शिक्षण प्रक्रियेमध्ये आर्थिक तत्त्वे, संकल्पना, नियम, सिद्धांत, वित्तपुरवठा, विविध शैक्षणिक कार्यक्रम इत्यादी शिक्षणासंबंधी आर्थिक मुद्द्यांचा अभ्यास आणि उपयोजन करणे म्हणजे शिक्षणाचे अर्थशास्त्र होय. यामध्ये दुर्मिळ साधनांचे वाटप विशिष्ट पूर्वनिश्चित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कसे करावे, याच्याशी निगडीत असणारे सर्व प्रश्न अभ्यासले जातात. शिक्षणात वापरता येणाऱ्या वस्तूंची निर्मिती, पुरवठा आणि तत्सम बाबींचे आर्थिक व्यवस्थापन केले जाते. तसेच शालेय शिक्षणासंदर्भातील मानवी वर्तन क्रिया व प्रतिक्रिया यांचा अभ्यास केला जातो. कामगारांचे अर्थशास्त्र, सार्वजनिक विकासाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, विकासात्मक अर्थशास्त्र, वाढीचे सिद्धांत इत्यादींमधील प्राथमिक संकल्पना यामध्ये सर्वसामान्यपणे अभ्यासले जातात. त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या स्त्रोतामधून उत्कृष्ट आणि शक्यप्राय शैक्षणिक प्रगती कशी घडवून आणावी किंवा स्वीकृत निवड कशी करावी, याबाबतचा कार्यालयीन अभ्यास शिक्षणातील व्यवस्थापकांद्वारे यामध्ये केला जातो. शिक्षण क्षेत्रातील उत्पादन व वितरण यांसंदर्भातील सोडविले जाणारे प्रश्न शिक्षणाच्या अर्थशास्त्राद्वारे चर्चिले जातात.
शिक्षणाचा अर्थशास्त्रीय दृष्ट्या विचार केला, तर शिक्षणावरील गुंतवणूक व खर्च किती होतो याचे मोजमाप शिक्षणाचे अर्थशास्त्र यामध्ये केले जाते. समाजास, राष्ट्रास उपयोग होणारी उत्पादने निर्माण होण्याकडे शिक्षणाचे अर्थशास्त्र विशेष लक्ष पुरविते. उत्पादनाचा ग्राहक कोण? या उत्पादनाचा वापर कशासाठी होणार आहे? इत्यादी प्रश्नांचा विचार यामध्ये केला जातो. शिक्षणाच्या दर्जेदार उत्पादनाचे वितरण करावयाचे असेल, तर शिक्षण ही वस्तू (Commodity) आहे असे समजून तिचे मूल्य ठरविणे इत्यादी बाबी शिक्षणातील आर्थिक कक्षेत येतात. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था, शासन इत्यादी शैक्षणिक घटकांवरील झालेल्या खर्चाचे व्यय लाभ विश्लेषण (Cost Benefit Analysis) शिक्षणाच्या अर्थशास्त्राद्वारे करण्यात येते आणि यावरूनच शिक्षणाच्या फायद्यांचा किंवा लाभांचा विचार करणे सोयीचे जाते. परतावा दर विश्लेषणाद्वारे (Rate of Return Analysis) परतावा दरानुसार कितपत लाभ प्राप्त झाला, हे समजण्यास मदत होऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा परतावा दर काढणे सुलभ जाते. म्हणजेच शिक्षणाच्या माध्यमातून गुंतवणूक करून त्याचा उपयोग सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय दृष्टीकोनातून कसा करून घ्यायचा यासंदर्भात शिक्षणाचे अर्थशास्त्र मार्गदर्शन करते.
शिक्षणातील दर्जेदार उत्पादन (कुशल विद्यार्थी) निर्मितीसाठी आवश्यक कच्चा मालावर (अकुशल विद्यार्थी) योग्य प्रक्रिया (अध्यापन) व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शिक्षणाच्या अर्थशास्त्राची मदत होते. तयार झालेले उत्पादन वितरीत झाले पाहिजे व त्यातून समाजाच्या गरजा भागल्या पाहिजेत. त्यामुळे वितरणाची व्यवस्थासुद्धा शिक्षणाच्या अर्थशास्त्राचा अविभाज्य भाग बनते. उत्पादनाची प्रक्रिया चालू असतांना ज्या ज्या बाबींचा वापर होणार आहे, त्यांचे व्यवस्थापन तसेच ज्या ठिकाणी दुर्मिळता निर्माण होईल अशी दुर्मिळता दूर करणे हे शिक्षणाच्या अर्थशास्त्रात समाविष्ट असते.
समीक्षक : बाबा नंदनपवार