पार्श्वभूमी : ३ जून १९४७ रोजी ब्रिटिश सरकारने ‘भारतीय स्वातंत्र्य कायद्या’ला संमती देऊन ब्रिटिश इंडियाची फाळणी भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांत करण्याची घोषणा केली. या कायद्यानुसार ब्रिटिश इंडियातील मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानात आणि उर्वरित प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात येणार होते. त्या वेळी अस्तित्वात असलेल्या ५६५ संस्थानांना मात्र हा ‘द्विराष्ट्र नियम’ लागू नव्हता. भारतात जायचे की, पाकिस्तानात सामील व्हायचे वा स्वतंत्र राहायचे हे पर्याय सर्व संस्थानिकांना देण्यात आले होते. ५ जुलै १९४७ रोजी अंतरिम सरकारच्या गृहमंत्रालयात संस्थानांच्या विलीनीकरणाची बाब हाताळण्यासाठी एक वेगळे खाते निर्माण करण्यात आले. वेळ फार थोडा होता आणि संस्थानिकांचे मन वळविणे आवश्यक होते; कारण जर एव्हढ्या मोठ्या प्रमाणांत संस्थाने स्वतंत्र राहिली असती, तर उर्वरित भारताचे सामरिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थापन जिकीरीचे झाले असते. उरलेल्या चाळीस दिवसांत वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांनी ५६३ संस्थाने भारतात विलीन करून घेतली. हैदराबाद संस्थान अंतर्विभागात असल्याने पोलीस कारवाईद्वारा विलीन करून घेण्यात आले. नवनिर्मित देशांच्या सीमेवर असलेल्या काश्मीरचे नरेश राजा हरिसिंग यांनी मात्र दोन्हींपैकी कोणत्याच देशात विलीन होण्याची पद्धतशिरपणे टाळाटाळ केली. काश्मीरचे लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांनाही निरंकुश सत्ता हवी होती. भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळे ‘जैसे थे करार’ (Standstill Agreement) पाठवून राजा हरिसिंग स्वतंत्र काश्मीरची स्वप्ने रंगवीत राहिले. फाळणीच्या धगीत होरपळणाऱ्या भारताच्या नेत्यांना त्या ‘जैसे थे करारा’बद्दल विचार करण्यास वेळच नव्हता. पाकिस्तानच्या महंमद अली जिना यांनी मात्र त्यावर ताबडतोब सही केली. स्वातंत्र्यपूर्व जम्मू-काश्मीरचे दळणवळणाचे प्रमुख मार्ग रावळपिंडी-मार्गे-ॲबटाबाद ते डोमेल-श्रीनगर रस्ता किंवा जम्मू-सियालकोट रेल्वेकरवी होते. हे सर्व पाकिस्तानात जात होते. जम्मूपासून बनिहाल खिंडीमार्गे श्रीनगरला जाणाऱ्या रस्त्याचा फारसा वापर नव्हता. जरी ‘द्विराष्ट्र नियम’ जम्मू-काश्मीर संस्थानाला लागू नसला, तरी काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम वस्ती असल्याने जम्मू-काश्मीर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात सामील करून घेण्याचा जिनांनी घाट घातला होता.
‘ऑपरेशन गुलमर्ग’ : काश्मीर बळकावण्याचे कारस्थान : भारताच्या वा काश्मीर नरेशांच्या नकळत काश्मीरवर हल्ला चढवून श्रीनगर काबीज करण्याची जबाबदारी पाकिस्तानी सैन्याच्या मेजर जनरल अकबर खान या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली होती. त्या वेळी जम्मू-काश्मीर राज्याच्या तुटपुंज्या राज्यसेनेच्या (State Force) फक्त चार बटालियन राज्यभर विखुरल्या होत्या. त्यातील एकच डोमेल ते श्रीनगर रस्त्यावर तैनात होती. अचानक धडक मारून आणि त्याबरोबरच त्या पलटणीत फितुरीमार्गे फूट पाडली तर एका दिवसात श्रीनगर काबीज करणे अवघड जाणार नाही, अशी अकबर खानाची अटकळ होती. या मोहिमेची योजना १३ ऑगस्टपासूनच रावळपिंडीमध्ये शिजत होती. पाकिस्तानी सैन्याचा उघडपणे वापर करण्याची मुभा नसल्याने अकबर खानाने पैशाचे आमिष दाखवून वायव्य सरहद्दीवरील लूटमार करणाऱ्या पाच हजार टोळीवाल्यांची भरती केली होती. त्यांना शस्त्रे आणि दारूगोळा देऊन तुकड्यांमध्ये वाटण्यात आले होते. त्या तुकड्यांचे नेतृत्व टोळीवाल्यांच्या वेषातच वावरणाऱ्या पाकिस्तानी सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले होते. आक्रमणाच्या वाटेत तैनात असलेल्या जम्मू-काश्मीर राज्याच्या पलटणीतील काही समधर्मीय सैनिकांना फितविण्यात आले होते. ही पाताळयंत्री योजना तडीस जाण्यात अकबर खानाला काहीच अडसर दिसत नव्हता.
२१ ऑक्टोबर १९४७ रोजी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर ही टोळधाड मरी-डोमेलमार्गे काश्मीरमध्ये शिरली. योजनेनुसार जम्मू-काश्मीर पलटणीतील फितूर झालेल्या जवानांनी डोग्रा जवानांचे शिरकाण सुरू केल्यावर एकच कोलाहल माजला आणि पलटणीचा मोर्चा काबीज करण्यात हल्लेखोरांना काहीच अडसर आला नाही. उजाडेपर्यंत टोळीवाले उरीपर्यंत पोचले होते. परंतु त्या दरम्यान या बंडाची बातमी श्रीनगरमध्ये मिळाल्यावर जम्मू-काश्मीर राज्यसेनेचे ब्रिगेडियर राजिंदरसिंग काही सैन्यांसह तेथे तातडीने पोचले आणि त्यांनी स्फोटके वापरून उरी नदीवरील पूल उध्वस्त केला. त्यामुळे टोळीवाल्यांच्या गाड्यांचे तांडे पुढे जाऊ शकले नाहीत. उरी नदीवर पूल बांधण्यात एक दिवस गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही या टोळधाडीला राजिंदरसिंग थांबवू शकले नाहीत आणि त्यांना वीरमरण आले. मरणोपरांत त्यांना स्वतंत्र भारताच्या प्रथम महावीरचक्र या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टोळीवाल्यांची आगेकूच चालू राहिली.
बारामुल्लात पोहचल्यावर तिथली सुबत्ता पाहून हल्लेखोरांच्या पाशवी वृत्तीने उसळी घेतली आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना न जुमानता त्यांनी लुटालूट, अत्याचार आणि बलात्काराचा कहर केला. पुढील दोन दिवस हे निर्मम सत्र चालू राहिले. या अराजकाच्या बातम्या ऐकून मात्र राजा हरिसिंग आणि शेख अब्दुल्लांचे धाबे दणाणले. अब्दुल्लांच्या सल्ल्याने २६ ऑक्टोबर रोजी राजा हरिसिंग यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य कायद्या’नुसार संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्य भारतात विलीन करण्याच्या करारनाम्यावर सही केली. त्या पश्चात जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आणि भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये पाठवून पाकिस्तानी आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा मार्ग खुला झाला.
२७ ऑक्टोबरला भारतीय वायू सेनेच्या आणि खाजगी कंपन्यांच्या डीसी‒३ डकोटा विमानांतून श्रीनगर विमानतळावर भारतीय लष्कराच्या पलटणी उतरू लागल्या. भल्या पहाटे लेफ्टनंट कर्नल रणजीत राय यांच्या नेतृत्वाखालील १ सिख ही पलटण उतरली आणि सर्वप्रथम श्रीनगर विमानतळाचा त्यांनी ताबा घेतला. तेथे एक कंपनी ठेऊन त्यांनी ताबडतोब बारामुल्लाकडे कूच केले आणि परिसरातील टेकड्यांवर मोर्चेबंदी उभी करण्याचे काम सुरू केले. परंतु तेथे त्या वेळेपावेतो आक्रमकांनी पाय रोवले असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली, परंतु थोडे मागे जाऊन पट्टण नावाच्या खेड्यापाशी डोंगरसरीवर त्यांनी मोर्चेबंदी केली. या हालचालीत कर्नल राय धारातीर्थी पडले. त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर जरी टोळीवाल्यांच्या काही तुकड्या श्रीनगरच्या सान्निध्यात पोचल्या होत्या, तरी टोळीवाल्यांचे श्रीनगरकडे येण्याचे मुख्य मार्ग बंद झाले आणि श्रीनगरवरील संकट टळले. अशा तऱ्हेने अकबर खानाच्या ‘ऑपरेशन गुलमर्ग’चा कणा मोडला होता.
भारतीय लष्कराच्या कारवाया : ब्रिगेडियर एल. पी. सेन यांच्या हाताखालील १६१ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या इतर तुकड्या; ४ कुमाऊ, १ पंजाब, १ कुमाऊ या पायदळाच्या उरलेल्या पलटणी, तोफखान्याची १३ फील्ड रेजिमेंट आणि ७ कॅवर्ली रेजिमेंटच्या आर्मर्ड कार्स पुढील काही दिवसांत जमीन व हवाई मार्गे काश्मीरमध्ये पोहचल्या. ३ नोव्हेंबरला विमानतळाजवळील बदगामचा ताबा घेण्यास पाठवलेल्या ४ कुमाऊच्या एका कंपनीचे कमांडर मेजर सोमनाथ शर्मा यांनी घुसखोरांशी टक्कर देऊन त्यांचा हल्ला हाणून पाडला. त्या दरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च शौर्यसन्मानाचे सोमनाथ शर्मा हे पहिले मानकरी आहेत. ४-५ नोव्हेंबरला श्रीनगरपासून ७-८ किमी. दूर असलेल्या शेलाटांग येथे १६१ इन्फन्ट्री ब्रिगेडने एक कल्पक व्यूहरचना करून टोळीवाल्यांना सापळ्यात पकडले आणि त्यांचा धुव्वा उडवला. त्या पश्चात भारतीय लष्कराने घुसखोरांचा उरीपर्यंत पाठलाग केला आणि उरी जिंकून घेतले. जर ती धडक त्यापुढेही कायम ठेवली असती, तर काही दिवसांतच डोमेलपर्यंत ते पोहचून संपूर्ण प्रदेश काबीज करू शकले असते. परंतु उरीच्या परिसरातच संरक्षण फळी उभारून पुढील कारवायांना विराम देण्याचे आदेश सरकारने दिले. ऑक्टोबर १९४७ मध्ये तेथे तैनात असलेल्या गिलगिट स्काउट्स या तुकडीचे कमांडर मेजर ब्राऊन यांनी बंड करून पाकिस्तानी ध्वजारोहण केले. त्यामुळे गिलगिट कायमचे पाकिस्तानच्या हातात गेले.
२० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तानने जम्मू विभागातील सरहद्दीवरील पूंछ, कोटली, मिरपूर, झंगड, नौशेरा, भिम्बर आणि राजौरी या शहरांना वेढा घातला. १४ नोव्हेंबर १९४७ रोजी मेजर जनरल कलवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या जम्मू-काश्मीर डिव्हिजनची स्थापना करण्यात आली आणि १६१ इन्फन्ट्री ब्रिगेड, २६८ इन्फन्ट्री ब्रिगेड व ५० पॅराशूट ब्रिगेड त्यांच्याखाली देण्यात आली. कलवंत सिंग यांनी उरीच्या बाजूने हाजीपीरमार्गे उत्तरेस १६१ ब्रिगेडने आणि दक्षिणेकडून नौशेरा-कोटलीमार्गे ५० ब्रिगेडने चालून जाऊन पूंछची कोंडी करण्याची कारवाई १६ नोव्हेंबरला सुरू केली. १६१ ब्रिगेडच्या एका बटालियनने पूंछचा ताबा घेतला. ५० ब्रिगेड अखनूर व नौशेराचा ताबा घेऊन झंगडला पोहचली, परंतु प्रतिहल्ला चढवून २४ डिसेंबरला पाकिस्तानने ते जिंकून घेतले. २ फेब्रुवारी १९४८ रोजी पाकिस्तानने नौशेरावर हल्ला चढवला, परंतु भारतीय लष्कराने तो परतवून लावला. त्या लढाईत नाईक जदुनाथ सिंग यांना मरणोपरांत परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले. १८ मार्चला भारतीय तुकड्यांनी झंगड पुन्हा जिंकून घेतले. ८ एप्रिलला भारतीय सैन्याने राजौरीवर हल्ला चढवला आणि १३ एप्रिलला ते काबीज केले. या लढाईत बॉम्बे सॅपर्सचे लेफ्टनंट राघोबा रामजी राणे यांनी भूसुरुंग निकामी करण्यात दाखविलेल्या धाडसासाठी त्यांना परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. अशाप्रकारे एप्रिल १९४८ अखेरी राजौरी, झंगड, नौशेरा, पूंछ वगैरे महत्त्वाची ठाणी भारतीय सैन्याने परत जिंकून घेतली होती. मिरपूर, कोटली ही ठाणी मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिली.
गिलगिट हातात आल्यावर पाकिस्तानी सैन्याने स्कार्डूमधील किल्ल्याला वेढा घातला. ६ जम्मू-काश्मीर रायफल्सचे कर्नल शेरजंग थापा यांनी तो किल्ला सहा महिने लढवला. अखेरीस १४ ऑगस्ट १९४८ रोजी शत्रूने तो किल्ला सर केला. त्यानंतर लेह्वर आक्रमण करण्याचा पाकिस्तानी सैन्याने घाट घातला. एव्हाना काश्मीर डिव्हिजनचे नेतृत्व मेजर जनरल थिमय्या यांच्याकडे सोपविण्यात आले होते. लेहमध्ये तातडीने सैन्य पोहचवणे अत्यावश्यक होते. परंतु ‘झोजी ला’ खिंड शत्रूच्या ताब्यात असल्याने ते केवळ विमानमार्गेच जाऊ शकत होते. लेहला एक तकलुपी विमानपट्टी अस्तित्वात होती. २४ मे १९४८ रोजी एअर कमोडोर मेहरसिंग यांनी स्वतः लेह्वर प्रथमच विमान उतरवले. त्यांच्याबरोबर थिमय्या होते. त्यानंतर लागलीच लेहला दोन पायदळाच्या तुकड्या विमानाने उतरविण्यात आल्या आणि लेह्वरचे संकट टळले. त्यानंतर ‘झोजी ला’ खिंड काबीज करण्याची कारवाई १३ सप्टेंबर १९४८ रोजी सुरू झाली. शत्रूने कडवा विरोध केला. शेवटी १ नोव्हेंबर १९४८ रोजी अत्यंत घनघोर लढ्यानंतर ‘झोजी ला’ खिंड भारतीय लष्कराच्या हातात पडली आणि श्रीनगर-लेह मार्ग पूर्णतया भारताच्या नियंत्रणाखाली आला.
युद्धसमाप्ती : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर प्रश्न डिसेंबर १९४७ मध्ये राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीसाठी नेला. त्यावर दीर्घ चर्चेपश्चात राष्ट्रसंघाने ठराव संमत केला. भारत आणि पाकिस्तानने त्याला अनुमती दिली. त्या ठरावाची तीन कलमे होती. पहिले, १ जानेवारी १९४९ रोजी भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांत युद्धविराम होईल; दुसरे, पाकिस्तानी सैन्य १५ ऑगस्ट १९४७ पूर्व जम्मू आणि काश्मीर प्रदेशातून पूर्ण माघार घेऊन परत जाईल, तर सुव्यवस्थेसाठी आवश्यक तेवढेच भारतीय सैन्य तेथे राहील आणि तिसरे, जम्मू-काश्मीरमध्ये सार्वमत घेऊन त्यानुसार त्याची वाटणी केली जाईल. भारत आणि पाकिस्तानी सैन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने १८ जुलै ते २४ जुलै १९४९ दरम्यान युद्धबंदी रेषेची आखणी करण्यात आली आणि दोन्ही सैन्य त्यामागे नेण्यात आली. दुर्दैवाने, पाकिस्तानी सैन्य त्यांनी बळकावलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रदेशातून परत गेले नाही. एवढेच नव्हे, तर आणखी भरमसाट सैन्याच्या तुकड्या पाक-व्याप्त काश्मीरमध्ये आणण्यात आल्या. पाकिस्तान दुसऱ्या कलमाचे पालन करत नाही तोपर्यंत सार्वमत घेण्यास भारताने नकार दिला. ही युद्धबंदी रेषा थोड्याफार फरकाने अजूनही काश्मीरच्या दोन भागांदरम्यान अस्तित्वात आहे.
संदर्भ :
- Krishna Rao, K. V. Prepare or Perish : A Study of National Security, New Delhi, 1991.
- Sen, L. P. Slender was the Thread : Kashmir Confrontation 1947-48, New Delhi, 1994.
- पित्रे, शशिकांत, डोमेल ते कारगिल, पुणे, २०००.
- मोरे, शेषराव, काश्मीर : एक शापित नंदनवन, पुणे, २०१२.
समीक्षक – प्रमोदन मराठे
#भारत-पाकिस्तान युद्ध, १९६५ #भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१