सिंग, सगत : (१४ जुलै १९१९—२६ सप्टेंबर २००१). भारतीय सैन्यातील एक अतिशय बुद्धिमान आणि साहसी सेनाधिकारी. त्यांचा जन्म राजस्थानातील चुरू या जिल्ह्यातील कुसुमदेसार या खेड्यात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बिकानेर येथील वाल्टर नोबेल्स हायस्कूलमध्ये झाले (१९३६). त्यानंतर त्यांनी बिकानेरच्या डूंगर महाविद्यालयात प्रवेश घेतला; तथापि १९३८ सालच्या इंटरमिजिएट परिक्षेनंतर ते हिंदुस्थानी सैन्यात बिकानेर गंगा रिसालामध्ये नाईक म्हणून दाखल झाले. १९४१ साली नाईक सुभेदारपदी पदोन्नती मिळून त्यांना सिंधमधील बंडखोरी करणाऱ्या हूर टोळीसोबत समेट करण्यासाठी पाठविण्यात आले. इराकच्या मोहिमेवरसुद्धा त्यांना पाठविण्यात आले होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४९ साली त्यांनी भारतीय सैन्यात कमिशन घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २/३ आणि ३/३ गोरखा रायफल्स या दोन पलटणींचे नेतृत्व केले होते. डिसेंबर १९६१ सालच्या गोवा, दीव, दमण मुक्ती मोहिमेच्या वेळी त्यांनी ५० पॅराशूट ब्रिगेडचे नेतृत्व केले होते. या ब्रिगेडच्या एका युनिटसमोर शत्रुपक्षाने शरणागती पत्करली. १९६५ साली मेजर जनरल झाल्यानंतर त्यांनी सिक्कीममधील १७ माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व हाती घेतले. १९६७ साली नाथू-ला पास येथील भारत-चीन सीमारेषेवर भारतीय सैन्याच्या चौकीभोवती दुहेरी वायरचे कुंपण घातले जात असताना चिनी सैन्यांनी गोळीबार सुरू केला. या छोट्या चकमकीचे लढाईत रूपांतर होऊन ही लढाई पुढे तीन दिवस चालू राहिली. या लढाईत २०० भारतीय सैनिक, तर ३०० चिनी सैनिक कामी आले. त्यानंतर मिझो टेकड्यांच्या (मिझोराम) कक्षेतील १०१ कम्युनिकेशन झोनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) म्हणून पदभार सांभाळत असताना त्यांनी तेथील बंडखोरीला प्रतिबंध घातला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना परमविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांना ४ कोअरचे नेतृत्व देण्यात आले. या कोअरमध्ये त्यांच्या हाताखाली ३ माऊंटन डिव्हिजन्स आणि त्यांना पूरक असा शस्त्र आणि इतर आवश्यक सेवा पुरविणाऱ्या रेजिमेंट्स आणि पीटी ७६ जातीच्या रणगाड्यांच्या दोन स्क्वाड्रन्सचा समावेश होता. यावेळेस प्रथमच भारतीय सेनेने हवाईमार्गे डाक्का(ढाका)जवळ टँगेल येथे युद्धस्थळी आपल्या तुकड्या ‘पॅराड्रॉप’ केल्या. ती एक युद्धविजयी चाल ठरली. याचे श्रेय जनरल सगत यांच्या कल्पक नियोजनाला जाते. हेलिकॉप्टरमधून स्वतःच्या सुरक्षतेतेची पर्वा न करता युद्ध प्रदेशातील एकंदरीत परिस्थितीचा त्वरित आढावा घेत जनरल सगत यांनी हेलिकॉप्टरद्वारे मेघना नदीचे महापात्र ओलांडून सैन्याला युद्धस्थळी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. ९ डिसेंबर १९७१ रोजी या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि पुढच्या ३६ तासांत ११० सॉर्टिजद्वारे भारतीय सेनेने मेघना नदी पार केली आणि वेगवेगळ्या मार्गे डाक्काच्या दिशेने आगेकूच केली. १५ आणि १६ डिसेंबरच्या रात्री डाक्कावर तीव्र गोळीबार करण्यात आला आणि त्याच वेळी एक ब्रिगेड डाक्कामध्ये घुसण्यासाठी सज्ज होती. टँगेल येथील पॅराड्रॉपमुळे १०१ कम्युनिकेशन झोनच्या अंतर्गत सैन्यदलाला जलद गतीने आगेकूच करणे सुलभ झाले. १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करल्यानंतर युद्धविराम जाहीर करण्यात आला. जनरल सगत यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले गेले. १९७१ मधील पाकिस्तानविरुद्ध मिळालेल्या विजयाचे मोठे श्रेय जनरल सगत यांना जाते; कारण पाकिस्तानातील डाक्काला तीनही बाजूने आपल्या सैन्याचा वेढा घालण्याच्या सगत यांच्या अचूक नियोजनामुळे पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करावी लागली.

सगत सिंग यांच्या अंगी आक्रमक वृत्ती भिनलेली असल्यामुळे कोणत्याही मोहिमेमध्ये त्यांनी आपल्या सैन्याच्या नेहमी अग्रस्थानी राहून लक्ष्याच्या पलीकडील यश संपादन केले. जनरल सगत यांच्या नेतृत्वावरील असलेल्या गाढ्या विश्वासामुळे आपले सैनिक वेळ पडल्यास आपल्या प्राणाची आहुती देण्यास नेहमी तयार असत.

त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Singh, Lachman, Victory of Bangladesh, New Delhi, 1981.
  • Singh, Randhir, A Talent of War : The Military Biography of Lt. Gen. Sagat Singh, New Delhi, 2013.
  • Singh, V. K. Leadership in the Indian Army : Biographies of Twelve Soldiers, New Delhi, 2004.

                                                                                                                                                        भाषांतरकार : वसुधा माझगावकर

                                                                                                                                                                    समीक्षक : शशिकांत पित्रे