महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. पवनी आणि आदम या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननात भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे पुरावे मिळालेले आहेत. पुढे मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. हे किल्ले दोन प्रकारांत बांधण्यात आले आहेत. यांतील काही किल्ले हे उंच टेकडीवर आहेत, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो तर काही किल्ले हे जमिनीवर म्हणजेच भुईकोट प्रकारात बांधलेली आहेत.

अमरावती जिल्ह्यातील गाविलगड.

मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. अंदाजे १२-१३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, गडबोली, राजोली, माणीकगड, सुरजागड इत्यादी ठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली. किल्ल्यांच्या स्थापत्य कलेतून त्यांच्या बांधणीचा कालखंड निदर्शनास येतो. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नागांचे शिल्पांकन कोरलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले नागवंशी राजांनी बांधले असावेत, असा समज आहे. माणीकगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला आकाराने मोठा असून त्याची तटबंदी ही फार लांबवर पसरलेली आहे. किल्ल्यातील स्तंभ, कमानी, मेहरपी अगदी सुबक अशा कलाकुसरीने बनविलेल्या आहेत. वैरागड, सुरजागड, इत्यादी किल्यांची केवळ तटबंदी शिल्लक असलेली आढळून येते.

गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेऊन त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख आहेत. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४००  वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. बल्लारशहा हा किल्ला वर्धा नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. हा किल्ला चंद्रपूर येथील किल्ल्याच्या तुलनेत आकाराने लहान असून किल्ल्याची तटबंदी व बुरुजे मजबूत स्थितीत आहेत. आतील भागांत काही बांधकामे निदर्शनास येतात, परंतु ती मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहेत. चंद्रपूर हा किल्ला आकाराने मोठा असून या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आधुनिक वसाहत निर्माण झाली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज काही भागांत सुस्थितीत आहेत.

गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले अतिशय सुबक प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरील हत्तीवर आरूढ सिंहाचे शिल्पांकन हे गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. नगरधन, देवळापार, देऊळगाव, भद्रावती, रामटेक, नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आमनेर किल्ला, महदागड किल्ला, पवनीचा किल्ला, वैरागड किल्ला, माहुरगड, अंबागद, भिवगड, गडबोली किल्ला इत्यादी गोंडकालीन किल्ल्यांचे अवशेष आज विदर्भात पाहायला मिळतात. या किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून सध्या केवळ तटबंदी व प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत.

१३ व्या शतकात खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा उदय झाला व पश्चिम विदर्भावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. खिलजी, तुघलक आणि बहमनी राजसत्तांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यामध्ये गाविलगड, नरनाळा, बाळापूर इत्यादी किल्ल्याचा समावेश होतो. गाविलगड हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.

गाविलगड हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणारा जो मार्ग होता, त्या मार्गावर बांधण्यात आलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे. याच भागात नरनाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दहाव्या शतकात गोंडानी बांधला, असे म्हटले जाते. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात अहमदशहा वली याच्या काळात या किल्ल्याचे नुतनीकरण झाल्याची नोंद सापडते. नंतरच्या काळात मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला.

नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. त्यामध्ये नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवटींना सत्ता स्थापन करताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मुस्लीम व मराठा काळातील किल्ले अतिशय मजबूत, तसेच शत्रूच्या आक्रमणापासून सावध राहण्याकरिता केलेल्या सर्व उपाययोजनांनी युक्त आहेत. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भुईकोट प्रकारातील किल्ले निदर्शनास येतात. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या भागावर येथील स्थानिक गोंड राजांनी राज्य केले. गोंड राजांनी सुरुवातीपासून वेगवेगळ्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पतकरल्यामुळे फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागत असे.

संदर्भ :

  • चितळे, श्रीपाद, विदर्भातील किल्ले, नागपूर, २००९.
  • राजूरकर, अ. ज. चंद्रपूरचा इतिहास, चांदा (चंद्रपूर), १९५४.

समीक्षक : सचिन जोशी