोठे संशोधन केले. फाळणीच्या आधी १९४६ साली त्यांनी हे केन्द्र नागपूर येथे हलवले. त्यानंतर १९५६ सालपासून त्याचे कार्य दिल्लीतून लोकेशचन्द्र यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही चालू आहे.

कुशल राजकारणपटु, विद्वान भाषावैज्ञानिक याबरोबरच सामाजिक कार्यामधेही सक्रिय सहभाग हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अतिशय उत्साह आणि उत्तमोत्तम कल्पना यांना कृतीची जोड देऊन, अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्यासाठी काम करणे, झोपड्पट्टीतील गरीब बांधवांना सहाय्य करणे, गांधीजींच्या साबरमती आश्रमात जाऊन आपले योगदान देणे अशा गोष्टी त्यांनी केल्या. त्यांचा कानपूर इथे एका दुर्दैवी कार अपघातात मृत्यू झाला.

समीक्षक :  ग. उ. थिटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.