डिल्टाय, व्हिल्हेल्म : (१९ नोव्हेंबर १८३३—१ ऑक्टोबर १९११). जर्मन तत्त्वज्ञ. व्हीस्बाडेनजवळील बीब्रिख येथे जन्म. त्याचे वडील कॅल्व्हिन पंथाचे उपदेशक (Priest) होते. व्हिल्हेल्म डिल्टाय याचे आयुष्य सरळधोपट होते. प्राथमिक शिक्षणानंतर तो धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी हायड्लबर्ग येथे गेला. तेथे वर्षभर राहून तो बर्लिनला परतला. इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास करून त्याने १८६४ मध्ये डॉक्टरेट मिळविली. बाझेल, कील व ब्रेस्लौ (सध्याचे व्हरोट्स्लाफ) येथील विद्यापीठांत अध्यापक म्हणून काम केल्यानंतर १८८२ मध्ये त्याची बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०५ मध्ये तो निवृत्त झाला.

माणूस पायाभूत मानून त्याने इतिहासाचा केलेला सखोल अभ्यास व लेखन ही त्याची तत्त्वज्ञानाला लाभलेली देणगी होय. जर्मनीतील प्रबोधनाची व धर्मसुधारणेची चळवळ तसेच चिद्वादाचा झालेला तेथील विकास ह्यांबाबतची त्याची मीमांसा अधिकारपूर्ण समजली जाते. कांट, हेगेल तसेच ब्रिटिश अनुभववादी तत्त्वज्ञ यांचा त्याच्यावर प्रभाव जाणवतो. माणसाच्या जीवनातील वैविध्याचे त्याला आकर्षण होते. साहित्यसमीक्षेत त्याने मानसशास्त्रीय चिकित्सेला स्थान दिले. त्याच्या मते माणूस आणि इतर प्राणी यांच्यात फरक हा आहे की, माणूस पाहतो, शोधतो आणि मिळालेल्या अनुभवांची संगती लावतो. व्यक्तीव्यक्तींच्या अनुभवांमध्ये फरक असतो. समाज, धर्म, कायदे, विज्ञान ह्या साऱ्यांचाच व्यक्तींच्या जीवनावर परिणाम होतो. तिचे जीवन अधिक गुंतागुंतीचे होते. स्वतःच्या अनुभवाचे चिंतन केल्यामुळे माणसांना इतरांच्या अंतरंगात प्रवेश करता येतो; इतरांच्या अनुभवांचे आंतरिक ज्ञान प्राप्त करून घेता येते. जीवन हाच तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय असावा, असा डिल्टायचा ठाम आग्रह होता. तो कट्टर अनुभववादी होता आणि म्हणूनच त्याच्या मते इतिहासाकडे पाहताना विशिष्ट काळातील विशिष्ट व्यक्तींच्या अनुभवांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. आजच्या मापांनी त्यांचे मूल्य ठरविणे चुकीचे असते. त्याचा अनुभववाद व्यक्तिगत समस्यांपुरता मर्यादित नव्हता. जीवनाचे एक व्यापक तत्त्वज्ञान त्याला रचायचे होते. जीवन म्हणजे परस्परांशी संबंध नसलेल्या घटनांची मालिका नसून त्यामागे काही सूत्र आहे, अशी त्याची श्रद्धा होती. इतिहासाची चिकित्सा करून विविध कालखंडात व्यक्त झालेल्या अशा सूत्रांची मांडणी करणे, हा त्याच्या इतिहासविषयक तत्त्वज्ञानाचा पाया होता.

इतिहासाच्या वैविध्याचा शोध घेताना डिल्टायने केलेल्या नोंदी एवढ्या अफाट होत्या की, त्यांवर शेवटचा हात फिरवणे, त्यांची संगतवार मांडणी करणे त्याला जमलेच नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी त्याचे लेखन संपादित करून प्रसिद्ध केले. इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र ह्यांवरील त्याचे विचार दूरगामी परिणाम करणारे आहेत. मॅक्स वेबर (१८६४–१९२०) व इतर आधुनिक समाजशास्त्रज्ञांनी त्याच्या विचारांचा उपयोग प्रत्यक्षार्थवाद आणि वर्तनवाद यांच्या विरुद्ध आपली बाजू मांडण्यासाठी केला.

डिल्टायचे लेखन जर्मन भाषेत असून त्याच्या काही ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झालेली आहेत. त्याचे मूळग्रंथ Gesammelte Schriften (१९२३–७२) नावाने १६ खंडांत संपादून प्रसिद्ध झाले आहेत. द एसेन्स ऑफ फिलॉसॉफी (१९५४), मीनिंग इन हिस्टरी : डिल्टायज थॉट ऑन हिस्टरी अँड सोसायटी (१९६१) ही त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे होत.

सेइस येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Hodges, H. A. The Philosophy of Wilhelm Dilthey,  London, 1952.
  • Hodges, H. A. Wilhelm Dilthey : An Introduction, London, 1944.
  • https://plato.stanford.edu/entries/dilthey/
  • https://philpapers.org/browse/wilhelm-dilthey