भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्भवलेले दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी १८४५-४६ साली झालेले हे पहिले युद्ध.

पार्श्वभूमी : रणजीतसिंगांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीचे एका साम्राज्यात १७७६ ते १८०४  पर्यंत यशस्वीपणे रूपांतर केले होते. आणि त्यांनी इंग्रजी सत्तेशी मैत्री करण्याचा पर्याय निवडला होता. १८४५ पूर्वी रणजितसिंगांच्या प्राबल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी शिखांच्या विरुद्ध कोणतेही आक्रमक पाऊल उचलण्यास कचरत होती. १८०९ मध्ये कंपनी आणि रणजितसिंग यांच्यात मैत्रीचा करार झाल्यानंतर कंपनीच्या धोरणात बदल झाला होता. उत्तर आणि पश्चिमेकडील बंडखोर जमातींना रणजितसिंग अनायासे काबूत ठेवतच होते. खर्च न करता हे काम साधले जाणे कंपनीच्या फायद्याचेच होते.

रणजितसिंगांच्या मृत्यूनंतर १८४५ मध्ये त्यांचा अज्ञान असलेला धाकटा मुलगा दलीपसिंग यास गादीवर बसवून राजमाता जिंदन सर्व राज्यकारभार पाहात असे; परंतु खरी सत्ता सैन्याच्या ताब्यात होती. नियंत्रणाबाहेर गेलेल्या सैन्याला काबूत ठेवण्यासाठी पंजाबवरील आक्रमणाची इंग्रजांना गरज भासू लागली. सतलज नदी पार करण्याची वेळ आल्यास त्यासाठी लागणाऱ्या साधनांची तजवीज चालू झाली होती. मुंबईमध्ये ६० लोखंडाच्या बोटी बनवून त्या फिरोझपूरजवळील खुंडाघाट येथे पोहोचविण्यात आल्या होत्या. मार्च १८४५ मध्ये जम्मूचे राजे गुलाबसिंग यांनी ब्रिटिश गव्हर्नर जनरलना पंजाबवर आक्रमण करण्याची विनंती केली. ती पंजाबच्या पराभवासाठी नव्हे, तर मुख्यत्वेकरून अनागोंदी खालसा सैन्याचे परभारे पारिपत्य करण्यासाठी होती. त्याला सरसेनापती तेजसिंग आणि वझीर लालसिंग यांनी गुप्तपणे पाठिंबा दर्शविला होता.

ब्रिटिशांनी आपली सैन्यशक्ती वाढविण्यास सुरुवात केली होती. फिरोझपूर येथे रणजितसिंग यांच्या काळातच ब्रिटिश छावणी वसविण्यात आली होती.  गव्हर्नर जनरल एल्गबर्ग आणि त्यानंतर आलेले हार्डिंग हे दोघेही युद्धास फारसे उत्सुक नव्हते. त्यासाठी आवश्यक असलेले सैन्य उपलब्ध नव्हतेच; पण त्यापेक्षाही पंजाब जिंकल्यावर त्याच्यावर ताबा ठेवण्यासाठी बरीच शिबंदी लागणार होती. परंतु दोन्ही बाजूंनी तणाव वाढत गेल्याने युद्धाला तोंड लागण्याची चिन्हे दिसू लागली. राणी जिंदन यांनी आपल्या सरदारांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिशांच्या मुलखावर स्वारी करण्याचा बेत आखला. त्याच वेळी ब्रिटिश गव्हर्नर जनरल हार्डिंग यांनी सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य फिरोझपूरजवळ आणून ठेवले.

युद्ध : नोव्हेंबर १८४५ मध्ये लुधियानातील ब्रिटिश एजंट मेजर ब्रॉडफूट यांनी सीमेवरील दोन खेड्यांचा ताबा घेतल्यावर युद्धाची ठिणगी उडाली. इंग्रज सैन्य आपल्यावर स्वारी करणार असा शीख सैन्याचा ग्रह झाल्याने ११ डिसेंबर १८४५ रोजी ३०-४० हजार संख्येच्या शीख सैन्याने १५० तोफांसह सतलज नदी ओलांडली आणि त्यांनी सतलजच्या दक्षिणेला मुडकी, फिरोझशाह, सोब्राओन आणि अलीवाल–फिलौर या चार ठिकाणी मोर्चेबंदी केली. परंतु संख्याबळात वरचढ असूनही शीख सैन्याने संरक्षणात्मक पवित्रा घेतला. फिरोझपूर छावणीवर हल्ला करण्याचा त्यांनी कोणताही प्रयत्न केला नाही. अर्थात, लाहोरमधून लालसिंग, तेजसिंग आणि गुलाबसिंग या तीन घरभेद्यांकडून ब्रिटिश सेनापतींना शीख सैन्याच्या हालचाली आणि उद्देशांबद्दल सातत्याने माहिती मिळत होती.

२ डिसेंबरला फिरोझपूरमधील ब्रिटिशांच्या सात हजार शिबंदीचे कमांडर मेजर जनरल जॉन लिटलर यांना शीख सैन्याच्या हालचालीची माहिती मिळू लागली. इतर कोणतेही ब्रिटिश सैन्य जवळपास नसल्याने आपली कोंडी होईल, या चिंतेने ग्रासलेल्या लिटलर यांनी अंबाल्यामधील ब्रिटिश सेनेचे प्रमुख जनरल सर ह्यू गॉघ यांच्याकडे कुमक पाठविण्याची विनंती केली. परंतु त्यांची विनंती गव्हर्नर जनरल हेन्री हार्डिंगपाशी पोहोचेपावेतो अमूल्य वेळ निघून गेला होता. १२ डिसेंबरला शीख सैन्य आपल्या दक्षिणेला पोहोचल्याचे कळल्यावर लिटलर यांनी तातडीने आपल्या सैन्याला मोर्चेबंदी करण्याचे आदेश दिले. त्यांच्याकडील ८ पायदळ पलटणींपैकी फक्त एकच (६२ वी क्वीन रेजिमेंट) ब्रिटिश सैनिकांची होती. बाकी सर्व हिंदुस्थानी सैनिक होते आणि ऐन वेळी ते शत्रूला जाऊन मिळतील, ही त्यांना सतत भीती वाटत  होती.

अशा प्रकारे एका बाजूला बेशिस्त आणि अनागोंदी शीख सैन्य, त्याला परभारे खच्ची करण्यासाठी गुप्त कारस्थाने रचणारे घरभेदी वझीर व सरसेनापती आणि दुसऱ्या बाजूस युद्धाला फारशी उत्सुक नसलेली पण तरीही परिस्थितीचा फायदा घेऊ पाहणारी ब्रिटिश इंडिया कंपनी यांच्यात डिसेंबर १८४५–जानेवारी १८४६ मध्ये पहिले इंग्रज-शीख युद्ध घडून आले.

त्या वेळी या परिसरात शीख सैन्य ४५-५० हजारांच्या आसपास होते. त्यांच्याकडे तीन–साडेतीनशे तोफा होत्या. यात शीख, पंजाबी, पख्तून आणि काश्मिरी सैनिकांच्या तुकड्या होत्या. १८३९ नंतर जरी हे सैन्य बेशिस्त आणि नियंत्रणहीन झाले होते, तरी रणजितसिंगांनी यूरोपीय प्रशिक्षकांद्वारा त्यांना सैनिकी शिक्षण दिले होते आणि त्यांचा तोफखानासुद्धा कसबी पाश्चात्त्य सेनाधिकाऱ्यांच्या तालमीत तयार झाला होता. मेजर ब्रॉडफूट यांनी सर ह्यू गॉघ यांना पाठविलेल्या वार्तेनुसार शिखांचे सैन्य प्रत्येकी आठ ते बारा हजार सैनिकांच्या सात तुकड्यांमध्ये वाटण्यात आलेले होते. एक तुकडी लाहोरमध्ये ठेवून उर्वरित सतलज सीमेवर धाडल्या होत्या.

दैवदुर्विलास असा की, जरी अधिकारविहीन राजमातेला बळजबरीने पाठिंबा दाखवावा लागला, तरी प्रधानमंत्री लालसिंग आणि सरसेनापती तेजसिंग हे दोघेही ब्रिटिशांना फितूर झाले होते. त्यामुळे त्यांचा पवित्रा संरक्षणात्मकच राहिला. फिरोझपूर छावणीत ब्रिटिशांची फक्त सहा-सात हजारांची शिबंदी असून, तसेच कोणतीही कुमक, त्यांच्यापसून दोन-अडीचशे किमी. दूर असूनही, शीख सैन्याने फिरोझपूरवर हल्ला चढवला नाही, यामागे निश्चितच लालसिंग व तेजसिंग या दुकलीचा हात होता. लालसिंग आणि तेजसिंग हे दोघेही त्यांच्या कह्याबाहेर गेलेल्या खालसा सैन्याचा ब्रिटिश सेनेकडून निर्णायक पराभव होण्याची वाट पाहत होते. त्यानंतर दोघांनाही सन्मानाची वागणूक आणि उच्चपदे मिळतील, याबाबत त्यांना खात्री होती. स्वतः आणि राजमाता हे दोघे ब्रिटिशांचे मित्र असल्याचे गुप्त पत्र पंतप्रधान लालसिंग यांनी त्याआधीच ब्रिटिशांकडे पोहोचविले होते.

ब्रिटिश सैन्याची रचना : ११ डिसेंबर १८४५ च्या पहाटे जनरल ह्यू गॉघ यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने अंबाला सोडले. पहिल्या पाच दिवसांत ११४ मैलांचे अंतर त्यांनी कापले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याच्या सवयी आणि गरजा मोघल सैन्याइतक्याच ऐशआरामी आणि अवास्तव होत्या. गॉघ यांच्या आठ-दहा हजारांच्या सैन्यासाठी चाळीस हजार बुणगे, बरोबर हत्ती, उंट, बैल, घोडे, तट्टे आणि गाड्यांचा ताफा त्यांच्यामागे चालत होता.

जनरल सर ह्यू गॉघ यांच्याबरोबर खुद्द भारताचे गव्हर्नर जनरल सर हेन्री हार्डिंगही होते. हार्डिंग हे वॉटर्लूचे युद्ध लढलेले होते. अधिकाराने वरिष्ठ असूनही युद्धादरम्यान गॉघ यांचे दुय्यम अधिकारी म्हणून काम करू देण्याची त्यांनी केलेली विनंती गॉघ यांनी आनंदाने मान्य केली होती. ऐन मोक्याच्या वेळी अंतिम निर्णयाचा अधिकार मात्र हार्डिंग्ज यांनी स्वतःकडे राखून ठेवला होता.

लुधियानामधील शिबंदी गॉघ यांच्या सैन्यात चरक येथे १७ डिसेंबरला सामील झाली. आता त्यांची संख्या अकरा-बारा हजारांच्या घरात पोहोचली. त्यात घोडदळाच्या पाच रेजिमेंट, घोड्यांनी ओढलेल्या तोफांच्या पाच तुकड्या, ४२ तोफांच्या पाच बॅटरी आणि तेरा इन्फन्ट्री बटालियन होत्या. त्यांपैकी ब्रिटिश पलटणी पाचच होत्या. गॉघनी या सैन्याची रचना मेजर जनरल थॅकवेल यांच्या हाताखाली एक कॅव्ह्लरी (घोडदळ) डिव्हिजन आणि मेजर जनरल स्मिथ, गिल्बर्ट आणि मॅककॅसकिल यांच्या हाताखाली प्रत्येकी एक इन्फन्ट्री डिव्हिजन अशा ४ तुकड्यांमध्ये केली होती.

लढाईची धुमश्चक्री : १८ डिसेंबरला पहाटे तिसरी लाइट ड्रॅगून रेजिमेंट तिथून वीस मैलांवर असलेल्या मुडकी येथील शत्रूच्या दिशेने मार्गस्थ झाली. राजा लालसिंग हे दोन हजार पायदळ, बावीस तोफा आणि ८-१० हजार घोडदळानिशी चालून येत होते. ताबडतोब तोफखान्याला मारा करण्याचे आदेश देण्यात आले. त्याच वेळी पाचव्या लाइट कॅव्ह्लरीला ड्रॅगून पलटणीची मदत करण्यास पाठविण्यात आले. त्याचबरोबर आणखी दोन घोडदळाच्या पलटणी पोहोचल्यानंतर या चारही कॅव्ह्लरी रेजिमेंटनी शीख घोडदळावर हल्ला चढवला. आता पायदळ हल्ल्यासाठी सरसावले. जनरल स्मिथ यांची डिव्हिजन उजव्या बाजूस आणि जनरल गिल्बर्ट आणि मॅककॅसकिल यांच्या डिव्हिजन डाव्या बाजूस रांगेत उभ्या होत्या. सूर्यास्तापूर्वी शीख सैन्यावर हल्लाबोल झाला. दोन्हीकडून तोफांचा भडिमार चालू होता. परंतु इंग्रजांच्या पाचपट पायदळापुढे शिखांना माघार घ्यावी लागली आणि ते फिरोझशाहच्या ठाण्याकडे पळाले. त्या पाच-सहा तासांच्या कालावधीत इंग्रजांचे २१५ सैनिक ठार, तर ६५७ सैनिक जखमी झाले होते. मृतांमध्ये मेजर जनरल मॅककॅसकिल, ब्रिगेडियर बोल्टन व इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. शिखांच्या तोफखान्याने वर्मी घाव घातले होते, तरीही मुडकीच्या पहिल्या चकमकीत अकाली सैन्याची पिछेहाट झाली होती. ब्रिटिश सैन्याचे पुढील लक्ष्य होते–फिरोझशाह. शीख सैन्य दोन भागांत वाटले गेले होते. तेजसिंगच्या नेतृत्वाखाली ३०,०००ची सेना फिरोझपूरमधील सर जॉन लिटलरच्या सेनेवर नजर ठेवून होती आणि उरलेली वीस हजारांची सेना शंभर तोफांसह राजा लालसिंगच्या हाताखाली फिरोझशाहच्या ठाण्यात मोर्चेबंद होती. जनरल गॉघना दुसऱ्या दिवशीच फिरोझशाहवर हल्ला चढवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली होती. परंतु, मुडकीमध्ये शिखांच्या बहादुरीने प्रभावित झालेल्या गव्हर्नर जनरल हार्डिंगने ऐनवेळी आपला अधिकार गाजवला आणि फिरोजपूरमधील जनरल लिटलर यांची तुकडी जोपर्यंत सुरक्षितपणे जनरल गॉघ यांच्या सैन्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत फिरोजशाहवर हल्ला चढवण्यास त्यांनी जनरल गॉघ यांना मज्जाव केला. गॉघना हे आदेश मानण्याशिवाय पर्याय नव्हता. लिटलर यांची तुकडी पोहोचताच हल्ला चढवायला अधीर झालेल्या गॉघनी त्या दुपारीच हल्ला सुरू केला. २१-२२ डिसेंबरला दोन्ही सैन्यांत घनघोर लढाई झाली. शिखांच्या तोफांनी ब्रिटिश गोटात धुळधाण माजवली. पायदळ जिवाच्या कराराने लढले. घोडदळ मात्र निष्प्रभ ठरले. लालसिंगने त्यांना रणांगणापासून दूर ठेवले होते. पराभवाची चिन्हे दिसत असतानाच तेजसिंग आपल्या सैन्यासह तिथे पोहोचला. वास्तविक गॉघ यांचे सैन्य थकले होते. त्या वेळी तेजसिंगने हल्ला चढवला असता, तर पारडे फिरले असते.  परंतु ब्रिटिशांच्या तुकड्या आपल्या दोन्ही बाजूंनी जाऊन आपली कोंडी करत आहेत, अशी बतावणी करत तेजसिंगने माघार घेतली.

मुडकी आणि फिरोझशाह या दोन्ही ठिकाणी पराभव झाल्यावर लालसिंग आणि तेजसिंग यांनी आपल्या सेना उत्तरेस मागे नेऊन आणि नदी पुनश्च ओलांडून पूर्वेला सतलजवरील सोब्राओन येथे मोर्चेबांधणी केली. तेजसिंग यांनी लुधियानाच्या ब्रिटिश छावणीवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांची रसद तोडण्यासाठी सरदार रणजोधसिंग यांच्या नेतृत्वाखाली २०,००० सैनिकांची तुकडी पाठविली. गॉघनी मेजर जनरल स्मिथ यांच्या हाताखाली १२,०००ची तुकडी लुधियानाला धाडली. बधोवालला पोहोचल्यावर स्मिथ यांना कळले की, रणजोधसिंग हे अलिवाल येथे आणखी कुमकीची वाट पाहत आहेत. स्मिथ तिथे पोहोचल्यावर २८ जानेवारी १८४६ रोजी प्रथम घोडदळात आणि नंतर पायदळामध्ये तुंबळ लढाई झाली. शिखांनी खंबीर लढा देऊनही त्यांचा पराभव झाला. ब्रिटिशांचे ५८९, तर अकाली सैन्याचे ३,००० सैनिक या चकमकीत ठार झाले.

शीख सैन्याची इच्छाशक्ती अजूनही शाबूत होती. आपण गोऱ्यांना अजूनही करारी टक्कर देऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. पंचायतींच्या आदेशावरून सतलजवर सोब्राओन येथे एक बोटींचा पूल तयार केला आणि शीख सैन्याने सोब्राओनमध्ये संरक्षणफळी उभी केली. नदीच्या वळणावर असलेली ही जागा कमालीच्या लष्करी चातुर्याने निवडण्यात आली होती. जनरल सर हॅरी स्मिथ यांनी ‘युद्धाच्या इतिहासात अतुलनीय’ अशी तिची वाखाणणी केली होती.  स्मिथ यांची डिव्हिजन अलीवालमधून परतल्यावर सोब्राओनच्या शिखांच्या अखेरच्या पडावावर (फळीवर) १० फेब्रुवारी १८४६ रोजी जनरल ह्यू गॉघनी सर्व शक्तिनीशी हल्ला चढविला. तेजसिंग १० फेब्रुवारीलाच पळून गेला.  शीख ही शेवटची लढाई जिवाच्या कराराने लढले. ब्रिटिशांच्या तोफगोळ्यांमुळे (किंवा कदाचित तेजसिंगच्या आज्ञेवरून) सतलजवरील पूल उद्ध्वस्त झाला. शीख सैन्याची पूर्ण कोंडी झाली, तरीही त्यांच्यापैकी एकही शरण गेला नाही. ब्रिटिशांनी कोणतीही दयामाया न दाखवता त्यांची कत्तल केली. हा अंतिम पराभव मात्र निर्णायक होता. तेजसिंग आणि लालसिंग यांचा कुटिल हेतू अखेर साध्य झाला.

निष्कर्ष : तुलनेने छोट्या ब्रिटिश सेनेने शिखांचा निर्णायक पराभव केला. अंतर्गत फितुरी आणि  बेशिस्त व नियंत्रणहीन सैन्य याला जबाबदार होते. युद्धपश्चात झालेल्या कराराकरवी पंजाबचे राजकारण कंपनीने पूर्णतया हातात घेतले. अल्पवयी महाराज दलीपसिंग यांना गादीवर राहू देण्यात आले. ब्रिटिशांना कोहिनूर हिरा आणि काश्मीर देण्यात आले. युद्धात केलेल्या ‘अमूल्य’ मदतीबद्दल ब्रिटिश इंडिया कंपनीने राजा गुलाबसिंगांना काश्मीर ७५ लाख रुपये घेऊन आंदण दिले. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात पंजाबच्या सक्रिय सहकार्याच्या अभावाला हे युद्ध प्रामुख्याने कारणीभूत ठरले.

संदर्भ :

समीक्षक – प्रमोदन मराठे