योजना : गोवा काबीज करण्यासाठी एक इन्फन्ट्री डिव्हिजन, चिलखती दलाची एक रेजिमेंट, तोफखाना दलाचे दस्ते आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने यांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. भारतीय नौदलाला गोव्याची नाकेबंदी करून जहाजांना गोवा बंदरात येण्यापासून रोखण्याचे आदेश दिले गेले. दीव जिंकण्यासाठी दोन इन्फन्ट्री बटालियन, जामनगरवरून हवाई मदत आणि नौदलाकडून किनाऱ्यावरील किल्ला आणि तटबंदी यांवर हल्ले चढविण्याचे ठरले. दमणमधील संरक्षक तटबंदी कमजोर असल्यामुळे एक इन्फन्ट्री बटालियन आणि तोफखान्याचे दस्ते वर्ग करण्यात आले. हवाईमार्गे त्यांना मुंबईमधून हवाई दलाची विमाने साहाय्य पुरवणार होती. ही संपूर्ण मोहीम लेफ्टनंट जनरल जे. एन. चौधरी, जी. ओ. सी. दक्षिण कमान (नंतरचे लष्करप्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली. गोव्यातील सैन्यदल मेजर जनरल के. पी. कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली होते. ही मोहीम १५/१६ डिसेंबर १९६१ च्या रात्री सुरू करण्याची योजना केली गेली आणि ह्याला ‘ऑपरेशन विजय’ हे सांकेतिक नाव दिले गेले.
भारतीय फौजा :
- गोवा क्षेत्र : पायदळ : मेजर जनरल के. पी. कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली एक डिव्हिजन आणि ५० पॅराशूट ब्रिगेड. नौदल : आयएनएस म्हैसूर आणि काही मदतनीस बोटी अंजदीव बेटाच्या विरुद्ध; आयएनएस बेटवा आणि बिआस ह्या मोर्मुगोवा बंदराच्या विरुद्ध तैनात केल्या. हवाई दल : कॅनबेरा बॉम्बवर्षक आणि हंटर लढाऊ विमाने.
- दीव क्षेत्र : दोन पायदळ बटालियन, कॅनबेरा आणि हंटर विमाने आणि नौदलाच्या युद्धनौका.
- दमण क्षेत्र : एक पायदळ बटालियन, नौदलाच्या युद्धनौका आणि हवाई दलाची बॉम्बवर्षक विमाने.
पोर्तुगीज सैन्य : ५००० सैनिक गोवा येथे, ५०० सैनिक दीव येथे आणि त्यापेक्षाही कमी संख्येने दमण येथे होते. परंतु त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे भारतीय सैन्याच्या तुलनेत आधुनिक होती. अल्बुकर्क ही पोर्तुगीजांकडील मुख्य युद्धनौका होती व तिच्यासह अन्य लहान नौकाही होत्या.
अंमलबजावणी : ११ डिसेंबर १९६१ पर्यंत भारतीय फौजा मोहिमेसाठी बेळगाव, वापी आणि उना येथे अनुक्रमे गोवा, दमण आणि दीव येथे हल्ला करण्यासाठी एकवटल्या होत्या. आरंभी जरी मोहिमेची सुरुवात १५/१६ ऑक्टोबरच्या रात्री करण्याची योजना होती; तरी प्रत्यक्ष मोहीम सुरू होण्यास उशीर झाला. भारताच्या सैन्याची जमवाजमव झालेली पाहताच पोर्तुगीजांनी त्याचा गवगवा करून आंतरराष्ट्रीय समुदायास आवाहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची आशा होती की, पश्चिमी सत्ता हस्तक्षेपाचा प्रयत्न करतील. परंतु कोणत्याही पश्चिमी सत्तेकडून भारतावर लागलीच दबाव आणला गेला नाही.
हवाई दलाच्या बॉम्बवर्षक विमानांनी १८ डिसेंबरच्या पहाटे दाभोळ विमानतळावर बॉम्बवर्षाव करून मोहिमेची सुरुवात केली. तसेच सांबरा येथील हंटर विमानांनी बांबोलिमचे दळणवळण केंद्र नष्ट केले.
ब्रिगेडियर सगत सिंह यांच्या नेतृत्वाखालील ५० पॅराशूट ब्रिगेडने ईशान्येकडून पणजीकडे आगेकूच केले. दोन पायदळ ब्रिगेडनी पूर्वेकडून पणजीकडे कूच केले. डिव्हिजनने दक्षिणेकडून कूच केले आणि अग्वादा किल्ल्यातील किरकोळ प्रतिकार सोडता या सैन्यदलाने प्रतिकार मोडून काढला. १९ डिसेंबरच्या दुपारपर्यंत पणजी आणि म्हापसा काबीज झाले.
भारतीय नौदलाने बंदरांची नाकेबंदी केली आणि अंजदीव बेटावर तोफांचा भडीमार करून व सागरी हल्ला करून ते बेट जिंकून घेतले. हल्ला करणाऱ्या दलांवर किनार्यावरून मशीनगनचा तीव्र गोळीबार झाला. सरतेशेवटी १९ डिसेंबरच्या दुपारी हे बेट काबीज झाले. मार्मुगोवा बंदरात नौदलाच्या गोळीबारात अल्बुकर्क लढाऊ जहाजाची खूप हानी झाली व ते जिंकून घेण्यात आले.
दीव आणि दमणमधील लढाईसुद्धा एकाच वेळी सुरू झाली. हवाई दल आणि नौदलाने तोफांचा भडिमार करून दीवचा किनारी किल्ला आणि तटबंदी मोडून काढली. तरीही शत्रूने तीव्र प्रतिकार केला. दोन पायदळ बटालियननी दोन दिशेने खाडी पार केली. त्यांचा सुरुवातीचा हल्ला मशीनगनच्या गोळीबाराने परतवण्यात आला. परंतु शेवटी पोर्तुगीजांची तटबंदी काबीज करण्यात आली. दमण येथे सुरुवातीच्या तीव्र प्रतिकारानंतर भारतीय बटालियनने शत्रूची मोर्चेबंदी काबीज केली. ह्या वेळेच्या बॉम्बवर्षावात दमणचा गव्हर्नर जखमी झाला.
पोर्तुगीजांच्या शरणागतीनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी लढाई संपुष्टात आली. ३००० पोर्तुगीज सैनिकांना कैदी करण्यात आले. भारतीय सैन्यदलांनी निर्णायक विजय प्राप्त केला होता. भारतातील पोर्तुगीजांची दोन-अडीच शतकांची सत्ता कायमची संपुष्टात आली.
संदर्भ :
- Chandra, Bipin; Mukherjee, Mrudula; Mukherjee, Aditya, India Since Independence, Delhi, 2008.
- Subramaniam, Arjun, Indias Wars : A Military History – 1947‒1971, Delhi, 2016.
- https://www.bbc.com/news/world/asia-india-42390008
भाषांतरकार : अजय मुधोळकर
समीक्षक : शशिकांत पित्रे