कूपर, सर धनजीशा : (२ जानेवारी १८७८–२९ जुलै १९४७). स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचे पहिले प्रधानमंत्री. ते पारशी समाजातील होते. त्यांचे वडील बोमनजी इर्जीभाई कूपर सातारा येथील शासकीय मद्य गोदामात सुतारकाम करीत. ते गरीब कुटुंबातील होते. धनजीशांच्या आईचे नाव फिरोजबाई. पत्नीचे नाव गुलाबाई. त्यांना पाच कन्या व नरीमन नावाचा एक मुलगा अशी सहा अपत्ये होती. धनजीशा यांचे शिक्षण सातारा येथील शासकीय विद्यालयामध्ये (सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल) मॅट्रिकपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ नोकरीधंदा करून थोडीफार कमाई केली. पद्मशी पेपर मिलमध्ये नोकरी करत असताना त्यांनी आबकारी कंत्राट-व्यवसायातील खाचाखोचा जाणून घेतल्या. ते स्वतंत्रपणे लहान–सहान सैनिकी कंत्राटे (मिलिटरी कॉन्ट्रॅक्ट) घेत. नोकरीधंद्यात मिळविलेल्या धनसंपत्तीमुळे त्यांच्या आयुष्याला स्थैर्य लाभले व त्यांची समाजातील पतही वाढली.
सातारा शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ व उदारमतवादी नेते रावबहादूर रावजी रामचंद्र काळे यांच्या आग्रहामुळे धनजीशा यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला (१९१२). रावबहाद्दूर काळे यांनीच त्यांना राजकारणाची दीक्षा दिली. सत्तेच्या माध्यमातून व ब्रिटिश राज्यकर्त्यांशी सलोखा राखून समाजकारण, कृषिविकास व औद्योगिकीकरण या तिन्ही क्षेत्रांत जमेल तेवढे काम करण्याचे त्यांचे धोरण होते.
राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रेरणेने १९२० साली स्थापन झालेल्या ब्राह्मणेतर पक्षात धनाजीशा सामील झाले. सातारा जिल्ह्यातील ब्राह्मणेतर पक्षावर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे या पक्षाच्या नेत्यांत मतभेद होऊन गटबाजी निर्माण झाली. यावेळी धनजीशा यांनी जिल्ह्यात स्वत:चा राजकीय गट बांधला. तो ‘कूपर पार्टी’ या नावाने ओळखला जात होता. कूपर पार्टीत प्रामुख्याने सावकार, जमीनदार, सरंजामदार अशा अभिजनांचा समावेश होता. परिणामत: या पार्टीच्या राजकारणाचे स्वरूप सरंजामशाहीचे होते. सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड इ. संस्था १९२० पासून सु. दोन दशके या पार्टीच्या वर्चस्वाखाली होत्या.
स्वातंत्र्यपूर्वकालीन सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यात किर्लोस्कर, ओगले यांच्याप्रमाणे धनजीशा कूपर यांचेही योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी १९२२ साली सातारा रोड स्टेशनजवळ पाडळी येथे आपला ‘कूपर इंजिनिअरिंग वर्क्स’ हा कारखाना सुरू केला. त्या कारखान्यात प्रारंभी लोखंडी नांगर, ऊसाचे चरक, शेंगा फोडण्याचे यंत्र, मोटेचे चाक, तेलाचे घाणे इ. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांची निर्मिती होत होती. त्यामुळे ग्रामविकासाला चालना मिळाली. धनजीशांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची ओढ होती. त्यांनी मोटारीचे नवीन इंजिन बनवून १९२६ साली महाबळेश्वर येथे मुंबईच्या गव्हर्नरला त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. १९३० च्या सुमारास हिंदुस्थानातील उद्योगक्षेत्रावर मंदीचे सावट पडू लागले. त्यावर मात करण्यासाठी डिझेल इंजिनची निर्मिती करण्याचा धनजीशांनी निर्धार केला. त्याप्रमाणे १९३३ पासून कूपर कारखान्यात डिझेल इंजिनची निर्मिती होऊ लागली.
धनजीशा यांनी सातारा शहराचे नगराध्यक्ष, सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद, मंत्री, गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि मुंबई प्रांताचे प्रधानमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषविली. १९३३-३४ साली मुंबई प्रांतिक सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था खात्याचे ते मंत्री झाले. त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ हा किताब बहाल केला. त्यामुळे ते ‘सर धनजीशा कूपर’ झाले. १९३५ ते १९३७ या काळात त्यांनी मुंबई प्रांताच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचा सभासद या नात्याने अर्थ व महसूल या महत्त्वाच्या राखीव खात्यांचा कारभार पाहिला. १९३७ साली देशात निर्माण झालेल्या राजकीय व घटनात्मक पेचप्रसंगामुळे त्यांना मुंबई प्रांताचा पहिला प्रधानमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यांनी अल्पमतातील चार सदस्यीय संमिश्र मंत्रीमंडळाचे नेतृत्व करून दि. १ एप्रिल ते १२ जुलै १९३७ या कालावधीत मुंबई प्रांताचा कारभार पाहिला. सार्वजनिक जीवनातील प्रशंसनीय कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ‘खानबहादूर’ किताबाने सन्मानित केले.
१९४४ साली त्यांच्या नरीमन या एकुलत्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. या धक्क्यातून ते सावरले नाहीत.
मुंबई येथील ताजमहाल हॉटेलमध्ये धनजीशा यांचे निधन झाले.
संदर्भ :
- गुजर, जयवंत, सहस्रकातील वेगळा पारशी सर धनजीशा कूपर, पुणे, २००३.
- फडके, य. दि. विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड : ३ व ४, पुणे, १९९३.
- भोसले, अरुण व इतर संपा., प्राचार्य आर. डी. गायकवाड गौरव ग्रंथ, शोध इतिहासाचा, भाग-१, सातारा, २०१६.
समीक्षक : अवनीश पाटील