शाहरुख खान : (२ नोव्हेंबर १९६५).
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर ताज मोहम्मद व आईचे नाव लतिफ फातिमा. दिल्लीतील मध्यमवर्गीय वातावरणात ते वाढले. ‘बॉलिवुडचा बादशाहʼ किंवा ‘किंग खानʼ असे त्यांचे वर्णन केले जाते. आमिर खान आणि सलमान खान यांच्या बरोबरीने बॉलिवुडवर राज्य करणार्या तीन खानांमध्ये शाहरुख खान यांचे नाव घेतले जाते.
रंगभूमीशी संबंध :
शाहरुख खान यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. त्यामुळेच अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतरही त्यांचा बहुतेक वेळ दिल्लीच्या थिएटर ॲक्शन ग्रुप या संस्थेमध्येच जात होता. पुढे दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांना काम मिळू लागले. लेख टंडन यांच्या दिल दरिया या मालिकेमधून त्यांनी पदार्पण केले असले, तरी या मालिकेची निर्मिती रखडल्यामुळे १९८९ मध्ये प्रसारित झालेली फौजी ही त्यांची पहिली मालिका मानली जाते. यात त्यांची प्रमुख व्यक्तिरेखा होती. त्यानंतर अझीझ मिर्झा यांच्या सर्कस या मालिकेमधून ते चमकले. मणि कौल यांच्या १९९१ सालातील इडियट या लघुमालिकेमध्येही त्यांनी भूमिका केली.
चित्रपटसृष्टीत प्रवेश :
चित्रपटांमध्ये काम मिळविण्यासाठी शाहरुख खान १९९१ साली मुंबईत आले. त्यांना चार चित्रपट मिळाले. याच वर्षी त्यांनी गौरी छिब्बर या आपल्या दिल्लीतील प्रेयसीशी लग्न केले. १९९२ साली प्रदर्शित झालेला ऋषी कपूर आणि दिव्या भारती यांच्या भूमिका असलेला दिवाना हा शाहरुख खान यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला आणि चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला. राजू बन गया जंटलमन आणि कभी हां कभी ना या चित्रपटांसाठी त्यांचे कौतुक झाले, तर पुढच्याच वर्षी आलेल्या डर आणि बाजीगर या चित्रपटांमधून त्यांनी खलनायकी प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकार केल्या. बाजीगरसाठी त्यांना सर्वोत्तम नायकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, शाहरुख खान यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला तो दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या १९९५ साली आलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाद्वारे. यातील काजोल आणि त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. मुंबईच्या मराठा मंदिर या थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल वीस वर्षे दाखवला जात होता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एवढा काळ चाललेला हा एकमेव चित्रपट आहे. सर्व महत्त्वाच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेले त्यांचे बहुतेक चित्रपट यशस्वी झाले. त्यांच्या तुफान चाललेल्या चित्रपटांमध्ये यस बॉस, परदेस किंवा दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटांची नावे घेता येतील.
निर्मितीमध्ये प्रवेश :
१९९९ मध्ये दिग्दर्शक अझीझ मिर्झा आणि अभिनेत्री जुही चावला यांच्याबरोबर शाहरुख खान यांनी ‘ड्रीम्झ अनलिमिटेडʼ या नावाची निर्मितिसंस्था सुरू केली. फिर भी दिल है हिंदुस्तानी हा त्यांचा पहिला चित्रपट. हा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी अशोका या चित्रपटाची निर्मिती केली. व्हेनिस आणि टोराँटो येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला. भारतात मात्र तो सपशेल अपयशी झाला.
२००१ मध्ये शाहरुख खान यांना मणक्याच्या दुखापतीने ग्रासले. अखेर त्यांना त्यावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. त्यांची यशाची घोडदौड मात्र कायम होती. दिग्दर्शक करण जोहर यांचा कभी खुशी कभी गम, आदित्य चोप्रा यांचा मोहब्बतें, संजय लीला भन्साळी यांचा देवदास, निखिल अडवानी यांचा कल हो ना हो ही काही उदाहरणे देता येतील. याच सुमारास अनिवासी भारतीयांमध्येही त्यांची लोकप्रियता वाढू लागली.
२००३ मध्ये ड्रीम्झ अनलिमिटेडची निर्मिती असलेल्या चलते चलते या चित्रपटाच्या दरम्यान झालेल्या काही मतभेदांमुळे ही कंपनी बंद करण्यात आली. शाहरुख खान यांनी ‘रेड चिलीजʼ ही निर्मितिसंस्था सुरू केली, ज्यात त्यांची पत्नी गौरी निर्माती बनली. नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांनी दिग्दर्शक म्हणून केलेला मै हूं ना हा चित्रपट ही या नवीन कंपनीची पहिली निर्मिती होती.
शाहरुख खान यांनी जगभर अनेक कार्यक्रम केलेले आहेत. जोश, डॉन, जब तक है जान यांसारख्या आपल्या काही चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेस (२००४) मधील त्यांची मोहन भार्गव ही व्यक्तिरेखा आणि दिग्दर्शक शिमित अमीन यांच्या चक दे इंडिया (२००७) मधील फुटबॉल प्रशिक्षक कबीर खान या त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यानंतर प्रदर्शित झालेले त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत. २०१६च्या अखेरीला दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या डिअर जिंदगीमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. पुढे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या रईस (२०१७) या चित्रपटाने मोठे यश संपादन केले.
पुन्हा छोटा पडदा :
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दूरदर्शनवर अभिनय करणारे शाहरुख खान लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असताना पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले; पण या वेळेला कथामालिकेसाठी नव्हे, तर रिॲलिटी शोजमधून. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे यजमानपद त्यांनी भूषविले; परंतु अमिताभ बच्चन यांच्याएवढे यश त्यांना मिळू शकले नाही. क्या आप पांचवी पास से तेज है किंवा जोर का झटका या त्यांच्या मालिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) मधील कोलकाता नाइट रायडर्स नावाचा संघ विकत घेतला (२००८). त्यांच्या सर्व व्यवसायांची एकूण उलाढाल सु. दहा हजार कोटी रु. आहे. महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासू आणि यशस्वी असे हे अभिनेते आधुनिक परंतु सांस्कृतिक दृष्ट्या पूर्णपणे भारतीय पुरुषाचे प्रतिनिधित्व करतात, असे म्हटले जाते.
भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन शाहरुख खान यांना सन्मानित केले (२००५).
वाद :
आपल्या काही राजकीय आणि सामाजिक मतांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. माय नेम इज खान या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय संघटनेने विरोध केला होता. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना आमंत्रित करायला आपली हरकत नाही, असे विधान शाहरुख खान यांनी केले होते व त्याला शिवसेनेचा विरोध होता. त्याचा परिणाम म्हणून शाहरुख खान यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे या संघटनेने जाहीर केले होते. राज्य सरकारने दिलेल्या पोलीस बंदोबस्तामध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन झाले.
महत्त्वाचे चित्रपट, प्रसिद्धीवर्ष आणि दिग्दर्शक :
१ | दिवाना | १९९२ | राज कंवर |
२ | चमत्कार | १९९२ | राजीव मेहरा |
३ | राजू बन गया जंटलमन | १९९२ | अझीझ मिर्झा |
४ | माया मेमसाब | १९९३ | केतन मेहता |
५ | बाजीगर | १९९३ | अब्बास मस्तान |
६ | डर | १९९३ | यश चोप्रा |
७ | कभी हां कभी ना | १९९४ | कुंदन |
८ | करण अर्जुन | १९९५ | राकेश रोशन |
९ | दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे | १९९५ | आदित्य चोप्रा |
१० | यस बॉस | १९९७ | अझीझ मिर्झा |
११ | परदेस | १९९७ | सुभाष घई |
१२ | दिल तो पागल है | १९९७ | यश चोप्रा |
१३ | दिल से | १९९८ | मणि रत्नम |
१४ | कुछ कुछ होता है | १९९८ | करण जोहर |
१५ | बादशहा | १९९९ | अब्बास मस्तान |
१६ | फिर भी दिल है हिंदुस्तानी | २००० | अझीझ मिर्झा |
१७ | हे राम | २००० | कमल हसन |
१८ | जोश | २००० | मन्सूर खान |
१९ | मोहब्बतें | २००० | आदित्य चोप्रा |
२० | अशोका | २००१ | संतोष सिवन |
२१ | कभी खुशी कभी गम | २००१ | करण जोहर |
२२ | देवदास | २००२ | संजय लीला भन्साळी |
२३ | चलते चलते | २००३ | अझीझ मिर्झा |
२४ | कल हो ना हो | २००३ | निखिल अडवानी |
२५ | मै हू ना | २००४ | फराह खान |
२६ | वीर झारा | २००४ | यश चोप्रा |
२७ | स्वदेस | २००४ | आशुतोष गोवारीकर |
२८ | पहेली | २००५ | अमोल पालेकर |
२९ | कभी अलविदा ना कहना | २००६ | करण जोहर |
३० | डॉन | २००६ | फरहान अख्तर |
३१ | चक दे इंडिया | २००७ | शिमित अमीन |
३२ | ओम शांती ओम | २००७ | फराह खान |
३३ | रब ने बना दी जोडी | २००८ | आदित्य चोप्रा |
३४ | माय नेम इज खान | २०१० | करण जोहर |
३५ | डॉन २ | २०११ | फरहान अख्तर |
३६ | जब तक है जान | २०१२ | यश चोप्रा |
३७ | चेन्नई एक्सप्रेस | २०१३ | रोहित शेट्टी |
३८ | फॅन | २०१६ | मनीष शर्मा |
३९ | डिअर जिंदगी | २०१६ | गौरी शिंदे |
४० | रईस | २०१७ | राहुल ढोलकिया |
४१ | जब हैरी मेट सेजल | २०१७ | इम्तियाज अली |
संदर्भ :
- Chopra, Anupama King of Bollywood : Shahrukh Khan and the Seductive World of Indian Cinema, 2007.