ड्रीश, हान्स ॲडॉल्फ एडूआर्ट : (२८ ऑक्टोबर १८६७—१६ एप्रिल १९४१). जर्मन तत्त्वज्ञ व जीववैज्ञानिक. प्राणतत्त्ववादाचा आधुनिक काळातील पुरस्कर्ता. जर्मनीत बाट क्रॉइट्सनाख येथे जन्म. हँबर्ग, फ्रायबर्ग, म्यूनिक, जेना इ. विद्यापीठांत जीवविज्ञान, भौतिक व रसायनशास्त्र ह्या विषयांचे त्यांनी अध्ययन केले. येना विद्यापीठात ई. एच. हेकेल (१८३४–१९१६) यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रूणविज्ञानाचे संशोधन करून त्यांनी डॉक्टरेट मिळविली. या विषयातील प्रदीर्घ व सखोल संशोधन–अध्ययनानंतर त्यांना हेकेल यांच्या सिद्धांतातील यांत्रिक उपपत्तीचा अपुरेपणा जाणवला आणि ते प्राणतत्त्ववादाकडे वळले.
नेपल्स येथील समुद्री जीववैज्ञानिक केंद्रावर त्यांनी १८९१–१९०० ह्या काळात आपले संशोधन चालू ठेवले. सातत्याने प्रयोग करीत राहून त्यांनी आपल्या विचारांना निश्चित दिशा दिली. याच काळात कांट, शोपेनहौअर, देकार्त, लॉक, ह्यूम प्रभृतींच्या तत्त्वज्ञानांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्यावर कांटच्या तत्त्वज्ञानाचा विशेष प्रभाव होता. तत्त्वमीमांसा व तर्कशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. १८९३ मध्ये त्यांचा Die Biologie als Selbstandige Grundwissenschaft (इं.शी. बायोलॉजी ॲज ॲन इंडिपेंडंट बेसिक सायन्स) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला; तथापि त्यांनी अद्याप प्राणतत्त्ववादाचा संपूर्णपणे स्वीकार व पुरस्कार केला नव्हता. यानंतर मात्र त्यांनी सततच्या प्रायोगिक अवलोकनानंतर १८९९ मध्ये आपला Die Lokalisation Morphogenetischer Vorgange : Ein Beweis Vitalistischen Geschehens (इं.शी. द लोकलायझेशन ऑफ मॉर्फोजेनेटिक प्रोसेसेस, अ प्रुफ ऑफ व्हायटॅलिस्टिक डिव्हलपमेंट्स) हा ग्रंथ प्रसिद्ध करून प्राणतत्त्ववादाची अपरिहार्यता प्रतिपादन केली आणि त्याचा प्रभावी पुरस्कारही केला. १९०८ नंतर मात्र ते जीवविज्ञानाकडून संपूर्णपणे तत्त्वज्ञानाकडे वळले. १९१२ मध्ये त्यांचा Ordnungslehre (इं.शी. थिअरी ऑफ ऑर्डर) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. १९१२ पासून ते हायड्लबर्ग येथे, १९१९ पासून कोलोन येथे आणि १९२१ पासून लाइपसिक येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. चीन तसेच अमेरिकेतही व्याख्यानांसाठी त्यांनी दौरा केला. राष्ट्रवाद ही मानवतेच्या मार्गातील धोंड आहे, ह्या त्यांच्या मतामुळे त्यांनी नाझी सरकारची गैरमर्जी ओढवून घेतली आणि त्यामुळे १९३५ मध्ये त्यांना प्राध्यापकपद सोडणे भाग पडले. शेवटीशेवटी ते तत्त्वज्ञानाकडून मानसशास्त्राच्या, विशेषतः अतींद्रिय मानसशास्त्राच्या, अभ्यासाकडे वळले.
जीवनाचा उलगडा करायचा तर विश्वात ज्याप्रमाणे यांत्रिक कार्यकारणभाव आहे, त्याप्रमाणे अर्थपूर्ण अशा समष्टी निर्माण करणारा कार्यकारणभावही आहे हे मानावे लागते, असे ड्रीश यांचे मत होते. मानसिक आणि सांस्कृतिक व्यवहारात अशा समष्टिकारक कार्यकारणभावाचे प्राबल्य असते. माणसाचा आत्मा म्हणजे त्याच्या मानसिक व्यवहारात आढळून येणाऱ्या व्यवस्थेचा उलगडा करण्यासाठी स्वीकारलेले गृहीतक होय; पण व्यक्तीसुद्धा अधिक समावेश समष्टीचा भाग असते. स्वप्नांत तसेच अनेक असाधारण अनुभवांत, व्यक्तीचे मन हे अधिक विशाल आणि व्यक्तीच्या जाणिवेला एरव्ही अप्राप्य असलेल्या अशा मनाचा भाग असते, ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो. कर्तव्याची आपली जाणीवही व्यक्तीपलीकडल्या, पण व्यक्तीला समजावून घेणाऱ्या समष्टीवर आधारलेली असते. यांत्रिक कार्यकारणभाव व समष्टिकारक कार्यकारणभाव असे द्वैत विश्वाच्या व्यापारात आपल्याला आढळून येत असल्यामुळे विश्वाच्या अंतिम कारणातही असे द्वैत असले पाहिजे, असे ड्रिश यांचे मत होते. हे द्वैत ईश्वराच्या प्रकृतीमध्येच असेल किंवा ईश्वर आणि त्याच्याहून भिन्न असे तत्त्व अशी विश्वाची दोन कारणे असतील; पण याविषयी ठाम निर्णय मात्र ड्रीश घेऊ शकले नाहीत.
जीवविज्ञान, तत्त्वज्ञान आणि अतींद्रिय मानसशास्त्र असा त्यांचा वैचारिक प्रवास झाला. शेवटपर्यंत त्यांचे अध्ययन व लेखन चालू होते. त्यांचे सर्व लेखन जर्मन भाषेत असले, तरी त्यांतील काही महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भांषांतरेही झाली आहेत. त्यांतील सायन्स अँड फिलॉसॉफी ऑफ द ऑर्गनिझम (१९०८), जस्टिफिकेशन ऑफ व्हायटॅलिझम (१९१२), हिस्टरी अँड थिअरी ऑफ व्हायटॅलिझम (१९१४), प्रॉब्लेम ऑफ इंडिव्हिज्युॲलिटी (१९१४), बायोलॉजिकल सेटिंग ऑफ फिजिकल फिनोमिना (१९२४), क्रायसिस इन सायकॉलॉजी (१९२५), पॉसिबिलिटी ऑफ मेटॅफिजिक्स (१९२६), माइंड अँड बॉडी (१९२७), मॅन अँड द युनिव्हर्स (१९२९), एथिकल प्रिन्सिपल्स इन थिअरी अँड प्रॅक्टिस (१९३०), सायकिकल रिसर्च (१९३३) इ. उल्लेखनीय होत.
लाइपसिक येथे ते निधन पावले.
संदर्भ :
- https://embryo.asu.edu/pages/hans-adolf-eduard-driesch-1867-1941
- https://biography.yourdictionary.com/hans-adolf-eduard-driesch
- https://www.giffordlectures.org/lecturers/hans-adolf-eduard-driesch
- https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095731257