सिन्हा, तपन : (२ ऑक्टोबर १९२४—१५ जानेवारी २००९). भारतीय चित्रपटनिर्माता. जन्म कोलकाता येथे. कोलकाता विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले. सिन्हा यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. तरुणवयात चार्ल्स डिकिन्झ यांची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी व त्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस सहायक ध्वनिमुद्रक म्हणून १९४६ मध्ये सिन्हा ‘न्यू थिएटर्स स्टुडिओ’मध्ये कामाला लागले. त्यानंतर दोन वर्षांनी कोलकात्यातीलच ‘मुव्हीटोन स्टुडिओ’त ते काम करू लागले. १९५० मध्ये त्यांना लंडनमधील ‘पाइनवूड स्टुडिओ’त काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दिग्दर्शक हर्लस क्रेटॉन यांच्यासोबत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ म्हणून काम केले. कलात्मक चित्रपटांची निर्मिती कशी करावयाची, याचे धडे त्यांना तेथे मिळाले. भारतात परतल्यावर १९५४ मध्ये नारायण गंगोपाध्याय यांच्या सैनिक कादंबरीवर त्यांनी अंकुश या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली; पण तो अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी उपहार या चित्रपटाची निर्मिती केली (१९५५). रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित काबुलीवाला हा त्यांचा चौथा चित्रपट १९५७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले, शिवाय बर्लिन आंतराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात संगीतासाठीचे रौप्यपदकही मिळाले.

सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या जगण्याच्या संघर्षाला तसेच सामाजिक समस्यांना चित्रभाषा देण्याचे काम सिन्हा यांनी केले. त्यांचा क्षुधित पाषाण (१९६०) हाही चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनेवर आधारित होता. अपनजान (१९६८), सगीना महातो (१९७०), एखोनी (१९७१) या सिनेमांतून त्यांनी कामगार संघटनांची दादागिरी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे हताश झालेल्या तत्कालीन युवकांचे प्रभावी चित्रीकरण केले. विधवांच्या प्रश्नांवर आधारित निर्जन सैकाते  हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला. लहान मुलांसाठी बनविलेल्या चित्रपटांमधील त्यांचे सफेद हाथी (१९७७) व आज का रॉबिनहूड (१९८७) हे चित्रपट खूप लोकप्रिय झाले. याशिवाय अदालत ओ एकरी मेये (१९८२), डॉटर्स ऑफ द सेन्च्युरी (२००१) हे त्यांचे चित्रपटही उल्लेखनीय ठरले. सिन्हा यांनी दूरदर्शनसाठी १९८४ मध्ये आदमी और औरत  आणि दीदी  या चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा १९९० साली प्रदर्शित झालेला एक डॉक्टर की मौत  हा चित्रपट नोकरशाहीतील भ्रष्ट राजकारणावर भाष्य करतो. या चित्रपटासाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार तपन सिन्हा यांना मिळाला.

सिन्हा यांनी एकूण ४१ चित्रपटांची निर्मिती केली. त्यांतील १९ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. लंडन, व्हेनिस, मॉस्को आणि बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत त्यांचे चित्रपट दाखविण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी सिन्हा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२००७). २१ जुलै २००८ रोजी दादासाहेब फाळके या प्रतिष्ठित पुरस्काराने सिन्हा यांना गौरविण्यात आले. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ २०१३ मध्ये टपाल तिकिटाचे अनावरण केले.

बंगाली चित्रपट अभिनेत्री अरुंधतीदेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पुत्र अनिंद्य सिन्हा हे वैज्ञनिक आहेत.

चित्रपटसृष्टीत सिन्हा यांचा सर्वश्रेष्ठ कथनकार (मास्टर स्टोरी टेलर) असा लौकिक होता. चित्रपटांसाठी उत्तम साहित्यकृतींची निवड हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रवींद्रनाथ टागोर, ताराशंकर बंदोपाध्याय, शरत्‌चंद्र चतर्जी, शरदिंदु बंदोपाध्याय, सुबोध घोष आणि रामपद चौधरी यांच्या कथा त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी निवडल्या. त्यांनी स्वत:ही काही कथा व चित्रपटगीते लिहिली.

कोलकाता येथे सिन्हा यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले.