रॉय, प्रतिभा : ( २१ जानेवारी १९४३). प्रतिभासंपन्न वाचकप्रिय, आघाडीच्या ओडिया लेखिका. त्यांचा जन्म ओदिशातील कटक जिल्ह्यातील बालीकुदा येथे झाला. त्यांचे गांधीवादी वडील परशुरामदास हे एक उत्तम कवी, शिक्षक होते आणि संस्कृतचे मोठे पंडित होते. त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव आहे. जातिभेद, वर्णभेद न मानणाऱ्या वैष्णव धर्माच्या घरातील संस्कारांमुळे त्या धर्मभेद, जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता याविरुद्ध परखडपणे आपल्या लेखनातून विचार मांडतात. त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता ; मात्र त्यांना डॉक्टर नाही तर लेखिका व्हायचं होते. लग्नानंतर तीन मुलं झाल्यावरही त्यांच शिक्षण सुरू होत. मग त्यांनी एम्.एड्. केलं आणि पुढे शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय घेऊन त्या पीएच्.डी. झाल्या.

ओडिशा सरकारच्या शिक्षण खात्यात त्या प्राध्यापक होत्या. वेगवेगळ्या महाविद्यालयात विभागप्रमुख व प्रपाठक म्हणून त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. पुढे स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ओरिसा लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून त्या काम करीत होत्या. ओडिया भाषेव्यतिरिक्त हिंदी ही त्या दुसरी मातृभाषा मानतात. त्यामुळे हिंदी, बंगाली, आसामी, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेतील कादंबऱ्याही त्यांनी वाचलेल्या आहेत. ओडिया भाषेचे पहिले ज्ञानपीठ विजेते गोपीनाथ मोहन्ती हे त्यांचे आवडते लेखक आहेत. आईची शिस्त, वडिलांचे संस्कार, विचारधारा यामुळे आणि लग्नानंतर इंजिनिअर पती अक्षयचंद्र राय यांच्या प्रोत्साहनामुळे त्या लिहू लागल्या.

वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदाच लिहिलेल्या ‘सकाळ हेला’ (सकाळ झाली) या कवितेच्या लेखनाने सुरू झालेला त्यांचा लेखनप्रवास आजही सुरू आहे. कथा,कादंबरी या सोबतच  बालसाहित्य, अनुवादित साहित्य आणि ललित लेखन असे  त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध झाले आहे. प्रतिभा राय यांचे प्रकाशित साहित्य : कादंबरी – बरखा बसंत बैसाख (१९७४), शिलापद्म (१९८३), याज्ञसेनी (१९८५), उत्तरमार्ग (१९८८), महामोह (१९९७), मग्नमाटी (२००३), आदिभूमी, महाराणीपुत्र (२००८), शेषईश्वर (२०१५); कथासंग्रहसामान्य कथन (१९७८), हातबक्सा (१९८३) भगबान रा देश (१९९१), सषष्ठी (१९९६), मोक्ष (१९९६), उल्लंघन (१९९८),निवेदनामिदम (२०००),गांधीका गाव (२००३), पूजाघर; ललितलेखन – संस्कृतीरा नवी पद्म (२०११), सहृदय कथाभाषा (२०१५) इत्यादी. पूजाघर आणि उल्लंघन या कथासंग्रहाचे मराठी अनुवाद राधा जोगळेकर आणि वासुदेव जोगळेकर यांनी केले आहेत.

पूजाघर  या कथासंग्रहात एकूण बारा कथा असून, आपल्या अवतीभवतीच्या समाजजीवनातील वास्तव अधोरेखित करतात. ‘वार्धक्य भत्ता’ आणि  ‘पूजाघर’ सारख्या कथा दोन पिढ्यातील बदलाच चित्रण करतात तर ‘अव्यक्त’, ‘पुतळा’, ‘ईश्वरवाचक’, ‘गवत’ आणि ‘आकाश’ सारख्या कथातून आर्थिक, सामाजिक विषमतेचे उपहासगर्भ चित्रण आहे. या संग्रहातील कथा विलक्षण उपहासात्मक आहेत. ‘पुतळा’ या कथेतील पैशाअभावी शिक्षणाचं स्वप्न पुरं न होऊ शकलेल्या विद्याधरचं चित्रण विलक्षण अंतर्मुख करणार आहे. ‘ईश्वरवाचक’ ही ढोंगी समाजाचा बुरखा फाडून टाकणारी एक विलक्षण वास्तववादी मुक्तचिंतनपर कथा आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त उल्लंघन  या कथासंग्रहात एकूण २१ कथा आहेत. ‘कपटपाश’, ‘सामान्य माणूस’, ‘जेवणावळ’ इ. कथातून झाडूवाला, ओझोवाला इ. अगदी तळागाळातील गरीब माणसाचं चित्रण आहे. ‘आईची वाटणी’, ‘बहिणीचा वाटा’ या कथातून पांढरपेशा समाजातील माणसांच्या वृत्तीचं चित्रण आहे. बहिणीला समान हक्क, समान वाटा मिळणार तर आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारीही तिने उचलायला हवी अशा गृहकलहाचं चित्रण असलेल्या या कथा आहेत. आजच्या काळातील, परदेशात स्थायिक झालेल्यांच्या मनातील अस्वस्थ आंदोलन व्यक्त करणारी ‘न सांगितलेली गोष्ट’ ही कथाही वाचकांना अंतर्मुख करते. ‘ॲदिक’ ही घरातील वृद्ध माणसांच्या परिस्थितीचं चित्रण करणारी कथा आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनामिक, दुर्लक्षित राहिलेल्या, स्वातंत्रसैकित्वाचा कुठलाही पुरावा हाती नसल्याने, अगतिक, ओढग्रस्त आयुष्य जगणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, अपंग,  गणपतीची आणि त्याच्या म्हाताऱ्या आईची, त्यांच्या मुलीच्या उध्वस्त जीवनाची कथा ‘गांधीजी म्हणाले होते’ या कथेतून त्यांनी मांडली आहे. मानवी स्वभावाचा, मानसिकतेचा शोध घेत, सरळ साध्या बोलीभाषेत केलेले रेखाटन हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य आहे.

प्रतिभा राय यांच्या एकूण २० कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बरखा, बसंत , बैशाख  ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. शिलापद्म आणि याज्ञसेनी  या त्यांच्या दोन कादंबऱ्या विशेष गाजल्या. पुराणकथा, दत्तकथा, लोककथा, रामायण, महाभारत इ. चा संदर्भासाठी भरपूर वापर त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्यांत दिसतो. केवळ स्त्री-जीवन (याज्ञसेनी, महामोह या कादंबऱ्या) हेच लेखनाचे केंद्र न ठेवता, चक्रीवादळ, आदीवासी जीवन (मग्नमाटी, आदिभूमी इ. कादंबऱ्या). हे वेगळे विषयही त्यांनी आपल्या लेखनात हाताळले आहेत. शीलापद्मचे कथाबीज कादंबरीच्या माध्यमातून रेखाटताना लेखिकेने केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनाला प्राधान्य न देता, त्यावेळचे शिल्पकार, प्रमुख शिल्पकार, कमल महाराणा, त्याची बालिकावधू चंद्रभागा त्यांचे कुटुंबीय, त्यांचा त्याग, विरह अशा वेगळ्या दृष्टिकोनातून प्रवाही भाषेत सुरेख लेखन केले आहे. शीलापद्म  या कादंबरीचा मराठी अनुवाद कोणार्क  या नावाने पद्माकर जोशी यांनी केला आहे. याज्ञसेनी, पांचाली, कृष्णा म्हणजेच द्रौपदी या व्यक्तिरेखेचा एक स्त्री, एक माणूस म्हणून आजच्या काळाच्या संदर्भात विचार करणारी, एका वेगळ्याच दृष्टिकोनातून, तिच्या आयुष्यातील घटनांकडे पाहून, विचार करायला लावणारी, गाजलेली, वाचकप्रिय कादंबरी म्हणजे याज्ञसेनी  होय. श्रीकृष्णाजवळ आपलं मन मोकळ करण्यासाठी पत्ररूपाने केलेली कादंबरीची रचना हे या कादंबरीचे वेगळेपण आहे. या कादंबरीचाच मराठी अनुवाद कृष्णा  या नावाने प्रसिद्ध झाला आहे. १९९१ मध्ये याज्ञसेनीला मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला आहे.

जगन्नाथ हा काही केवळ मोजक्या लोकांचीच मक्तेदारी असलेला देव नाही, अस जगन्नाथपुरीच्या पुजाऱ्यांना ठणकावून सांगणाऱ्या अन्याय विषमतेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या प्रतिभासंपन्न वाचकप्रिय,आघाडीच्या ओडिया लेखिका. अशा प्रकारच्या स्पष्ट, परखड लेखनशैलीमुळे प्रतिभा रॉय यांना कम्युनिस्ट, स्त्रीवादी समजलं जात असलं तरी या संदर्भात त्या म्हणतात, “मी स्त्रीवादी नाही तर मानवतावादी लेखिका आहे. अभ्यासपूर्ण, संवेदनशील पुरोगामी लेखन करणाऱ्या आघाडीच्या लोकप्रिय ओडिया लेखिकेला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अनेक देशात साहित्यिक, शैक्षणिक चर्चासत्रामध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केल आहे. अनेक संस्थांच्या त्या सन्माननीय सदस्य आहेत. मूर्तीदेवी पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत. याव्यतिरिक्त साहित्य अकादमी पुरस्कार, सारळा, सप्तर्षी, विष्णु पुरस्कार, अमृतकीर्ती पुरस्कार, कपिला पुरस्कार, ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार (२०११ ) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पद्मश्री या पुरस्काराने भारत सरकारने त्यांना सन्मानित केले आहे (२००७). त्यांच्या साहित्याचे, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, मलयाळम्, असमिया, पंजाबी, बंगाली आणि हंगेरियन भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

संदर्भ :

  • Datta, Amaresh,(Edi), Encyclopaedia of Indian Literature, New Dehli, 1988.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.