मनोभाव (Emotion) यात सुसंवाद निर्माण करून एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जुळवून घेणे, म्हणजे भावनिक समायोजन होय. संपूर्ण जग भावभावनांनी व्यापले असून त्याचे पडसाद अनेक घटनांद्वारे आपल्या समोर वेळोवेळी येतच असतात. प्रत्येक मनुष्य प्राप्त परिस्थितीशी यशस्वी रीत्या समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. या समायोजनकार्यात शिक्षणाचे साह्य घेत असतो. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात समायोजनास विशेष महत्त्व आहे.
एकविसावे शतक हे मानसिक अस्वास्थ्याचे शतक मानण्यात येते. त्या दृष्टीने मुलांच्या भावनांचे समायोजन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. मनाचा क्षोभ, मानसिक स्थैर्याचा अभाव, मनाची प्रक्षुब्धावस्था या बाबी भावनेशी निगडित आहेत. भावनांच्या विस्फोटकामुळे शरीरांतर्गत ग्रंथींमध्ये स्राव उत्पन्न होऊन निर्माण होणारी उर्जा व्यक्तीला कार्यप्रवण करीत असते. मनुष्याच्या मनात भावनांची बरी-वाईट निर्मिती होतच असते. उदा., रागात डोके दुखणे, आनंदाच्या क्षणी मन प्रसन्न होणे इत्यादी. भावना निर्माण होत असताना काहीं गोष्टींची जाणीव होते, तर काहींची होत नाही. भावनांचा उद्रेक झाला, तर त्या अपायकारक ठरतात. म्हणून भावना अनावर होण्यापूर्वीच त्यांना आवर घालणे महत्त्वाचे ठरते.
भावनांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये विशेषत: पौगंडावस्थेतील मुले मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ती राग, प्रेम व हिंसा या तीन गोष्टींच्या विशेषत: आहारी जातात. यांतूनच त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला सुरुवात होऊन तिच्यात हळूहळू वाढ होते. याच वेळी त्यांच्या भावनिक प्रेरणांना वेळीच आवर घालणे गरजेचे असते. त्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. अशा मुलांच्या भावनांचे समायोजन करणे गरजेचे असते. तसेच या वयात मुलांच्या हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होत असतात. बदलणाऱ्या शारीरिक आणि भावनिक बदलांचे समायोजन करणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्यात कधीकधी नकारात्मक मनोवृत्ती अथवा नकारात्मक स्वप्रतिमा निर्माण होऊन उदासीनता येते. त्यामुळे मुलांना या मनोवृत्तीतून बाहेर काढणे प्राय: गरजेचे असते.
घरात व समाजात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी अशा मुलांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकविले पाहिजे, तरच ती चिंतामुक्त जीवन जगू शकतील. भावनांच्या आहारी गेल्यानंतरचे तोटे आणि भावनांना नियंत्रणात ठेवल्यानंतर होणारे फायदे, यांबद्दलची सविस्तर माहिती मुलांना समजावून सांगितली पाहिजे. म्हणजे मुले विकृत भावनेला आवर घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतील. उदा., दोन मुलांमध्ये संघर्ष उद्भवला असताना पालकाने अथवा शिक्षकाने तो मिटवून त्याच्या विपरीत परिणामांची मुलांना कल्पना दिली पाहिजे आणि तो बुद्धिपुरस्सर थांबवला पाहिजे. त्यामुळे ती मुले क्षमाशील होतील. भविष्यात त्यांना जेव्हा राग येईल असा एखादा प्रसंग उद्भवल्यास ती आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. याउलट, जर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता त्यांच्यात नसेल, तर ती दुराग्रही, रागीट, खोडकर, एकलकोंडी आणि निराश होण्याचा धोका संभवतो. या बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अडसर ठरू शकतात. यासाठी पालक, शिक्षक व मुले यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे.
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे फायदे मुलांना समजून देण्याबरोबरच त्यांना आपल्या भावना योग्य प्रकारे कशा व्यक्त कराव्यात याचे ज्ञान होणे, म्हणजेच भावनिक समायोजन होय. मुलांना आपल्यावर कोणत्या भावनेचा प्रभाव आहे आणि तिचे उगमस्थान कुठे आहे, या मूलभूत बाबींची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे भावनांवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवण्याची कला त्यांना साध्य होईल. तसेच भावना अनावर झाल्यावर दिसणारी शारीरिक लक्षणेसुद्धा त्यांना माहीत असावी. या जाणिवांमुळे मुले साहजिकच समाजमान्य पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त होतील. परिणामी, ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून मानसिक अपप्रवृत्तीत संयम राखतील. भावनिक समायोजन साधणारी मुले अभ्यासात उत्कृष्ट यश संपादन करू शकतात, असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. शिवाय सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक दृष्ट्याही ती यशस्वी होतात.
समीक्षक – सु. र. देशपांडे
खूप छान सर…