विषाणू हा सूक्ष्म संक्रामित घटक असून फक्त सजीव आश्रयी पेशीत स्वत:चे पुनुरुत्पादन करतो. सर्व प्राणी, वनस्पती व जीवाणू अशा सजीव पेशीमध्ये विषाणू संक्रामित होऊ शकतात. एकेकाळी विषाणू सजीव की निर्जीव यावर बरीच चर्चा होत असे. परंतु, सर्व सजीवांचा मूल घटक पेशी आहे या व्याख्येनुसार विषाणू सजीव नाही. विषाणूंचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आश्रयी पेशींवर अवलंबून राहणे हे होय. या परजीवी स्थितीस ‘सदापरजीवी’ (Obligate parasite) असे म्हणतात. त्यांना स्वतंत्र आस्तित्व नसते. जसे बांडगूळ वनस्पती दुसऱ्या आश्रयी  वनस्पतींवर वाढते तसे विषाणू फक्त आश्रयी पेशीतील घटकांच्या साहाय्याने आपली संख्या वाढवतात.

विषाणू

विषाणू सुमारे २०−२५० नॅनोमीटर व्यासाचे आणि ७००−१००० नॅनोमीटर (१ नॅनोमीटर = १०-९ मीटर) लांबीचे असल्याने ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. तर त्यांची ठेवण  गोफासारखी (Helical) किंवा विषंतिपृष्ठक (Icosahedral) असते. अधिक किचकट रचनेचे विषाणू आढळले आहेत. विषाणूंतील जनुकीय भाग डीएनए किंवा आरएनए न्यूक्लिइक अम्लाने बनलेला असतो. विषाणू जीनोम सुमारे १–२.५ Mb एवढा  असतो (१ Mb = १ ०,००,००० बेस जोड्या). जनुकीय रेणूभोवती असलेल्या प्रथिन आवरणामुळे (Capsid) जनुकीय रेणूचे रक्षण होते.

विषाणूंचे वर्गीकरण आश्रयी पेशीनुसार होते. उदा., वनस्पती पेशीतील वनस्पतीभक्षी विषाणू (Plant viruses) − तंबाखूच्या पानांच्या पेशीमध्ये वाढणारा टीएमव्ही विषाणू (Tobacco mosaic virus), प्राणी पेशींमध्ये प्रवेश करणारे विषाणू (Animal viruses) − मानवी चेतापेशीमधील पोलिओ विषाणू, जीवाणूमध्ये राहणारे जीवाणूभक्षीफेज विषाणू (Bacteriophage) − ई. कोलाय या जीवाणूत वाढणारा कोलायफाज वगैरे.

विषाणूंचा प्रसार विविध मार्गांनी होतो. वनस्पतीतील विषाणू संसर्ग कीटकामधून किंवा वाहकांमार्फत (Vector) होतो. प्राण्यांमधील संसर्ग विविध शारीरिक स्त्रावांमधून किंवा शरीरसंबंधावाटे किंवा  त्वचा, मुख, योनीस्त्राव अशा विविध मार्गांतून  होतो.

विविध प्रकारचे विषाणू

विषाणू आश्रयी पेशीची यंत्रणा वापरून पुनरूत्पादन करतात. ते स्वत: ऊर्जा संचय करत नाहीत. कृत्रिम माध्यमात विषाणू वाढवणे अवघड आहे, त्यामुळे विषाणू वाढवण्यासाठी अंड्यातील गर्भ पेशी किंवा पेशी संवर्धन (Tissue culture) माध्यम वापरले जाते. विषाणूंच्या वाढीमुळे आश्रयी पेशी किंवा ऊती मृत झाल्याने अपारदर्शक पांढरे ठिपके तयार होतात. त्याला पॉक (Pock; एक डागासारखा ठिपका) असे म्हणतात. विषाणूंच्या वाढीसाठी पेशी मिश्रण ३६ से. स्थिर तापमानास ३ ते ६ दिवस ठेवावे लागते. जीवाणूभक्षी विषाणू पेट्रीबशीत जीवाणूंच्या वाढलेल्या थरात वाढवता येतात. यात मृत जीवाणूमुळे पारदर्शक गोलाकार विभाग तयार होतात, त्याला प्लाक (Plaque; चट्टा) असे म्हणतात. या वाढीकरिता पेशी मिश्रण ३७ से. तापमानाला २४ तास उबवावे लागते.

विषाणू हे फक्त सजीव पेशीत वाढत असल्याने पेशीच्या बाहेर ते अतिसूक्ष्म कणांच्या रूपात असतात. त्यांना विषाणू कण (Virions) असे म्हणतात.

पहा : विषाणू वर्गीकरण, व्हायरस (पूर्व प्रकाशित).

संदर्भ :

  • https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK21523/
  • http://library.open.oregonstate.edu/microbiology/chapter/introduction-to-viruses/
  • https://www.avert.org/about-hiv-aids/how-infects-body
  • https://en.wikipedia.org/wiki/Virus

समीक्षक : रंजन गर्गे