महाराष्ट्रातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यापासून आग्नेयेला सु. २१ किमी. अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्वज्ञ भास्कर देवतारे यांनी पूर्णा खोऱ्यात केलेल्या गवेषणातून या महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय स्थळाचा शोध लागला (२०००-२००१).

सकृद्दर्शनी येथे मोठ्या प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष आढळले. गावातून नदीकडे जाणाऱ्या घळवजा रस्त्याच्या दुतर्फा आढळणाऱ्या विटा आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी दृष्टोत्पत्तीस आल्या. हे सर्व या स्थळाच्या समृद्ध इतिहासाची साक्ष पटवून देतात. या स्थळाचा उल्लेख मात्र प्राचीन लिखित संदर्भसाधनांमधून उपलब्ध होत नाही. या पुरातत्त्वीय स्थळाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी २००३ ते २००७ या कालावधीत देवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात आले. यामुळे पहिल्यांदाच भोकरदन आणि कौंडिण्यपूर या दोन प्रमुख पुरातत्त्वीय स्थळांच्या दरम्यान असलेल्या या विस्तीर्ण भूभागाचा प्राचीन इतिहास उलगडण्यास मदत झाली.

प्राचीन भोनचा अर्ध्याहून अधिक परिसर हा आजच्या भोन गावाने व्यापला आहे. येथील उत्खनन हे सीमित स्वरूपाचे होते. त्यातून मिळालेले मृण्मय अलंकार, नाणी, इतर पुरातन वस्तू आणि वीटबांधकामाचे अवशेष हे या स्थळाचा कालखंड आणि स्वरूप स्पष्ट करतात. येथे मुख्यत्वे इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते इसवी सनाच्या प्रारंभापर्यंतचे अवशेष मिळाले आहेत. उत्खननातून मिळालेली नाणी प्रामुख्याने लेखरहित टंकित (uninscribed cast) प्रकारातील आहेत. ही नाणी इ. स. पू. शेवटच्या तीन शतकांच्या कालखंडांत मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. याशिवाय लेखयुक्त टंकित पाच नाणी सापडली असून त्यांतील एका नाण्यावर ‘सादवाहन’ असे लिहिलेले आहे. या कालखंडात उज्जैन परिसरात प्रचलित असणारी काही नाणीसुद्धा येथे मिळाली. त्यावरून भोन परिसराचा मध्य प्रदेशाशी असलेला संबंध सिद्ध होतो. येथील काही मृण्मय अलंकारांचे नमुने मध्य प्रदेशातील भारहूत येथील शुंगकालीन शिल्पांत पाहावयास मिळतात. कार्बन-१४ पद्धतीनुसार हा कालखंड वरील काळाशी साधर्म्य दर्शवितो.

प्राचीन स्तूपाचे अवशेष, भोन.

येथे विविध प्रकारची वीटबांधकामे उत्खननात स्पष्ट झाली. त्यांत स्तूप, कालवा आणि विटा व मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. स्तूपाचे अवशेष प्राचीन भोन गावाबाहेर पश्चिमेस आढळून आले. हा स्तूप विटांमध्ये बांधलेला असून आता फक्त त्याचा प्रदक्षिणापथ आणि मेढीचे अवशेष मिळाले आहेत. या स्तूपाच्या मेढीचा व्यास १० मी. असून, प्रदक्षिणापथासहित एकूण व्यास १४ मी. आहे. प्राचीन भोन गावालगत पश्चिमेस कालव्याचे अवशेषसुद्धा आढळून आले. त्याचे एक मुख नदीकाठी उघडते, तेथपासून ८३ मी. पर्यंतचे अवशेष प्रस्तुत उत्खननात शोधण्यात आले. हा कालवा संपूर्ण विटांमध्ये बांधलेला असून त्यासाठी ५२×२५×८ सेंमी. आकाराच्या विटांचा उपयोग करण्यात आला आहे. याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती एक मी. उंचीच्या आणि ७५ सेंमी. जाडीच्या असून दोन भिंतींमधील अंतर एक मी. आहे. येथील प्राचीन विहिरींचा उपयोग जाणून घेण्यासाठी दोन लगतच्या विहिरींचे उत्खनन करण्यात आले, ज्यात मातीच्या कड्यांनी आणि विटांनी बांधलेल्या प्रत्येकी एका विहिरीचा समावेश होता. यांपैकी मातीच्या कड्यांनी बांधलेल्या विहिरीची अधिकतम खोली पाच मी. असून, विटांनी बांधण्यात आलेल्या विहिरीची खोली १० मी. पेक्षा अधिक आढळून आली. विटांच्या विहिरी या पाण्याच्या पातळीपर्यंत खोदण्यात आल्या असाव्यात. तर कड्यांनी बांधलेल्या विहिरी या शोषखड्डा म्हणून वापरल्या जात असाव्यात. गावाच्या पूर्वेला नदीकाठी विटा तयार करण्याची जागाही आढळून आली.

या उत्खनित अवशेषांच्या आधारे प्राचीन भोनचे स्वरूप समजून घेणे शक्य झाले. आज वस्ती असलेल्या भागात प्रामुख्याने विहिरी आढळून येतात. यावरून हा भाग भोन येथील उचभ्रू रहिवाशांचा असावा, असे वाटते. येथे गोठाण या नावाने प्रचलित जो भाग आहे, तेथील उत्खननात मोठ्या प्रमाणात नाणी, पदके, सौराष्ट्र आणि उत्तर भारतातून आलेल्या मातीच्या भांड्यांची खापरे व अन्य पुरातन वस्तू मिळाल्या; मात्र येथील एकूण पांढरी साधारणतः ५० सें.मी. पेक्षा अधिक नाही. जी बांधकामे आहेत, ती लहान असून तात्पुरत्या स्वरूपाची असावीत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ही जागा बाजारपेठेची असावी, असे वाटते. गोठाणच्या भागात मोठ्या प्रमाणात हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार टोके, कार्नेलियन मणी यांचे अवशेष मिळाले. या वस्तू प्रत्यक्ष भोनमध्ये तयार होत होत्या.

गवेषण व उत्खननादरम्यान येथे मिळालेल्या वस्तूंमध्ये अर्ध-मौल्यवान दगड आणि शंखापासून तयार केलेले मणी व अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेले अणकुचीदार टोके, दगडी पाटे आणि वरवंटे, तसेच लोखंड व तांब्यांच्या वस्तू यांचा समावेश होतो. ह्या वस्तूंच्या बनावटीत भोनच्या कारागिरांनी मिळविलेली कुशलता अधोरेखित होते. साधारणतः या कालखंडातील मण्यांमध्ये विविध आकारांतील मण्यांचा समावेश होतो. येथे जोडसाच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्म पदके मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत, हे या स्थळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भोन येथील प्राचीन पीकपद्धतीचाही अभ्यास करण्यात आला, ज्यासाठी जळक्या धान्यांचे नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्यांत प्रामुख्याने तांदळाचा समावेश होता. येथील तांदळाचे मुबलक प्रमाणातील अवशेष बघता, त्याची स्थानिक लागवड केली जात असावी, असे दिसून येते. त्यावरून त्या काळातील हवामान आजच्यापेक्षा निश्चितच भिन्न असून भातपिकासाठी योग्य असावे. याव्यतिरिक्त काही प्रमाणात गहू, ज्वारी तसेच कडधान्यांमध्ये मूग, उडीद, तूर, वाटाणा आणि हरभरा यांचे अवशेष मिळाले आहेत.

प्राचीन भोन हे अवघ्या दोन शतकांसाठी जरी अस्तित्वात असले, तरी हे स्थळ प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण राजकीय, आर्थिक आणि बौद्ध धर्माचे केंद्र असल्याचे सिद्ध होते.

संदर्भ :

  •  Deotare, B. C. ‘Further Excavation at Bhon, Buldhana district, Maharashtra,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2006-07.
  •  Deotare, B. C. ‘Late Holocene Climate Change: Archaeological Evidence from the Purna Basin, Maharashtra,ʼ Journal Geological Society of India, 2006.
  •  Deotare, B.C.; Shete, G.; Sawant, Reshma; Kathale, V. & Naik, Satish ‘Discovery of Structural Stupa at Bhon, District Buldana, Maharashtra,ʼ Puratattva, 2006.
  •  Deotare, B.C.; Shete, G.; Sawant, Reshma; Kathale, V. & Naik, Satish ‘Ancient Irrigation Canal: Evidence from the Purna Basin, Vidarbha Region of Maharashtra,ʼ Puratattva, 2008.

समीक्षक – भास्कर देवतारे

This Post Has One Comment

  1. Gulabrao natthuji jamao

    भोंन हे प्राचीन स्थळ आहे ,येथे बऱ्याच वेळा गावातील लोकांनां खोदकाम करताना गुप्तधन मिळत असते. उदा. सोन्याची नाणी,चांदीचे रुपये आणि पुरातन कालीन मातीच्या बनवलेली भांडी ,वस्तू,तसेच खेळणी मिळतात. मी मूळचा ह्याच गावचाआहे.

Comments are closed.