भातखंडे पद्धतीनुसार पूर्वी थाटात पुढील रागांचा समावेश होतो : (१) पूर्वी, (२) श्री, (३) गौरी, (४) रेवा, (५) मालवी, (६) त्रिवेणी, (७) टंकी, (८) पूरियाधनाश्री, (९) जैतश्री, (१०) दीपक, (११) परज, (१२) वसंत व (१३) बिभास. शेवटचे तीन राग वगळता बाकीचे सर्व राग सायंगेय आहेत. पूर्वी थाटातील रागांचे दोन उपवर्ग पडतात : (१) पूर्वी अंग घेणारे राग व (२) श्री अंग घेणारे राग. श्री, गौरी, मालवी, त्रिवेणी, टंकी व वसंत हे राग श्री अंग घेतात. हंसनारायणी आणि मनोहर याही रागांचा पूर्वी थाटात समावेश करावा, असे आधुनिक मत आहे. पूर्वी थाटात रे कोमल, म तीव्र आणि ध कोमल हे स्वर असून बाकीचे स्वर शुद्ध असतात.
संदर्भ :
- भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र, (भाग तिसरा ), हाथरस, १९५७.
समीक्षण : सुधीर पोटे