महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील एक जुने विद्यापीठ. विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठ या नावाने झाली. सुरुवातीला विद्यापीठाचे अधिकारक्षेत्र विदर्भातील ११ जिल्ह्यांत होते; परंतु १९८३ मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (पूर्विचे अमरावती विद्यापीठ) आणि २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या दोन स्वतंत्र विद्यापीठांच्या स्थापनेमुळे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नागपूर, भंडारा, वर्धा व गोंदिया या चार जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. नागपूर विद्यापीठ या मूळ विद्यापीठाचे २००५ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप संलग्न व अध्यापनात्मक आहे. तुकडोजी महाराज यांचे ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे प्रसिद्ध गीत विद्यापीठाचे विद्यापीठ गीत आहे. सध्या डॉ. सिद्धार्थविनायक पद्माकर काणे हे विद्यापीठाचे कुलगुरू (२०१८), डॉ. प्रमोद गोविंदराव येवले हे प्र-कुलगुरू (२०१८) आणि श्री. पुरणचंद्र किसन मेश्राम हे कुलसचिव (२०१८) आहेत.

विद्यापीठाच्या स्थापने वेळी विद्यापीठाची संलग्न महाविद्यालये व विद्यार्थीसंख्या अनुक्रमे ६ व ९२७ होती. पाठ्यक्रम सुधारणा आणि विविध विषयांचा विस्तार अशा विविध सुधारणांमुळे १९४७ मध्ये विद्यार्थीसंख्या ९,००० पर्यंत वाढली. १९५८ मध्ये विद्यापीठात कला व सामाजिक शास्त्रांचे नवीन विभाग सुरू करण्यात आले. १९६३ मध्ये विज्ञान विषयक विविध शिक्षण विभाग सुरू करण्यात आले. १९७२-७३ मध्ये मुख्य परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य इमारतीत अधिक सुविधांसह सर्व विभाग स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर ललित कला, ग्रंथालयशास्त्र, शारीरिक शिक्षण, जनसंचारण शिक्षण इत्यादी व्यवसायोन्मुख पाठ्यक्रम सुरू करण्यात आले.

नागपूर-अमरावती मार्गालगत ३२७ एकर क्षेत्रावरील ७ परिसरांमध्ये विद्यापीठाचे वेगवेगळे विभाग आणि महाविद्यालये/संस्थांच्या इमारती आहेत. सध्या विद्यापीठात मुख्य ४ विद्याशाखा असून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत ५९ अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेअंतर्गत १६ अभ्यासक्रम, मानव्य विद्याशाखेअंतर्गत ४३ अभ्यासक्रम आणि आंतर विद्याशाखेअंतर्गत २८ अभ्यासक्रम कार्यरत आहेत. विद्यापीठांतर्गत सर्वच पदव्युत्तर विभागांत आणि घटक महाविद्यालयांत एम. फिल., पीएच. डी आणि त्यानंतरचे संशोधन कार्यक्रम राबविले जातात. विद्यापीठाशी ६०१ संलग्न महाविद्यालये आणि ३ संचालित (घटक) महाविद्यालये आहेत.

आजच्या जागतिकरणाच्या काळात पारंपारिक उच्च शिक्षणाच्या अल्प मात्रात्मक विकासातून समाजाच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे आश्वासक गुणात्मक यंत्रणेचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने (१) गतिमान विकासासोबत वाटचाल करण्यासाठी ई-शिक्षण प्रणाली आणि आंतर संचारणाचा अवलंब करणे. (२) आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविणे. (३) ग्रामीण व मागास विकास कार्यक्रम राबविणे (उपकेंद्र-गडचिरोली). (४) ग्रंथालये समृद्ध व बळकट करणे. (५) शिक्षकेतर प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे. (६) अध्यापन व संशोधन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सर्व विभागीय प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधा सक्षम बनविणे इत्यादी लक्ष्य ठरविले आहे.

विद्यापीठ अधिकार क्षेत्रातील स्थानिक गरजा विचारात घेऊन औपचारिक शिक्षणविषयक कार्यक्रमांना अनौपचारिक शिक्षणाची जोड दिली जाते. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठातील राजीव गांधी जैवतंत्रज्ञान विकास केंद्रामार्फत जैविक किटकनाशके/खते यांच्या निर्मिती व वापरासंबंधीचे प्रोत्साहन देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच नागपूरची महत्त्वपूर्ण ओळख असलेल्या मिहान प्रकल्पाकरिता उपयुक्त कुशल मनुष्यबळ तयार व्हावे, या हेतुने विद्यापीठामार्फत कालानुरूप आणि व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. विद्यापीठामार्फत प्रौढ व निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. छंदकार्यशाळा हे या विद्यापीठाचे एक वैशिष्ट्य असून कल्पक विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना त्यात वाव मिळतो. या छंदकार्यशाळेत इलेक्ट्रॉनिकी, छायाचित्रण, चित्रकला, सुतारकाम, मृदाशिल्पन (Clay Modeling) वगैरेंचे सातत्याने प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाते. यांव्यतिरीक्त विद्यापीठाद्वारे आरोग्य केंद्र, वसतिगृहे, विद्यार्थी भवन, ग्रामगीता भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, क्रीडा, विद्यापीठ न्यायाधिकरण, विद्यापीठ रोजगार व मार्गदर्शन ब्यूरो, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेवा केंद्र, अल्पसंख्यांकांकरिता प्री आयएएस परीक्षा प्रशिक्षण केंद्र, करिअर आणि समुपदेश कक्ष इत्यादी शैक्षणिक सुविधा दिल्या जात आहे.

विद्यापीठात डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते मध्यवर्ती (मुख्य) ग्रंथालय असून पी. व्ही. नरसिंहराव परिसर (विभागीय) ग्रंथालय आहे. मध्यवर्ती ग्रंथालय : विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज मुख्य ग्रंथालय व परिसर ग्रंथालय या दोन्हीमार्फत केली जाते. अध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात याकरिता विद्यापीठाच्या स्थापनेबरोबरच ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. जुलै १९५७ मध्ये ग्रंथालयाची स्वतंत्र नवीन ईमारत उभी झाली असून ग्रंथालयात सुमारे ४ लाख ग्रंथसंपदा आहे. ग्रंथालयात ग्रंथ खरेदी विभाग, ग्रंथोपस्कार विभाग, ग्रंथ देवघेव विभाग आणि प्रशासन विभाग हे चार विभाग कार्यरत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=qPjRLTCMF14

परिसर ग्रंथालय : परिसर ग्रंथालय हे विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाची शाखा आहे. ते अमरावती रोड येथील विद्यापीठ परिसरात स्थित आहे. ५ डिसेंबर १९७८ रोजी ग्रंथालयाच्या स्वतंत्र वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात ग्रंथ देवघेव, नियतकालिके, संगणक, हस्तलिखिते इत्यादी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४च्या कलम ७५ (आय)नुसार ग्रंथालयीन प्रशासन, संघटन, नियंत्रण, परीक्षण, आधुनिक तंत्रज्ञान व सेवा, नियम इत्यादींबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता अध्यक्ष व १० सदस्य अशी ११ लोकांची ग्रंथालय समिती स्थापन करण्यात आली. समितीमार्फत ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज, योजना, अंदाजपत्रक, वार्षिक अहवाल, ग्रंथालयीन समस्या इत्यादींबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन अमलबजावणी करण्यात येते. २०१४ मध्ये ‘नॅक’ या संस्थेकडून विद्यापीठाला अ श्रेणी देण्यात आली आहे.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा