ॲबे, अर्न्स्ट कार्ल : (२३ जानेवारी, १८४० — १४ जानेवारी, १९०५).
अर्न्स्ट कार्ल ॲबे यांचा जन्म आयसेनाख (Eisenach) येथे झाला. १८५७ मध्ये ॲबे यांनी आयसेनाख जिम्नॅशियम येथून पदवी प्राप्त केली. त्यानंतर गटिंगेन येथून पीएच. डी. प्राप्त केली.
ॲबे हे १८६६ मध्ये झाइस ऑप्टिकल वर्क्सचे (Zeiss Optical Works) संशोधन संचालक झाले आणि इ.स. १८६८ मध्ये त्यांनी ॲपोक्रोमॅटिक म्हणजेच गोलीय व वर्ण विपथन विरहित भिंगाचा शोध लावला. यात तीन विविध तरंगलांबीच्या किरणांना एकाच बिंदूवर केंद्रित केले जाते. त्यामुळे प्रतिमेतील रंगदोष नाहीसे होऊन प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट दिसते.
ॲबे यांनी १८७० मध्ये संघनक भिंगाचा (condenser lens) शोध लावला. हा संघनक ॲबे कंडेन्सर/संघनक भिंग म्हणून आजही प्रसिद्ध आहे. सूक्ष्मदर्शकाखाली प्रदीपनासाठी (Illumination) त्यांनी प्रथमच संघनक भिंग वापरले. दोन भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शकाखाली मिळणाऱ्या प्रतिमा प्रकाशित व्हाव्या यासाठी ॲबे यांनी शोधून काढलेले संघनक भिंग हे सूक्ष्मदर्शकाचा अत्यंत महत्त्वाचा भाग समजले जाते.
ॲबे यांनी १८७१ मध्ये प्रथमच रिफ्रॅक्टोमीटर/प्रणमनांक मापक तयार केला. १८७२ मध्ये ॲबे यांनी अतेजस्वी वस्तूची प्रतिमा (Image Of Non-Luminous) कशी तयार होते याचे नियम विकसित केले. १८७२ मध्ये झाइस ऑप्टिकल वर्क्स अंतर्गत ॲपोक्रोमॅटिक सूक्ष्मदर्शकाची विक्री केली जात होती. ॲपोक्रोमॅटिक सूक्ष्मदर्शकाखाली मिळणारी प्रतिमा वर्धित केल्यास ती अंधुक होत जाते, हे त्यांना आढळले.
प्रतिमेच्या वर्धनाबरोबरच त्याची स्पष्टता वाढवण्यासाठी १८७३ मध्ये ॲबे यांनी संशोधन करून सूक्ष्मदर्शकाखाली मिळणाऱ्या प्रतिमेच्या स्पष्टतेची मर्यादा (Resolution) वाढवण्याचे सूत्र तयार केले.
d = λ / n sin θ
वरील सूत्रामध्ये, d = स्पष्टता मर्यादा, λ= प्रकाशकिरणांची तरंगलांबी, n sin θ = अंकीय रंध्रव्यास (Numerical aperture).
ॲबे यांनी १८७४ मध्येअ काँट्रिब्युशन टू द थिअरी ऑफ द मायक्रोस्कोपी अँड द नेचर ऑफ मायक्रोस्कोपिक व्हिजन हा प्रबंध प्रकाशित केला. १८७८ मध्ये ॲबे यांनी पहिली एकजिनसी सूक्ष्मदर्शक विसर्जन प्रणाली (Homogenous Immersion System For The Microscope) तयार केली.
ॲबे हे १८७८ मध्ये येना (Jena) येथील खगोलशास्त्रीय आणि हवामान वेधशाळेचे संचालक झाले. १८९५ मध्ये त्यांनी दूरदर्शीवर (Telescope) काम केले. ॲबे गणनक्रिया (calculations) आणि अवस्था विपर्यास (Phase contrast) सूक्ष्मदर्शक हे त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन आहे.
येना येथे ॲबे यांचा मृत्यू झाला.
संदर्भ : 1. https://www.findagrave.com/memorial/131322738/ernst-karl-abbe
2. https://www.asp.uni-jena.de/ernst_abbe.html
3. https://peoplepill.com/people/ernst-abbe-1/
समीक्षक : रंजन गर्गे